बाबा सिद्दीकी यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात

13 Oct 2024 21:49:05

baba siddiqui funeral
 
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री लॉरेन्स बिश्नोई गँगच्या लोकंनी हत्या केली. संबंधित प्रकरणात ३ आरोपींना पकडण्यात पोलीस प्रशासनाल यश आले असून चौथ्या आरोपीची ओळख पटली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर आज सकाळी त्यांचे पार्थिव मुंबई महापालिकेच्या कुपर हॉस्पिटल येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आलं होतं. त्यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन झाल्यानंतर, त्यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी आणले गेले.

राज्यातील अनेक दिग्गज नेते, बॉलिवूड कलाकार यांनी बाबा सिद्दीकी यांच्या घरी जाऊन त्यांचे अंतिमदर्शन घेतले.यानंतर रात्री आठ वाजताच्या सुमारास बाबा सिद्दीकी यांचे पार्थिव घराबाहेर आणण्यात आले. यावेळी नमाज ए जनाजाचं पठण करण्यात आलं. नमाज ए जनाजा अदा केल्यानंतर बाबा सिद्दीकी यांच्या अत्यंयात्रेला सुरुवात झाली. यावेळी मुंबई पोलिसांनी बाबा सिद्दीकी यांना सलामी दिली. बाबा सिद्दीकी यांच्या अंत्य दर्शनासाठी त्यांच्या हजारो समर्थकांनी प्रचंड गर्दी केली. बाबा सिद्दीकी यांच्या वांद्रे येथील राहत्या घराहून मरीन लाईन्स येथील बडा कब्रस्तान पर्यंत बाबा सिद्दीकी यांची अंत्ययात्रा काढण्यात आली आहे.

बाबा सिद्दीकी यांनी गेली चार दशके काँग्रेस मध्ये काम केले. बाबा सिद्दीकी यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत चांगले संबंध होते. त्याच सोबत बॉलीवूडच्या सिनेतारकांसोबत त्यांचे चांगले संबंध होते. शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यातील वादाला बाबा सिद्दीकी यांच्यामुळे पूर्णविराम मिळाला. त्यांच्या हत्येसंदर्भात, पोलीस कसून चौकशी करत आहेत.


 
Powered By Sangraha 9.0