सामाजिक समरसतेचे दार्शनिक - स्व.दत्तोपंत ठेंगडी

13 Oct 2024 23:22:37
 
Mr. Dattopant Thengadi
 
देशातील अग्रगण्य ‘कामगार संघटने’चा लौकिक असलेल्या भारतीय मजदूर संघाबरोबर, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सामाजिक समरसता मंच, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, अधिवक्ता परिषद, सर्व पंथ समादर मंच, स्वदेशी जागरण मंच, पर्यावरण मंच इत्यादी राज्य व राष्ट्रीय स्तरावरच्या संस्थांच्या पालकत्वाची जबाबदारी ज्यांनी समर्थपणे संभाळत, त्या संस्था निर्मितीक्षम करत, जीवनाच्या सर्व क्षेत्रात पोहोचवून सर्वव्यापी केल्या, त्या सर्वच संस्था केवळ संस्था न राहता, संस्कारक्षम चळवळी झाल्या. त्याचे श्रेय स्वर्गीय दत्तोपंत ठेंगडी यांच्याकडे जाते. परंतु ’श्रेयाचा मज नको लेशही, निर्माल्यात विरावे!’ अशी मनोभूमिका असलेल्या दत्तोपंतांचा आज दि. १४ ऑक्टोबर रोजी पुण्यस्मरण दिवस, व तारखेने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेल्या ‘धम्मदीक्षेचा-धम्मचक्रप्रवर्तनदिन.’ काय योगायोग आहे पाहा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि स्व.दत्तोपंत ठेंगडी यांचा विशेष स्नेह होता. हा दिवस ‘भारतीय मजदूर संघ’, ‘सामाजिक समरसता दिन’ म्हणून साजरा करत असतो. यानिमित्ताने त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!
 
‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’ने हाती घेतलेल्या, भारताला पुनर्वैभव प्राप्त करून देण्याच्या कार्यात किंवा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या भाषेत सांगायचे झाल्यास, ’राष्ट्रीय पुननिर्माणाच्या व्यापक संदर्भात’ विद्यार्थी हा उद्याचा नागरिक नाही, तर तो आजचा नागरिक आहे. त्यामुळे त्याच्यावर शैक्षणिक जबाबदारी आहेच. पण, त्याचबरोबर त्याने देशाप्रती विधायक भूमिका घेऊन, सामाजिक काम केले पाहिजे, असा आग्रह एखाद्या विद्यार्थी संघटनेचा असला पाहिजे, असा विचार घेऊन स्थापन झालेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अन्य संस्थापकांपैकी दत्तोपंत ठेंगडी हे एक होते.
 
दि.१० नोव्हेंबर १९१९ साली दत्तोपंतांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील आर्वी या गावी झाला. बालपणापासूनच ते संघाच्या संपर्कात आले, तेव्हापासून त्यांच्यात देशभक्ती आणि परकीय इंग्रज सत्तेविषयीचा प्रचंड राग होताच, त्यातूनच शाळेतील व्हिक्टोरिया राणीच्या वाढदिवसाच्या प्रसंगाला, त्यांनी केलेला विरोध हे प्रसंग त्यांच्या नेतृत्वाची चुणूक दाखवणारे होते.
 
महाविद्यालयीन बी.ए.,एल.एल.बी.पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर, घरातला एकुलता एक मुलगा असूनही, त्यांचा संघकामासाठी पूर्णवेळ काम करण्याचा हट्ट आणि आग्रह त्यांच्या आई-वडिलांना मोडता आला नाही, आणि ते संघाचे प्रचारक झाले. त्यावेळी त्यांना कम्युनिस्टनचा गड असलेल्या केरळ राज्यात कामासाठी पाठवण्यात आले. तिथे काही वर्ष काम केल्यानंतर, त्यांनी काही काळ बंगाल, महाराष्ट्र, मध्य प्रदेश उत्तर इ. राज्यात संघकामाची आवश्यकता लक्षात घेऊन, त्यांनी ११ विविध भाषा आत्मसात करत, त्या त्या भाषांमध्ये लेखनही केले.
 
संघकामाची व्यवहार सूत्रे ही संघाच्या मनुष्य निर्माण प्रक्रियेचे, कार्यकर्ता निर्माण प्रक्रियेचे मुळारंभ आहेत. याचे महत्त्व पटवून देताना दत्तोपंत एका जुन्या कार्यकर्त्याचा प्रसंग सांगतात, “विनोबा भावे यांनी पवनार येथे एक आश्रम सुरू केला. काही वर्षांनंतर ते भूदान चळवळीसाठी बाहेर पडले.
 
त्यापूर्वी त्यांना आश्रम सोडण्यापर्यंतच्या काळातील सर्व हिशोब बरोबर लिहिला आहे की नाही हे पाहायचे होते. ते काम त्यांनी एखाद्या सर्वोदयी कार्यकर्त्याकडे सोपवले नाही, तर तत्कालीन संघाचे अ.भा.व्यवस्था प्रमुख वसंतराव बापट यांच्याकडे सोपविले. त्यांनी सर्व हिशोब बारकाईने तपासून असा अहवाल दिला की, १९४२ सालच्या काही महिन्यांचा हिशोब सोडून बाकी सर्व हिशोब योग्य पद्धतीने व अचूकपणे लिहून ठेवला आहे. हिशोबाच्या संदर्भात आपल्या कार्यकर्त्यांची अशी चोख, काटेकोरवृत्ती असल्यामुळे, आपल्या कार्यकर्त्यांविषयी समाजात खूपच विश्वास दिसून येतो.”
 
१९४९ सालच्या सुमारास दत्तोपंतांकडे कामगार क्षेत्राच्या कामाची जबाबदारी आली. त्यांना त्या क्षेत्राचा अनुभव नव्हता. त्यासाठी सुरूवातीला काही काळ त्यांनी, ‘आयटक’, ‘इंटक’च्या विविध संघटनांमध्ये काम केले. तसेच, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांबरोबरही त्यांच्या एस.सी., एस.टी युनियनचे सरचिटणीस म्हणून काम केले. तसेच, त्यांच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी व्यवस्थापक म्हणून देखील, त्यांनी काम केले होते. या सर्व अनुभवाच्या शिदोरीवर दत्तोपंत्तानी दि. २३ जुलै, १९५५ साली, देशातील ३५ निवडक संघस्वयंसेवकांच्या समवेत भोपाळ येथे ‘भारतीय मजदूर संघ’ या कामगार संघटनेची स्थापना त्यांनी केली. ’दुनिया के मजदूरो एक हो’ या तत्कालीन कम्युनिस्ट प्रणित संघटनांच्या घोषणांना पर्याय वाचक घोषणा म्हणून, “देश के हित मे करेंगे काम, काम के लेंगे पुरे दाम, राष्ट्रभक्त मजदूरो एक हो, एक हो!” भारत माता की जय या घोषणा दिल्या. लाल बावटयाला भारतीय प्राचीन संस्कृतीचा प्रतिक असणार्‍या, भगव्या ध्वजाचा भक्कम पर्याय दिला. “भगवा ध्वज, विश्वकर्मा आदर्श, भारत माता की जय, देश के हीत मे करेंगे काम, काम का लेंगे पुरा दाम!” या घोषणा हीच ‘भारतीय मजदूर संघा’ची स्वतंत्र ओळख ठरली. राष्ट्रहिताअंतर्गत उद्योग हित, उद्योग हिताअंतर्गत कामगार हित, असा अनोखा आदर्श संस्कार त्यांनी समस्त कामगारवर्गावर केला. ‘राष्ट्रहित-उद्योगहित-कामगार हित’ हा अनोखा प्राधान्यक्रम इतर संघटनापेक्षा निराळा होता. त्याचा परिणाम म्हणजे, संघटनेने १९९४ साली ३४ लाख सभासद संख्येसह मजबूत संघटन उभे करून, आजही देशातील प्रथम क्रमांकाची कामगार संघटना असा ‘भारतीय मजदूर संघा’चा लौकिक आहे. त्यामागे ठेंगडीजींचे अपार कष्ट, त्यांचे कुशल नेतृत्व, त्याग-बलिदान या विचाराने भारलेल्या हजारो कार्यकर्त्यांचा त्यात सहभाग होता.
 
चीन आणि पाकिस्तानने केलेल्या आक्रमणाच्या वेळी, दत्तोपंतांनी ‘राष्ट्रीय कामगार मंच’ स्थापन केला. त्या माध्यमातून सरकारला मदत केली. संप, टाळे बंदी आपल्या मागण्या सर्व विषय बाजूला ठेवले. तसेच, आणीबाणीच्या काळात निर्माण झालेल्या लोकशाही बचाव आंदोलनात, सक्रिय सहभाग घेतला. श्री जयप्रकाश नारायण आणि अन्य सर्व नेते अटक झाल्यानंतर, भूमिगत राहून या आंदोलनाची धुरा सांभाळली. या काळात हजारो कार्यकर्त्यांनी लोकशाही वाचवण्यासाठी कारावास पत्करला.
 
प्रत्येक देशाला आपला विकास करण्याचा हक्क आहेच. पण, तो त्यांच्या स्वतःच्या उत्पादनातून होईल असा विचार मांडला. त्यासाठी स्वतःची बाजारपेठ निर्माण केली पाहिजे, यासाठी स्वदेशीचा आग्रह धरत दत्तोपंतांनी १९९० साली ‘स्वदेशी जागरण मंचा’ची स्थापना केली. लोक आपल्याला वेड्यात काढतील हे धरून चला, मात्र हाच विचार जगाला तारणार आहे. भांडवलवाद आणि साम्यवाद हे दोन्ही विचार मानवाच्या गरजा पूर्ण करू शकणार नाही, समाजाचे प्रश्न सोडवू शकणार नाहीत, हे लवकरच स्पष्ट होईल, हे त्यांनी जाणले. त्यावेळी तिसर्‍या पर्यायाच्या शोधात लोक राहतील. तो पर्याय भारत देऊ शकेल, म्हणून ‘थर्ड वे’ नावाचे पुस्तक त्यांनी लिहिले.
 
भारतीय समाज हा विविध पंथ, पूजा पद्धती मानणार्‍या व्यक्तींनी सामावलेला आहे. त्यामुळे कामगार क्षेत्रामध्ये या विषयावरून मतभेद, वाद निर्माण होता कामा नये, अशी काळजी त्यांनी घेतली. सर्वच पंथांचा मुख्य उद्देश हा मानव कल्याण आहे. व्यक्तीला सुख , शांती आणि समाधान मिळवून देणे हाच आहे. म्हणून या सर्व पंथांचा समान आदर आपण केला पाहिजे, या उद्देशाने सर्व पंथ समादर मंचाची स्थापना केली. तसेच, देशाचा औद्योगिक, आर्थिक, सामाजिक विकास करण्याबरोबरच, पर्यावरणाचे रक्षण करणे ही पण आपली जबाबदारी आहे, ही भावना रुजवण्यासाठी ‘पर्यावरण मंच’ स्थापना केला.
 
१९७० सालच्या दशकातील घटना आहे. मा. दत्तोपंत ठेंगडी राज्यसभेत खासदार होते, केरळच्या एका कम्युनिस्ट माणसाने त्यांना एका चहापानाच्या वेळी विचारले, ’What is the full form of RSS? त्याचे उत्तर मिळाल्यावर पुढचा प्रश्न आला, ’Who was the founder of it ? ठेंगडींनी डॉ. हेडगेवार हे नाव सांगितले. त्यावर ते खासदारसाहेब कुत्सितपणे हसत म्हणाले, ’I never heard his name ?’ ठेंगडी शांत राहिले. तिथेच पालाघाटचे श्री. मेनन उपस्थित होते, त्यांनी कम्युनिस्ट खासदाराला टोकले, आणि ही चेष्टा योग्य नाही, हे सांगितले. पण, ऐकतील ते कम्युनिस्ट कसले? त्यावर मेनन म्हणाले, ’मला दोन प्रश्नांची उत्तरे द्या, पहिला पंडित नेहरू कधी वारले?’ ’मे 1964’ ’बरं ते गेले, तेव्हा त्यांची किर्ती किती होती?’ ’अहो ते विश्वनेते होते. नासेर टिटो यांच्या सोबतचे होते. मग, मेनन ठेंगडींकडे वळले आणि म्हणाले, ’आपले डॉक्टर कधी गेले? आणि त्यांना किती माणसे तेव्हा ओळखायची?’ ’जून 1940, मध्य प्रांतातील लोक मुख्यत्वे डॉक्टरांना ओळखायचे’ दत्तोपंत उत्तरले. मग आता मला सांगा, ’डॉक्टर नेहरूंच्या 24 वर्षे आधी गेले, आणि पंडितजी अगदी अलीकडे. पंडितजी विश्वनेता तर डॉक्टरसाहेब केवळ मध्य प्रांतात परिचित. मग आज जर नेहरूंच्या विचारासाठी समर्थनासाठी जगण्यास, मरण्यास, सर्वस्व देण्यास सांगितले, तर किती जण तयार होतील ? आणि डॉक्टरांच्या विचारासाठी जगण्यास, मरण्यास, सर्वस्व देण्यास सांगितले, तर किती जण तयार होतील? पंडितजींच्या विचारासाठी जगण्यासाठी संपूर्ण देशात 50 जण ही पुढे येणार नाहीत आणि डॉक्टरांच्या सिद्धांतासाठी हजारो पुढे येतील, हे आपण सर्वच जाणतो’. चर्चा बदलली होती, मग कम्युनिस्ट माणूस चिडला आणि म्हणाला , Then What is the criteria of one's greatness?’ मेनन तत्क्षणी उत्तरले ’ The length of one's shadow on future. ती सावली Shadow किती मोठी आहे याची जाणीव सर्वांना आहे.
 
आज संघ शताब्दीवर्षामध्ये प्रवेश करत असताना संघाला आजही काही राजकीय व्यक्ती, पक्ष-संघटना द्वेषाने, अज्ञानातून विरोध करत आहेत. अशा प्रवृतींवर दत्तोपंतांनी पूर्वीच विचार करून ठेवल्याचे जाणवते. ते म्हणतात, “आज हिंदुत्वाचा सर्वात मजबूत किल्ला म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. ’सर्वेषां अविरोधेन’ कार्य करण्याची संघाची रीत आहे. परंतु त्यामुळे त्याला विरोध करण्याची वृत्ती कधीही निर्माण होणार नाही, हे मानसशास्त्राच्या दृष्टीने असंभवनीय आहे. संघाचे कार्य वाढत आहे, हे त्यांना पाहवत नाही. परंतु ’स्वतःला मूल होईना व दुसर्‍याला झालेले पाहवेना’ अशा उदात्त मानवतावादाने, त्यांची अंत:करणे भारावलेली आहेत. त्यामुळे वर्धिष्णू संघशाक्तीला विरोध करणे हे त्यांचे पवित्र कर्तव्यच आहे.” या मंडळींना संघ समजावून सांगणे व्यर्थ आहे. कारण, तो त्यांना मनातून पूर्ण समजलेला आहे. झोपी गेलेल्याला जागे करता येते, पण झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करणे कुणालाही शक्य नाही. अशीच या प्रगतीशील मंडळींची गोष्ट आहे. ’विरोधासाठी विरोध’ हे त्यांचे ब्रीद आहे. परंतु प्रत्यक्ष संघटन किंवा रचनात्मक कार्य करून, संघाच्या रेषेपेक्षा स्वतःची रेषा मोठी करण्याची कल्पनाही त्यांच्या मनात येणे शक्य नाही. कारण ते त्यांच्या कुवतीच्या बाहेरचे आहे, आणि हे सत्य ते पूर्णपणे जाणतात. त्याचबरोबर त्यांच्या दृष्टीने संघाच्या दुर्बलतेचा बिंदूही ते जाणतात. तो बिंदू म्हणजे संघाची प्रसिद्धीपराड्मुखता. प्रगतीशील मंडळींची शक्तीकेंद्रे म्हणजे वर्तमानपत्रांची कार्यालये. त्यांच्या प्रचारयुद्धातील रणनीती होती की, दलित समाज व संघ हे परस्परविरोधी आहेत, असा आभास निर्माण करणे. त्याचा उपयोग त्यांनी नागपूरच्या धम्मचक्रप्रवर्तनाच्यावेळी केला. नागपूर हे संघाचे केंद्र असल्यामुळेच, संघाला चिडवण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर निवडले. ही गोष्ट डॉ.आंबेडकरांच्या कानावर गेली. ते म्हणाले, “बौद्ध धर्म प्रसाराचा नाग लोकांशी संबंध असल्याने दीक्षाविधीसाठी नागपूर निवडले, संघाचे केंद्र आहे म्हणून मुळीच नाही. अशा बोलणार्‍यांची कल्पना खोटी व द्वेषप्रेरित आहे.” स्वतः डॉ.बाबासाहेबांनीच असे स्पष्टीकरण दिल्याने प्रगतीशील मंडळींच्या अपप्रचाराला यश आले नाही.
 
वस्तुतः डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी पूर्ण माहिती होती. १९३५ साली त्यांनी पुणे येथील महाराष्ट्राच्या पहिल्या संघशिक्षावर्गाला भेट दिली होती. त्यावेळी डॉ.हेडगेवार यांच्याशीही त्यांची भेट झाली होती. व्यवसायाच्या निमित्ताने ते दापोली येथे गेले असता, तेथील संघशाखेला भेट दिली होती व स्वयंसेवकांशी मनमोकळेपणाने संघाविषयी चर्चा केली होती. १९३७ साली कराड येथील संघशाखेच्या विजयादशमी उत्सवाच्या प्रसंगी डॉ.आंबेडकरांनी केलेले भाषण, व संघाविषयी व्यक्त केलेले विचार स्मरणात असलेली मंडळी सांगत असत. सप्टेंबर,१९४८ साली श्रीगुरुजी व डॉ.आंबेडकरांची भेट दिल्ली येथे झाली होती. म.गांधींच्या हत्येनंतर सरकारने आकसाने घातलेली बंदी उठवण्याकरिता डॉ.बाबासाहेब, सरदार वल्लभभाई पटेल व श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी खटपट केली होती.
 
पुण्यात १९३९ साली झालेल्या संघशिक्षावर्गाच्या संध्याकाळच्या कार्यक्रमात योजनेप्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर भेटीसाठी आले होते, डॉ.हेडगेवारही तिथे उपस्थित होते. संघस्थानावर सुमारे ५२५ गणवेशधारी स्वयंसेवक होते. डॉ.बाबासाहेबांनी डॉक्टरांना विचारले की, या स्वयंसेवकांमध्ये अस्पृश्य किती असतील? डॉ.हेडगेवार म्हणाले, चला, आपण ओळीत हिंडूनच पाहू. डॉ.बाबासाहेब म्हणाले, यामध्ये अस्पृश्य कोणीच ओळखू येत नाही. त्यावर डॉ.हेडगेवार म्हणाले, आता तुम्ही विचारा. मग डॉ.बाबासाहेबांनी विचारले, यात अस्पृश्य असतील त्यांनी एक पाऊल पुढे यावे. कुणीही हलले नाही. त्यानंतर डॉ.हेडगेवार म्हणाले, याठिकाणी आपण अस्पृश्य आहोत ही जाणीव कधीच दिली जात नाही. आता हवे, तर तुम्हाला ज्या कोणत्या पोटजाती अभिप्रेत असतील त्यांची नावे घेऊन विचारा. तेव्हा डॉ.बाबासाहेब म्हणाले, वर्गात कोणी महार, मांग, चांभार असे असतील, तर त्यांनी एक पाऊल पुढे टाकावे. असे म्हणताच कित्येक स्वयंसेवकांनी पुढे पावले टाकली, त्यांची संख्या शंभरच्या वर भरली. तिथे खर्‍या अर्थाने समरसतेचे दर्शन घडले होते. हे सर्व साक्षीभावाने दत्तोपंतांनी ’आपले बाबासाहेब’ पुस्तकात लिहिले आहे.
 
सामाजिक आणि कामगार क्षेत्रात बहुमोल कार्य केल्याबद्दल भारत सरकारने दत्तोपंतांना ’पद्मभूषण’ सन्मान जाहीर केल्यानंतर, तो सन्मान विनम्रतेने नाकारताना मा.राष्ट्रपती महोदयांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, जोपर्यत रा.स्व.संघाचे आद्यसरसंघचालक डॉ.हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक श्रीगोळवलकर गुरुजी यांना ’भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित केले जात नाही, तोपर्यंत आपण दिलेला सन्मान मला स्वीकारता येणार नाही. स्व.दत्तोपंतांची मनस्वी इच्छा पूर्णत्वास जाईल तो सुदिनच म्हणावा लागेल.
दत्तोपंत नेहमीच वैद्यकीय उपचारांसाठी डॉ.भीमाशंकर मुळ्ये यांच्या दवाखान्यात व नंतर दीनदयाळ हॉस्पिटलमध्ये जात असत. मी ही आबा अभ्यंकरांबरोबर एकदोनदा दत्तोपंतांना भेटायला गेलो. दत्तोपंत त्या कुटुंबाचे फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईडच होते. एकदा दत्तोपंतांना पंडित दीनदयाळ रुग्णालयात दाखल केले असता, तत्कालीन केंद्रीय श्रम मंत्री साहेबसिंग वर्मा आले. त्यांनी पाहिले, पंत डोळे मिटून पहुडलेले होते. मध्ये मध्ये ते आत डोकावून पाहात अस्वस्थपणे येरझारा घालत होते. पाणावलेले डोळे पुसत म्हणाले, ‘आधुनिक दधिची ऋषी हैं, दत्तोपंत!’ वर्मांचे बोल खरेच होते. स्व.दत्तोपंतांना विनम्र अभिवादन!
 
(लेखक अध्यासन प्रमुख, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आहेत.)
 
डॉ. सुनील भंडगे
 
Powered By Sangraha 9.0