मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Bhayyaji Joshi Vijayadashmi Utsav) "आपल्या सर्वांची संस्कृती एकच आहे. अयोग्य, अनुचित आणि अधर्म रूपी राक्षसी शक्तींचा नायनाट करून धर्म आणि उदात्त कृतीतून भारताच्या गौरवशाली परंपरांचे रक्षण करायचे आहे.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी केले. जयपुरच्या झोटवाडा येथे शनिवारी संघाचा विजयादशमी उत्सव संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पॅरालिम्पिक पदक विजेत्या मोना अग्रवालही उपस्थित होत्या.
हे वाचलंत का? : मालवणीत धर्मांधांना दाखवली हिंदुत्वाची ताकद!
पंच परिवर्तनातील नागरी कर्तव्य या विषयावर चर्चा करताना ते म्हणाले की, आपण परदेशात गेल्यावर स्वच्छता राखतो, आपल्या देशातही आपले आचरण असेच असले पाहिजे. प्रत्येकाने चांगल्या नागरिकाचे कर्तव्य बजावले पाहिजे. वाईट सवयी टाळण्यासाठी तरुण पिढीला प्राचीन भारतातील परंपरा, ऋषीमुनींचे विचार, महापुरुषांचे विचार आचरणात आणावे लागतील. आज अनेक तरुण विचित्र घोषवाक्य असलेले टी-शर्ट घालून फिरतात. परंतु ही भारतीय संस्कृती असू शकत नाही. त्यासाठी कौटुंबिक मूल्येदेखील समृद्ध करावी लागतील.
स्वदेशीचे महत्त्वं पटवून देत पुढे ते म्हणाले, आपण आपल्या देशात उत्पादित होणारा माल खरेदी केला पाहिजे. प्रत्येकाने स्वदेशीची भावना जोपासली पाहिजे. आपण केवळ परदेशी गोष्टींपुरते मर्यादित न राहता आपली संस्कृती, परंपरा आणि श्रद्धा यांच्याबद्दल स्वाभिमानाच्या भावनेने पुढे जायला हवे. भारतीय विचारातून मिळालेली मूल्ये अमलात आणणे ही आपली जीवनपद्धती आहे. जेव्हा सामान्य जनता परस्पर सहकार्य, त्याग, बलिदान समर्पणाने सुरक्षित ठेवेल तेव्हा भारत भारतच राहील. हा समस्त मानवजातीच्या कल्याणाचा मार्ग आहे.
पुढे ते म्हणाले, जोपर्यंत समाज उच्च-नीच, भेदभाव, अस्पृश्यता यांसारख्या विकृत गोष्टींपासून मुक्त होत नाही, तोपर्यंत भारत संघटित शक्ती म्हणून कसा उभा राहील. त्यामुळे संघटित सत्तेची उपासना करणाऱ्या आपणा सर्वांना राज्याच्या सीमा, भाषिक वैविध्य, जाति-समाज इत्यादी संकुचित मानसिकता बाजूला सारून बाबासाहेब आंबेडकरांच्या 'एक देश एक लोक' या विधानाच्या भावनेला बळ द्यावे लागेल.