काँग्रेसचा मुलाखतींचा घाट

    14-Oct-2024
Total Views |

Congress
 
काँग्रेसकडून इच्छुकांच्या मुलाखतीचा घाट घातला गेला. जिल्ह्यातील विविध जागांसाठी ६४ उमेदवारांनी मुलाखती दिल्या. यामध्ये सर्वाधिक ११ इच्छुकांनी नाशिक मध्यची जागा मिळण्यासाठी मुलाखत देत, आपलेच घोडे दामटण्याचा प्रयत्न केला.
 
विधानसभा निवडणुकांचा धुरळा उडायला अवघे काही दिवस शिल्लक असताना, इच्छुकांनी मात्र राळ उडवून द्यायला सुरूवात केलीय. उमेदवारीसाठी एनकेन प्रकारे पक्ष नेतृत्वावर दबाव टाकला जात आहे. लोकसभा निवडणुकीत विजय मिळविल्याने नाशिक जिल्ह्यात, महाविकास आघाडीतील घटक पक्षातील इच्छुक उमेदवार तर हातांच्या बाह्या सरसावून बसले आहेत. नाशिक शहरातील जास्तीत जास्त जागा कशा आपल्या पदरात पाडून घेता येतील, यासाठी उबाठा गट आणि काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच बघायला मिळत आहे. त्यात शरद पवार गट मध्येच एखादा बार उडवून जातो. उबाठा गटाने तर परस्पर नाशिकमध्ये, विधानसभेसाठी माजी आ. वसंत गिते यांचे नाव जाहीरही केले. तर काँग्रेसकडून इच्छुकांच्या मुलाखतीचा घाट घातला गेला. जिल्ह्यातील विविध जागांसाठी ६४ उमेदवारांनी मुलाखती दिल्या. यामध्ये सर्वाधिक ११ इच्छुकांनी नाशिक मध्यची जागा मिळण्यासाठी मुलाखत देत, आपलेच घोडे दामटण्याचा प्रयत्न केला. या इच्छुकांमध्ये माजी महापौर दशरथ पाटील आणि मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे सरचिटणिस नितीन ठाकरे यांनी मुलाखत देत, आपली उमेदवारी पेश करण्याचा प्रयत्न केला. तर राजाराम पानगव्हाणे, गौरव पानगव्हाणे या पिता पुत्रांनीही मुलाखतीचा सोपस्कार पूर्ण केला. आता ही जागा कोणत्या पक्षाला सुटणार आणि कोण उमेदवार ठरणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे. मुळात काँग्रेस पक्षाचा शोध नाशिक जिल्ह्यात दुर्बिण घेऊन करावा लागतो. नाही म्हणायला, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात हा पक्ष आपले अस्तित्व टिकवून आहे. नाशिक जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची अवस्था अत्यंत दयनीय असून, कार्यकर्त्यांची वानवा असलेला हा पक्ष, नाशिक जिल्ह्यात सात जागा मिळण्याची आस लावून बसला आहे. यामध्ये नाशिक मध्य, नाशिक पूर्व, इगतपूरी, चांदवड, मध्य मालेगाव, नांदगाव आणि येवला या जागांसाठी जोर लावला जात आहे. यात भारतीय जनता पक्षाचा गड असलेल्या नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात, उमेदवारीसाठी सर्वाधिक इच्छुकांनी उमेदवारीसाठी दावेदारी सादर केली आहे. आता काँग्रेस पक्ष आणि इच्छुक उमेदवार यांना शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट कशा वाटाण्याच्या अक्षता लावतात, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
 
दिंडोरीत उमेदवारांची भाऊगर्दी
 
गत लोकसभा निवडणुकीत दिंडोरीत तुतारी वाजल्याने, अनेकजण ती फुंकण्याच्या तयारीत आहेत. नवखे असूनही भास्कर भगरे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. भगरे विजयी झाल्याने, अनेकांच्या इच्छा आकांक्षांना धुमारे फुटू लागले आहेत. तर काही ‘आश्वासन मिळालेले आपणच आमदार’ अशा तोर्‍यात, मतदारसंघात वावरत आहेत. तर दुसरीकडे दिंडोरी तालुक्यातील शरद पवार गटाचे नेते, साखर संघाचे उपाध्यक्ष आणि कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांची तर्‍हाच न्यारी आहे. त्यांच्याकडे उमेदवारीचे साकडे घालण्यासाठी जाणार्‍या प्रत्येकाला, लाग कामाला असा संदेश दिला जात आहे. शेटे यांनी दिलेल्या आश्वासनावर अनेक इच्छुक पायाला भिंगरी लावून, पळायला लागले आहेत. आता मतदारांनाही प्रश्न पडला आहे की, नेमका उमेदवार कोण आणि मतदान कोणाला करायचे? त्यातच दिंडोरी विधानसभा मतदारसंघात मविआकडून रामदास चारोस्कर, सुनिता चारोस्कर, गोकुळ झिरवाळ, संतोष रेहेरे, भास्कर गावित, मधुकर भरसट, अशोक बागुल, सुधाकर राऊत आणि स्वप्निल गायकवाड दिंडोरीचा सत्तासोपान चढण्यासाठी आस लावून बसले आहेत. महायुतीत अनेक वर्ष ही जागा शिवसेनेने लढवल्यामुळे, ही जागा उबाठा गटाला सुटावी यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. मात्र, जागा सुटण्याची आशा धुसर झाल्याने, माजी आ. रामदास चारोस्कर आणि त्यांच्या पत्नी सुनिता चारोस्कर यांनी नुकतीच उबाठा गटातून पवार गटात उडी मारत तुतारी हाती घेतली. तर शेटे यांच्याकडून आश्वासन भेटलेले संतोष रेहेरे, मागील दोन महिन्यांपासून मतदारसंघात फिरत आहेत. तसेच, दुसरे आश्वासन भेटलेले अशोक बागुल कामाला लागले आहेत. हे दोघे कमी की काय म्हणून, माजी आ. भगवंतराव गायकवाड यांचे पुतणे स्वप्निल गायकवाड यांनीही उमेदवारीचे घोडे पुढे दामटले आहे. वणीचे सरपंच मधुकर भरसट यांनाही उमेदवारीचे स्वप्न पडताहेत. त्यात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ, शरद पवार गटात डेरेदाखल होऊन तुतारी फुंकण्याच्या तयारीत आहेत. आता दिंडोरी तालुक्यात महायुतीची वज्रमुठ आणि विद्यमान आ. नरहरी झिरवाळ यांनी अखेरच्या टप्प्यात केलेल्या विकासकामांमुळे, मविआचा कसा टिकाव लागणार हे पाहावे लागेल.
 विराम गांगुर्डे