मुंबई : मराठी रंगभूमीवर अधिराज्य गाजवणारे आणि असंख्य प्रेक्षकांची मने जिंकणारे हरहुन्नरी अभिनेते अतुल परचुरेंचं निधन झालं. त्यांनी कर्करोगाशी यशस्वी झुंज दिली होती. मात्र, सोमवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी रंगभूमीवर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हरहुन्नरी कलाकार, अशी त्यांची ओळख होती. निधनासमयी ते ५७ वर्षांचे होते. त्यांच्या जाण्याने मराठी सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे.
अतुल परचुरे यांनी काही काळापूर्वी कर्करोगावर मात मिळवून पुन्हा नव्याने आयुष्य जगण्यास सुरुवात केली होती. सुर्याची पिल्ले या नाटकासाठी ते पुन्हा एकदा रंगभूमीवर दिसणार होते. मात्र काळाने घाला घातला आणि अतुल परचुरेंची प्राणज्योत मालवली.
अतुल परचुरे यांनी आजवर नाटक, मालिका, चित्रपटांत भूमिका साकारल्या होत्या. त्यांनी कापूसकोंड्याची गोष्ट, गेला माधव कुणीकडे, नातीगोती, तुझ आहे तुजपाशी, टिळक आणि आगरकर अशा अनेक नाटकांमध्ये कामं केली होती. याशिवाय, अळी मिळी गुप चिळी, होणार सून मी या घरची, जागो मोहन प्यारे या मालिकांमध्येही उल्लेखनीय भूमिका केल्या होत्या. तसेच, घरकुल, चाळीशीतले चोर, गोलमाल, पार्टनर, कलयुग, नारबाची वाडी, खट्टा मिठा, बिल्लू बार्बर, आवारापन, क्यु की अशा अनेक मराठी हिंदी चित्रपटातही कामं केली होती. त्याच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या जाण्याने राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत.
“रसिक प्रेक्षकांना कधी खळखळून हसवणारे, कधी डोळ्यात आसू उभे करणारे. कधी अंतर्मुख करणारे अभिजात अभिनेते अतुल परचुरे यांचे अकाली निधन वेदनादायी आहे. अतुल परचुरे यांनी बालरंगभूमीपासू्नच आपली देदिप्यमान अभिनय कारकीर्द गाजवली. नाटक, चित्रपट, मालिका या तिन्ही क्षेत्रात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला.तरुण तुर्क म्हातारे अर्क, नातीगोतीसारखी नाटकं असोत किंवा पु. ल. देशपांडे यांचा शाब्दिक, वाचिक विनोद असो, अतुल परचुरे यांनी आपल्या अंगभूत गुणांनी त्यात गहिरे रंग भरले.मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी उत्तम व्यक्तिरेखा साकारल्या. त्यांच्या जाण्यामुळे मराठीतला एक अभिजात अभिनेता हरपला आहे. हे नुकसान भरुन येण्यासारखे नाही. परचुरे यांच्या हजारो चाहत्यांपैकी एक या नात्याने कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. हे दु:ख सहन करण्याचं बळ ईश्वर त्यांना देवो. राज्य सरकारच्या वतीने मी त्यांना श्रध्दांजली वाहतो. ओम शांती."
एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
“मराठी आणि हिंदी अशा दोन्ही सिनेसृष्टी गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायक आहे. आपल्या विनोदी भूमिकांमार्फत त्यांनी प्रेक्षकांच्या मनामध्ये आपली जागा निर्माण केली होती. त्यांच्या निधनाने सिनेमाजगत आणि नाट्यसृष्टीचे कधीही भरुन न निघणारे नुकसान झाले आहे. हे दु:ख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना व चाहत्यांना लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!”
देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
“अतुल परचुरे याला नववीत असल्यापासून रंगभूमीवर काम करताना मी पाहिलं आहे. त्याच्या निधनामुळे रंगभूमीचं फार नुकसान झालं आहे. कर्करोगावर मात मिळवून पुन्हा तो अभिनयाकडे वळला होता. चाळीशीतले चोर हा चित्रपट केला आणि त्यानंतर आता सुर्याची पिल्ले हे नाटक देखील करणार होता. पण त्याचं जाणं ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे”.
जयवंत वाडकर, ज्येष्ठ अभिनेते
“कर्करोगासारख्या मोठ्या आजारातून ते बरे झाले होते. लवकरच आपण एकत्र नाटक करु असं म्हणाले होते पण अचानक त्यांच्या निधनाची बातमी ऐकून मन सुन्न झालं आहे. एक उत्तम सहकलाकार, खवय्या आणि माणूस होते ते. जागो मोहन प्यारे म्हटलं की डोळ्यांसमोर त्यांचाच चेहरा येत आहे. खूप मोठं नुकसान झालं आहे आम्हा कलाकारांचं”.
सुप्रिया पाठारे, अभिनेत्री
“गेल्या काही दिवसांपासून आजारी होता अतुल दादा पण अचानक आपल्यातून निघून जाईल असं वाटलं नव्हतं. अजूनही तो आपल्यातून कायमचा निघून गेला आहे हे कटू सत्य पचत नाही आहे. पण एक हरहुन्नरी कलाकार निघून गेला याचं अत्यंत दु:ख आहे”.
मधुरा वेलणकर