भारतीय क्रीडांगणावरील फ्लडलाईट...

13 Oct 2024 22:01:08
 
Ratan Tata Passed Away
 
भारताचे थोर उद्योगमहर्षी रतन टाटा यांचे नुकतेच निधन झाले. टाटा उद्योग समूहाने मिठापासून ते अगदी गाड्यांपर्यंत जवळपास सर्वच क्षेत्रांत आपल्या सर्वोच्च कामगिरीने ग्राहकांचा विश्वास संपादित केला. त्याचबरोबर सामाजिक, आरोग्य क्षेत्रातील टाटा समूहाचे सेवाकार्य हे अवर्णनीय. पण, याबरोबरच टाटांनी फार पूर्वीपासून क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि क्रीडापटूंना प्रोत्साहन देण्यासाठीही भरीव योगदान दिले आहे. त्याचा आढावा घेणारा हा माहितीपूर्ण लेख...
 
खाद्या व्यक्तीला स्वतः यशस्वी क्रीडापटू व्हायचं असेल, तर त्याची पाऊले योग्य मार्गावर, योग्य त्या दिशेनं पडली पाहिजेत. त्यासाठी जरी क्रीडापटू म्हणून अगदी ऑलिम्पियन व्हायचं नसले, तरी क्रीडाक्षेत्रावर प्रेम करत राहणे हे महत्त्वाचं असते. खेळांचं महत्त्व आपल्या जिवनात अनन्यसाधारण असते हे थोर माणूस जाणतोच. क्रीडाक्षेत्रात इतरांसाठी झटून कार्य करणे आणि देशाला ऑलिम्पियन होण्याच्या मार्गावर चालणार्‍यांसाठी अहोरात्र ‘फ्लडलाईट’ सारखे उजेड दाखवायचे कार्य करणे देखील तितकेच मोलाचे असते.
 
भारतीय क्रीडाविश्वाचे आद्य प्रवर्तक : आपण या लेखात एका अशा व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलणार आहोत, की ज्याने क्रीडाक्षेत्रात भारताचं नाव उज्वल करण्याचा विडा उचलला होता. आज क्रीडाजगतच नव्हे, तर सर्वच क्षेत्रात ते निरंतर लोकप्रिय ठरलेले आहेत. ते नाव आहे भारतीय खेळांना आकार देणार्‍या एका आद्य प्रवर्तकाचे, शरीराने जरी नसले, तरी मनाने आपल्यातच असलेले, त्या टाटा कुटुंबातील रतन टाटा यांचे. भारतीय क्रीडाविश्व त्यांना कदापी विसरू शकत नाही. दि. ९ ऑक्टोबर २०२४ रोजी बुधवारी रात्री मुंबईतच रतन टाटांचे निधन झाल्याची बातमी कानी पडताच, आपण सारे शोकसागरात बुडालो आणि विविध क्षेत्रातील प्रत्येक व्यक्ती त्यांच्या आठवणीत रममाण झालो. क्रीडाविश्वदेखीलही त्यापेक्षा वेगळं नव्हतं.
 
एखादा क्रीडाप्रकार जर स्वतः रतन टाटांनी किंवा त्यांच्या आधीच्या पिढीने अंगिकारला असता, तर त्यांनी त्या क्रीडाप्रकारात नक्कीच अव्वल स्थान प्राप्त केले असते. त्यांनी क्रिकेटची बॅट, हॉकीची स्टीक हातात घेतली असती, तर त्यांनी त्या खेळाचं कर्णधारपद नक्कीच पेलले असते. कारण, कोणत्याही क्षेत्रात अथक परिश्रम करणे, त्यात नैपुण्य मिळवणे, संघातील खेळाडूंचे मन जिंकणे, हे आवश्यक असलेले गुण त्यांच्यात उपजतच होते. उद्योगजगत आणि समाजसेवा यात त्यांनी ते सिद्ध करून दाखवलेही आहे.
 
टाटा क्रीडाजगत: रतन टाटांचे नाव घेतलं की, आपल्या मुखी नाव येते ते टाटा उद्योग समूहाचे. क्रिकेट, फुटबॉल, हॉकीपासून ते अ‍ॅथलेटिक्स, बुद्धिबळ, स्क्वॅश, बास्केटबॉलपर्यंत, भारतीय खेळांच्या विकासात टाटा समूह अग्रेसर आहे. भारतीय क्रीडाविश्वावर टाटा समूहाचा प्रभाव अनेक दशकांपासून आढळून येतो. सन १९२० सालापासून टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे पुत्र सर दोराबजी टाटा यांनी, ‘अ‍ॅन्टवर्प क्रीडा स्पर्धां’साठी भारताचा पहिला ऑलिम्पिक संघ प्रायोजित केला होता. यामुळे भारतात खेळाप्रती टाटा समूहाच्या वचनबद्धतेचा पाया रचला गेला.
 
टाटांचे पुण्याशी असलेल नाते: त्यावेळेपासून पुण्याचे आणि टाटांचे नाते उद्योग जगतासारखेच क्रीडाजगताशीही जोडले गेले आहे. भारतीयांनी ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग घ्यावा, अशी इच्छा सर दोराबजी टाटा यांची होतीच, १९१९ साली त्यांनी ती इच्छा तत्कालीन बॉम्बेचे राज्यपाल लॉर्ड जॉर्ज यांच्याकडे व्यक्तही केली होती. पुण्यातील प्रसिद्ध अशा डेक्कन जिमखान्यात, एका क्रीडा महोत्सवादरम्यान टाटा आणि जॉर्ज यांची भेट झाली. टाटा तेव्हा डेक्कन जिमखान्याचे अध्यक्ष होते, तर जॉर्ज प्रमुख अतिथी म्हणून आले होते. ब्रिटीश ऑलिम्पिक समितीने भारताला ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची परवानगी द्यावी, अशी टाटांनी त्यावेळेस मागणी केली. पुढे फेब्रुवारी १९२० साली ‘आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती’ने भारताला ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्याची मान्यता दिली. मार्च महिन्यात दोराबजी टाटा, ए. एस. भागवत, डॉ. ए. एच. ए. फैझी, प्रोफेसर मोडक, एस. भूत आणि डेक्कन जिमखान्याचे तीन सदस्य यांची समिती नेमली गेली. त्यांनी एप्रिल महिन्यात ऑलिम्पिक सहभागासाठी चाचणी घेण्याचे ठरवले.
या चाचणीतून सहा खेळाडूंची निवड झाली. ज्यामध्ये बंगालचे पी. सी. बॅनर्जी (स्प्रिन्ट), बंगळुरूचे पी. डी. चौगुले (दहा हजार मीटर व मॅरेथॉन), साताराचे सदाशीव दातार (दहा हजार मीटर व मॅरेथॉन), हुबळीचे अ‍ॅड. डी कैकाडी (पाच हजार व दहा हजार मीटर) यांच्यासह कोल्हापूरचे दिनकरराव शिंदे व बॉम्बेचे के. नवले या कुस्तीपटूंचाही समावेश होता. भारताचे ऑलिम्पिकमधील कुस्तीमधील पदार्पण या दोन खेळाडूंमुळे झाले आहे. सोहराब एच. भूत हे मॅनेजर होते, तर डॉ. ए. एच. ए. फैझी हे वैद्यकिय अधिकारी व सल्लागार म्हणून त्यावेळी संघासोबत गेले होते.
 
भारताचा ऑलिम्पिक सहभाग निश्चित झाला. कोण जाणार त्याचीही निवड झाली. परंतु, खर्चाचं काय? यासाठी दोराबजी टाटा यांनी त्याकाळातील आठ हजार रुपयांची मदत केली, भारत सरकारने सहा हजार रुपये दिले, आणि बॉम्बेच्या क्रीडा प्रेमींनी मिळून सात हजार, असे एकूण २१ हजार रुपयांची वर्गणी गोळा केली. ५ जून रोजी बॉम्बेहून हा संघ अ‍ॅन्टवर्पच्या दिशेने निघाला. तत्पूर्वी लंडन येथील स्टॅमफोर्ड ब्रिज स्टेडियमवर इंग्लिश कोच एच. पॅरी यांच्या मार्गदर्शनाखाली, सहा आठवडे खेळाडूंचा सराव शिबीर पार पडले. चौघुले यांनी मॅरेथॉनमध्ये आणि दिनकरराव यांनी कुस्तीत चांगली कामगिरी करून दाखवली.
 
या ऑलिम्पिक स्पर्धेनंतर भूत यांनी एक अहवाल सादर केला. ज्यामध्ये भारत हॉकी आणि कुस्तीमध्ये भविष्यातील ऑलिम्पिकमध्ये यश मिळवू शकतो, असे नमूद केले. आगामी ऑलिम्पिक संघांसाठी तांत्रिक, संघटनात्मक आणि प्रशिक्षण समस्यांबाबत शिफारसीही त्या अहवालात केल्या गेल्या. दोराबजी टाटा यांच्या सल्ल्यानुसार, तात्पुरत्या ‘भारतीय ऑलिम्पिक समिती’ची स्थापना केली गेली. या समितीने १९२४ साली ऑलिम्पिकसाठी भारतीय संघ पाठवला आणि १९२७ साली ‘भारतीय ऑलिम्पिक संघटना’ बनली.
 
सर दोराबजी टाटा यांनी भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे पहिले अध्यक्ष म्हणून जबाबदारी संभळली, तेथूनच पुढे टाटा कुटुंबाचा भारतीय क्रीडाविश्वाला चालना देण्याचा वारसा सुरु झाला. रतन टाटा यांचे वडील नवल टाटा यांनी तर, भारतीय हॉकीला उंचावण्यात मोलाचा वाटा उचलला. भारतीय हॉकी संघटनेचे एक दशकाहून अधिक काळ नेतृत्व केले. ज्या दरम्यान भारताने सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकी खेळात सुवर्णपदके मिळविली. आज ‘नवल टाटा हॉकी अकादमी’ हे कार्य पुढं नेत आहे. वंचित तरुणांना संधी देत, हॉकीत चमक दाखवणारे खेळाडू तेथे घडवले जात आहेत.
 
खेळाच्या विकासात टाटा समूहाची गुंतवणूक ही विलक्षण आहे. जमशेदपूर इथल्या जेआरडी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये १९९१ साली उद्घाटन झालेल्या जागतिक दर्जाच्या सुविधेपासून, टाटा फुटबॉल अकादमीपर्यंत उच्च श्रेणीतील फुटबॉल प्रतिभा निर्माण करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या टाटा यांच्या खेळातील सहभागाने, विविध क्रीडाप्रकाराला स्पर्श केला आहे. ‘इंडियन सुपर लीग’मध्ये खेळणारा जमशेदपूर एफसी हा क्रीडागाराची मालकी असलेला एकमेव संघ आहे. यामुळेच खेळाच्या पायाभूत सुविधांबाबत टाटा समूहाची खोलवर रुजलेली बांधिलकी अधिकच दृढ होते.
 
रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ’द ब्रिज’ या क्रीडाविषयक मासिकने, टाटा समूहाने भारतीय क्रीडा जगतात केलेल्या महत्त्वाच्या गुंतवणुकीची आणि योगदानांची यादी आपल्यासाठी संकलित केली आहे. त्याची आपण दखल घेऊ म्हणजे, क्रीडाक्षेत्रातील टाटाही आपल्याला समजतील.
 
‘जेआरडी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स’: आठ मार्गिका असलेलं कृत्रिम धावपट्टीचं मैदान, आंतरराष्ट्रीय दर्जाचे पोहण्याचे तलाव, मुष्टियुद्ध सराव केंद्र, बास्केटबॉल, स्केटिंग, तिरंदाजी, हॅण्डबॉल, लॉन टेनिस इत्यादी सुविधा, जेआरडी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आहेत. १९९१ साली उद्घाटन झालेल्या, जमशेदपूरमधील ३० एकरच्या क्रीडा संकुलात, १८ क्रीडा शाखा चालविण्याची सुविधा आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं फुटबॉल मैदान असून, तेथे २५ हजार क्षमतेचे क्रीडागार देखील आहे. विशेष म्हणजे ‘जमशेदपूर एफसी’ हा इंडियन सुपर लीगमधील एकमेव असा संघ आहे, ज्याचे स्वतःचे क्रीडागार आहे. तर बाकीचे संघ त्यांचे सामने खेळण्यासाठी ते ठिकाण भाड्याने घेतात.
 
कीनन स्टेडियम: १९ हजार आसन क्षमतेच्या १९३९ साली तयार केलेल्या क्रिकेट मैदानात, शंभरहून अधिक रणजी करंडक, दुलिप चषक स्पर्धांचं आयोजन, तसेच अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने या कीनन क्रीडागारात खेळवण्यात आले आहेत. शिवाय अनेकदा तेथे फुटबॉल स्पर्धांचेही आयोजन करण्यात येते. तसेच नुकत्याच आयोजित झालेल्या धनुर्विद्येच्या स्पर्धादेखील तेथेच खेळवल्या गेल्या होत्या.
 
टाटा फुटबॉल अकादमी: जवळपास पाच एकर जागेत तयार केलेल्या, ‘जमशेदपूर एफसी’ या फुटबॉल अकादमीसाठी अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध असलेल्या क्रीडागारात, फुटबॉलपटू घडवले जात आहेत. वातानुकूलित वसतिगृहं, फ्लडलाईट्सची सुविधा असलेले मैदान, अत्याधुनिक व्यायामशाळा, याचा फायदा जमशेदपूर आणि जमशेदपूरच्या आसपासचे फुटबॉल प्रेमी घेत आहेत.
 
नवल हॉकी अकादमी: भारतीय हॉकी संघानं जेव्हा सलग तीन सुवर्णपदक ऑलिम्पिकमध्ये मिळवली होती, त्या भारतीय हॉकी संघाचे सराव शिबीर आयोजित करण्यात, नवल हॉकी अकादमीचा मोठा सहभाग होता. भारतात हॉकीचा प्रसार होण्यास तसेच, आदिवासी युवकांना हॉकीच्या माध्यमातून आपलं करिअर घडवण्यात, नवल हॉकी अकादमी मोठ कार्य करत आली आहे.
टाटा धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्र: ‘टाटा आर्चरी अकादमी’ची स्थापना १९९६साली करण्यात आली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सहभाग घेत, धनुर्विद्येचं ज्ञान आत्मसात करण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने निवासी प्रशिक्षणाची सोय इथे उपलब्ध आहे. झारखंड-ओरिसा या क्षेत्रातील आदिवासी समाजातील धनुर्धर शोधून, त्यांचा विकास करण्यासाठी येथे उपक्रम राबविण्यात येतात. दीपिका कुमारी, अंकिता भाकट अशा महिला धनुर्धर येथूनच देशाला मिळाल्या आहेत. मॅरेथॉनचं आयोजन: टाटा मुंबई मॅरेथॉन आणि टाटा अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेचे प्रायोजकत्व, २०१७ सालापासून टाटांकडेच आहे. त्या मॅरेथॉनच्या स्पर्धेत समाजाकडून निधी गोळा करून, तो गरजूंना मदत म्हणून देण्यात येतो.
 
टाटांकडून भारतीय क्रीडाजगताला मिळालेल्या या भरीव योगदानाच्या बळावरच, भारतीय क्रीडाविश्व आज समृद्ध होत जागतिक पातळीवर भारताचा लौकिक वाढवत आहे. कधी न विझणारे टाटांचे फ्लडलाईट्स सतत आपल्या क्रीडाविश्वास उजेड देत राहोत, अशा भावना व्यक्त करत रतन टाटा यांना आपण सारे क्रीडाप्रेमी चिरंतन स्मरणात ठेवत, त्यांना या लेखाच्या माध्यमातून नमन करत आहोत. रतन टाटांचा वारसा पुढे चालवण्यास त्यांचे (सावत्र) बंधू नोएल टाटा हे आता पुढे सरसावले आहेत, त्यांना आणि त्यांच्या संपूर्ण संघालाही आपण मनापासून शुभेच्छा देऊ.
 
इति।
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकी पटू आहेत)
 
श्रीपाद पेंडसे 
 
Powered By Sangraha 9.0