राज्य सरकारतर्फे ऑलिम्पिक खेळाडूंचा सन्मान!

14 Oct 2024 14:57:36
 
Gov
 
मुंबई : पॅरिस, फ्रान्स येथे २०२४ मध्ये झालेल्या ऑलिंम्पिक स्पर्धेमध्ये पदक प्राप्त खेळाडूंचा सोमवारी राज्य शासनातर्फे सन्मान करण्यात आला. सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांना धनादेश आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
 
पॅरिस, फ्रान्स येथे आयोजित करण्यात आलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतील नेमबाजी स्पर्धेमधील ५० मीटर रायफल ३ पोझीशन या उपप्रकारामध्ये कांस्य पदक प्राप्त करणाऱ्या स्वप्निल कुसळे व पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेतील मैदानी स्पर्धेमधील गोळाफेक या उपप्रकारामध्ये रौप्य पदक प्राप्त करणाऱ्या सचिन खिलारी या खेळाडूंचा तसेच कुसळे यांच्या प्रशिक्षक दिपाली देशपांडे आणि खिलारी यांचे प्रशिक्षक अरविंद चव्हाण यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
 
हे वाचलंत का? -  लाखों वाहनधारकांना टोलमाफीच्या निर्णयाचा लाभ होणार; आमदार संजय केळकर यांची प्रतिक्रिया
 
राज्य शासनाने नुकत्याच आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडू व प्रशिक्षकांच्या पारितोषिकाच्या रकमेमध्ये केलेल्या भरघोस वाढीच्या पार्श्वभूमीवर पॅरिस, ऑलिम्पिक स्पर्धेतील नेमबाजी स्पर्धेमधील कास्य पदक प्राप्त करणाऱ्या स्वप्निल कुसळे यांना दोन कोटी रुपये देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या प्रशिक्षक दिपाली देशपांडे यांना २० लाख रुपये देण्यात आले. तसेच पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेतील मैदानी स्पर्धेमधील रौप्य पदक प्राप्त करणाऱ्या सचिन खिलारी यास तीन कोटी रुपये तसेच त्यांचे प्रशिक्षक अरविंद चव्हाण यांना ३० लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
 
बुडापेस्ट, हंगेरी येथे दि. १० ते २३ सप्टेंबर, २०२४ या कालावधीत झालेल्या ४५ व्या बुद्धीबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत पुरुष व महिला गटात अनुक्रमे १९३ व १८१ देशांचे संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत भारताच्या संघाने सुवर्णपदक संपादन करुन ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या संघात राज्याचे बुद्धीबळपटू विदीत गुजराथी आणि दिव्या देशमुख यांचा समावेश होता. राज्य शासनाच्या वतीने प्रत्येकी या दोन्ही खेळाडूंचा रोख एक कोटी रुपये तसेच त्यांचे मार्गदर्शक अनुक्रमे संकल्प गुप्ता आणि अभिजीत कुंटे यांना प्रत्येकी १० लाख रुपये इतकी रक्कम व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. विदीत गुजराथी स्पर्धेकरिता विदेशात असल्यामुळे त्यांच्यावतीने त्यांचे वडील डॉ. संतोष गुजराथी यांनी तर अभिजीत कुंटे यांच्या वतीने त्यांच्या पत्नी मेघना कुंटे आणि संकल्प गुप्ता यांच्यावतीने त्यांचे वडील संदीप गुप्ता यांनी हा सन्मान स्वीकारला.
 
 
 
Powered By Sangraha 9.0