परिस्थितीच्या शापाला आनंदाचे वरदान देणारे 'अमन' : डॉ. उदय निरगुडकर

13 Oct 2024 20:53:50
 
aman sharma
 
मुंबई : (Aman Sharma)"अमन शर्मा आपल्या कार्यातून मुकबधीर मुलांच्या जीवनात आवाज तयार करण्याचे काम करीत आहेत. प्रत्येकात आशेचा किरण जागवणारं ते व्यक्तिमत्व आहे. परिस्थितीच्या शापाला आनंदाचं वरदान त्यांनी दिलय.", असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांनी केले.
 
रविवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी राजपुरिया बाग हॉल, विलेपार्ले पूर्व येथे १५वा 'केशवसृष्टी पुरस्कार' सोहळा संपन्न झाला. यावेळी 'टीच' संस्थेचे संस्थापक अमन शर्मा यांना डॉ. उदय निरगुडकर यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 'टीच' संस्था मुंबई येथील मूकबधीर मुलांचे उच्च शिक्षण, विविध क्षेत्रातील कौशल्य शिक्षण आणि त्यांच्या उत्पन्नाच्या संधी यासाठी काम करते. २०१६ मध्ये स्थापन झालेली ही संस्था सध्या मुंबई, पुणे आणि दिल्ली येथे कार्यरत आहे.
 
उपस्थितांना संबोधत उदय निरगुडकर पुढे म्हणाले, समाजात काही माणसं माध्यमात गाजणारी असतात तर काही प्रत्यक्षात कार्य करणारी असतात. केशवसृष्टीने अमन शर्मा यांना पुरस्कार देऊन प्रत्यक्षात कार्य करणाऱ्या व्यक्तीचा खऱ्या अर्थाने गौरव केला आहे. टीच संस्थेतील मुलांनी आपल्या ऐकण्याच्या वैगुण्यावर नाही तर वैगुण्याच्या मानसिकतेवर मात केली आहे. अशा मुलांच्या कानावर हजारोंच्या संख्येत आवाज पडत असतील, की तुम्ही आयुष्यात काही करु शकत नाही. परंतु त्यापैकी एक आवाज अमन यांचा होता जो अशा मुलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहित करीत होता."
 
कार्यक्रमादरम्यान टीच संस्थेतील मुलांनी एक नाटकही सादर केले, जे पाहून अनेकजण भारावून गेले होते, तर काहींचे डोळे पाणावले होते. यावेळी व्यासपीठावर अमन शर्मा यांच्या पत्नी सोनाली कावेरी, केशवसृष्टीचे अध्यक्ष सतीश मोढ, केशवसृष्टी पुरस्कार समिती अध्यक्षा अमेया जाधव उपस्थित होत्या.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0