मुंबई, दि.१४ : प्रतिनिधी "मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर आज मध्यरात्रीपासून हलक्या वाहनांना टोलमुक्ती मिळणार आहे. याबद्दल एमएमआर परिसरात राहणाऱ्या सर्व नागरिकांचे अभिनंदन आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांचे खूप खूप अभिनंदन.महाराष्ट्र सैनिकांनो, यापुढे 'टोलच्या आंदोलनाचं काय झालं?' असं कोणी विचारलं तर त्यांना मुंबई टोलमुक्तीचं उदाहरण अभिमानाने सांगा आणि तुम्ही एकदा ठरवलंत की गोष्ट तडीस नेता हे पुन्हा एकदा दिसलं हे विसरू नका," असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांचे अभिनंदन करत राज्य सरकाराच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
राज्य सरकारने आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुंबईत प्रवेश करणाऱ्या वाहनांना पाचही टोलनाक्यावर टोल माफी देण्यात येई अशी घोषणा केली. मुंबईत प्रवेश करताना आनंदनगर टोलनाका, दहिसर टोलनाका, मुलुंड-एलबीएस टोलनाका, वाशी टोलनाका, ऐरोली टोलनाका हे पाच टोलनाके आहेत. या टोलनाक्यावरून हलक्या वाहनांना यापुढे टोलमधून सूट देण्यात येईल. आज रात्री १२ वाजेपासून हा निर्णय लागू करण्यात येईल.
या निर्णयावर प्रतिक्रिया देताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले," टोलच्या व्यवहारात पारदर्शकता हवी, आणि जिथे रस्त्याच्या कामांचे पैसे वसूल झालेत, तिथले रस्ते टोलमुक्त झाले पाहिजेत या मागणीसाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी प्रचंड संघर्ष केला... आम्ही टोलनाक्यांची तोडफोड केली यावरून आमच्यावर टीका झाली, पण सरकार नावाची यंत्रणा कुठलीही असो, त्यांना टोकाचं पाऊल उचलल्याशिवाय गांभीर्य कळत नाही. पण असो... किमान मुंबईकर टोलमुक्त झाला आणि आमच्या आंदोलनाला बऱ्यापैकी यश आलं ही आनंदाची बाब. यासाठी राज्य सरकारचं मी अभिनंदन करेन, पण फक्त हा निवडणुकीपुरता घेतलेला निर्णय नाही, याची खात्री सरकारने जनतेला द्यायला हवी, अशी मागणी राज ठाकरे यांनी दिली.
पुढे ते म्हणाले, 'आज मुंबई टोलमुक्त झाली पण त्या आधी किती लोकांनी टोलच्या या खेळात, संपत्तीच्या राशी उभ्या केल्या याचा हिशोबच नाही. खरंतर याची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी. पण ती होईल याची फारशी खात्री नाही, कारण कोणी कोणाला पकडायचं हा प्रश्न आहे. पण ठीक आहे, मुंबईकर टोलच्या ओझ्यातून मुक्त झाले हे बरे झाले. महाराष्ट्र सैनिकांनो, यापुढे 'टोलच्या आंदोलनाचं काय झालं?' असं कोणी विचारलं तर त्यांना मुंबई टोलमुक्तीचं उदाहरण अभिमानाने सांगा आणि तुम्ही एकदा ठरवलंत की गोष्ट तडीस नेता हे पुन्हा एकदा दिसलं हे विसरू नका, असे आवाहन ही राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना केले.