दै. ‘मुंबई तरुण भारत’ आयोजित ‘इन्शाअल्लाह’ कादंबरी अभिवाचन सोहळा, पुणे

14 Oct 2024 15:11:48

Inshaallah
 
मुस्लीम धर्म आणि धर्मग्रंथाची चिकित्सा, मुस्लीम समाजासाठीच नव्हे, तर समस्त मानवजातीसाठी आवश्यक आहे, असे अधोरेखित करणार्‍या बहुचर्चित अशा ‘इन्शाअल्लाह’ या अभिराम भडकमकर लिखित कादंबरीच्या अभिवाचनाचा कार्यक्रम पुण्यातील ज्योत्सना भोळे सभागृहात शुक्रवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी संपन्न झाला. कार्यक्रमात सहयोगी संस्था म्हणून ‘संस्कार भारती’ आणि सह-प्रायोजक म्हणून ‘महाएनजीओ फेडरेशन’ तसेच ‘जनता सहकारी बँक लिमिटेड, पुणे’ यांनी योगदान दिले. दै. ‘मुंबई तरुण भारत’ आयोजित या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. त्यानिमित्त कार्यक्रमाशी निगडित क्षणचित्रे, मान्यवरांच्या काही बोलक्या प्रतिक्रिया...
 
माझे बालपण मुस्लीम वस्तीत गेल्यामुळे, तेथील या प्रश्नाकडे मी खूप तटस्थपणे बघू शकलो. गेली अनेक वर्षे समाजात या विषयावर घुसळण सुरु आहे. त्यामुळे मला असे वाटले की, मुस्लीम समाजातील काही बाबींवर लिहिले पाहिजे. तसेच, मुस्लीम समाजातील बुद्धिवादी लेखक, कार्यकर्ते यांनीही यावर लिहावे. यासाठी धर्मचिकित्सा होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, त्यांच्याकडून ते होताना दिसत नाही.
 
अभिराम भडकमकर,
लेखक, ‘इन्शाअल्लाह’ कादंबरी
 
‘इन्शाअल्लाह’ कादंबरी अभिवाचनाचा हा अतिशय उत्तम कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम मराठवाड्यामध्ये करणे जास्त गरजेचे आहे. कारण, मुस्लीम समाजाची संख्या तिकडे जास्त आहे. त्या समाजामध्ये जर हा कार्यक्रम सादर केला, तर त्याचा चांगला परिणाम आपल्याला पाहायला मिळेल. जी अंधश्रद्धा किंवा टोकाचा विरोध आहे, तो यामुळे कमी होईल.
 
विनायकराव बापट,
विश्वस्त, भारतीय विचार दर्शन
 
‘इन्शाअल्लाह’ कांदबरीचे अभिवाचन आज ऐकले. एका खूप वेगळ्या, आपल्याशी निगडित असलेल्या समाजाविषयी आपल्याला माहीत नसलेल्या बाबी या कादंबरीतून समजल्या. सामान्य माणसापासून ते उच्चशिक्षित असलेल्या माणसांचेसुद्धा वर्णन यामध्ये आहे. ‘महाराष्ट्र कल्चरल सेंटर’ विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असते. आमच्या संस्थेत हा कार्यक्रम अनुभवायला मिळाला, त्याबद्दल मी दै. ‘मुंबई तरुण भारत’ आणि लेखक अभिराम भडकमकर व त्यांच्या सहकार्‍यांचे अभिनंदन करते.
 
शुभांगी दामले,
खजिनदार, महाराष्ट्र कल्चरल सेंटर
 
अतिशय उत्तमपणे सादर केलेला हा प्रयोग आहे. मुस्लीम कट्टरतावादाकडे अभिनिवेशी दृष्टिकोनातून न पाहता, कशा प्रकारे या प्रश्नाकडे पाहता येऊ शकते, याबद्दलचा हा उत्तम प्रयत्न आहे. लेखक अभिराम भडकमकर यांनी मुस्लीम मानसिकतेचे कंगोरे या कादंबरीतून छान उलगडून दाखवले आहेत. कट्टरतावादाने भारलेले काही तरुण, सम्यक विचार करणारे काही तरुण आणि द्विधा मनस्थितीत असणारे काही तरुण, अशा मुस्लीम समाजातील वेगवेगळ्या भाव, छटांचा यामध्ये बारकाईने अभ्यास केलेला आहे. मुस्लीम समाजातील महिलांचे स्थान आणि त्यांची होणारी घुसमट यांकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. हे मांडतानाच त्यांनी कोणताही टोकाचा विचार मांडलेला नसून, दोन्ही बाजूंना असणार्‍या कडवेपणाबद्दल भाष्य केले आहे. यानिमित्ताने सुरू झालेली चर्चा, वैचारिक अभिसरण पुढे नेण्यासाठी समाजातील - विशेषतः मुस्लीम समाजातील - जाणत्या जनांनी निर्भयपणे पुढे यायला हवे. या कार्यक्रमावर असणारे कट्टरतावादाचे सावट प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे दूर झाले, यांचा विशेष आनंद वाटतो.
 
प्रसाद फाटक, लेखक
 
‘इन्शाअल्लाह’ कांदबरीच्या अभिवाचनाचा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. अभिराम भडकमकर यांनी हा विषय अतिशय चांगल्या पद्धत्तीने आपल्या समोर मांडला आहे आणि या कार्यक्रमाला प्रेक्षकांचाही उत्तम प्रतिसाद मिळाला.
 
प्रा. विनय हर्डीकर, लेखक
 
खूप चांगला कार्यक्रम होता. कोणाच्या मनाचा विचार न करता मांडलेल्या मतांमुळे याचा खूप चांगला परिणाम सगळीकडे होऊ शकतो. अभिराम भडकमकर आणि मी कोल्हापूरचे असल्यामुळे आनंद वाटला. यापुढेही अभिवाचनाचे कार्यक्रम अनेक ठिकाणी व्हावे, अशी इच्छा आहे.
हेमंत पंडित
 
अभिराम भडकमकर लिखित ‘इन्शाअल्लाह’ ही एक सुरेख कादंबरी आहे. दै. ‘मुंबई तरुण भारत’ने त्यांच्या अभिवाचनाचा पुण्यात केलेला प्रयोग हा अतिशय सुरेख झाला. स्वतः भडकमकर, स्वाती चिटणीस आणि सर्वांच्या धीरगंभीर वाचनाने आणि मुळात पुस्तकातील निवडक घेतलेल्या भागाने पुस्तकाचा गाभा श्रोत्यांना कळला. पुस्तक मुस्लीम प्रश्नावर भाष्य करत हिंदूंमधीलही विविध विचारप्रवाहांचा आढावा घेतं, तेही अत्यंत संतुलित पद्धतीने. अभिवाचनाने आणि त्यावरील प्रश्नोत्तरांनी एकूणच धर्मचिकित्सा किती गरजेची आहे, हे अधोरेखित केले. एका मध्ययुगात निर्माण केलेली मूल्ये जर कालसुसंगत झाली नाहीत, तर आजचे प्रश्न निर्माण होतात आणि त्यासाठी वेळोवेळी त्याचा परामर्श घेत, त्यांना प्रवाही करणे यामध्ये धर्मसुधारणेची मुळे असतात. आज इस्लामला गरज आहे ती असे शेकडो ‘हमीद दलवाई’ त्यांच्या समाजात निर्माण होण्याची. अशा परिस्थितीत असा प्रयोग करणे, हा विचार समाजामध्ये आणणे, हे दै. ‘मुंबई तरुण भारत’चे काम नक्कीच अतिशय धैर्याचे आहे. त्यासाठी समूहाचे अभिनंदन आणि आभार! या अभिवाचनाचे अधिकाधिक प्रयोग व्हावेत, त्याला एका चळवळीचे स्वरूप प्राप्त होऊन अधिकाधिक मुस्लीम चिकित्सेसाठी पुढे येवो, अशी आशा करते. अभिवाचनासोबतच परिसंवादास थोडा वेळ दिल्यास हा उद्देश लवकर सफल होईल, असे वाटते.
 
विभावरी बिडवे, लेखिका
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0