एका अहवालानुसार, नवरात्रोत्सवात देशात एकूण ५० हजार कोटींची उलाढाल नोंदवली गेली. ऐन नवरात्रात भारतीय अर्थव्यवस्थेवर लक्ष्मीकृपा झाली आहे. मध्य-पूर्वेतील वाढत्या तणावाने, संपूर्ण जगात अस्थिरता असताना, भारतीय बाजारात झालेली ही उलाढाल चकीत करणारीच म्हणावी लागेल.
कान्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’च्या (कॅट) अंदाजानुसार नुकत्याच झालेल्या नवरात्रोत्सवात, देशभरात सुमारे ५० हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून देशभरात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या असेही हा अहवाल म्हणतो. त्यामुळे खर्या अर्थाने भारतीय अर्थव्यव्स्थेवर लक्ष्मीकृपा झाली आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात दुर्गापूजा, नवरात्री, रामलीला देशभरात उत्साहात साजरे केले जातात. उत्सवाच्या काळात मंडप बांधणे, मूर्ती बनविणे, सजावट, खाद्यसेवा आणि इतर विविध क्षेत्रात काम करणारे कारागीर, यांना या कालावधीत विशेषत्वाने रोजगार मिळाला. या कार्यक्रमांमुळे विविध उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार आणि व्यवसायाच्या संधी निर्माण झाल्या, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. मूर्ती तयार करणे आणि सजावटीचे साहित्य तयार करण्यात कारागिरांनी दिलेल्या भरीव योगदानामुळे कार्यक्रमांचे सौंदर्य तर वाढलेच, त्याशिवाय त्यांना आर्थिक दिलासाही मिळाला.
‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ने भारताच्या अर्थव्यवस्थेत लक्षणीय वाढ नोंदवली आहे. ही वाढ अंदाजे ५० हजार कोटी रुपये इतकी आहे. मध्य-पूर्वेतील तणावामुळे संपूर्ण जगात अनिश्चिततेचे वातावरण कायम असताना, भारतात नोंद झालेली वाढ लक्षणीय अशीच. भारतात साजरे होणारे सणवार येथील अर्थव्यवस्थेच्या वाढीचे प्रमुख चालक आहेत, असे म्हटले जाते. ते पुन्हा एकदा या आकडेवारीने अधोरेखित केले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पारंपारिक किरकोळ विक्री आणि उपभोगाची भूमिका ठळकपणे मांडली गेली आहे. विशेषत: वाढत्या उत्सवाच्या क्रियाकलापांच्या काळात ही वाढ किती लक्षणीय असते, हे यातून समोर येते. या आकडेवारीत आणखी वाढही नोंद होऊ शकते. भारतीय बाजारपेठेतील वाढीचे जे अनेक घटक आहेत, त्यांच्या गतिशीलतेला मांडण्याचे काम या अहवालाने केले आहे, असे म्हटले तर ते फारसे चुकीचे ठरणार नाही.
भारतातील सणांचा हंगाम हा ग्राहकांच्या खर्चाचा काळ असतो. दिवाळी, दसरा, छठपूजा हे सण केवळ धार्मिक सण न राहता, ते अर्थव्यवस्थेच्या चक्राला गती देण्याचे काम करताना विशेषत्वाने दिसून येतात. सणवार हे सांस्कृतिक कार्यक्रम असून, या कालावधीत ते असंख्य क्षेत्रांमध्ये मागणीची वाढ नोंदवतात. ही वाढलेली मागणी विविध स्वरूपात प्रकट होते. नवीन कपडे आणि दागिने खरेदी करणे, घरांचे नूतनीकरण करणे, इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करणे, आणि भेटवस्तू देत उत्सव साजरा करणे असे ढोबळमानाने याचे स्वरुप असले, तरी समाजातील सर्व अठरापगड जातींच्या हाताला या दरम्यान काम मिळते. म्हणूनच, या उत्सवांच्या कालावधीत एकूण आर्थिक क्रियाकलापांना भरीव चालना मिळते. श्रावण महिन्यापासून हिंदू धर्मियांचा चातुर्मास अर्थाच सणवारांचा कालावधी सुरू होतो, तो दिवाळीपर्यंत कायम असतो. या पूर्ण कालावधीत भारतात मागणीला बळ मिळालेले असते.
सणासुदीच्या हंगामाचा फायदा प्रामुख्याने असंघटित क्षेत्राला होतो, जो भारताच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहे. संघटित क्षेत्राच्या विपरीत, असंघटित क्षेत्र, ज्यामध्ये छोटे व्यवसाय, रस्त्यावरील विक्रेते आणि स्थानिक कारागीर यांचा समावेश आहे, सणांच्या काळात यांची उलाढालही मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येते. त्यामुळे त्यांच्यासाठीही हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा असाच असतो. त्यांची वर्षातील प्रमुख कमाई ही याच दरम्यान होत असते. म्हणूनच, भारतातील सणवार हे तळागाळातील रोजगार आणि उत्पन्न निर्मितीमधील अर्थपूर्ण योगदान दर्शवणारे ठरतात. अहवालातील, ५० हजार कोटींचा आकडा अगदी अचूक नसला, तरी तो ढोबळमानाने उलाढाल दर्शवणारा आहे. प्रत्यक्षात तो आणखी मोठा असू शकतो.
भारतातील वाढते ई-कॉमर्स क्षेत्रही या वाढीला हातभार लावत आहे, असे नक्कीच म्हणता येते. दसरा-दिवाळी निमित्त फ्लिपकार्ट, अॅमेझॉन यासारख्या दिग्गज कंपन्या विशेष सवलती जाहीर करतात. देशभरातून त्यांना मोठा प्रतिसाद मिळतो. स्मार्टफोनपासून ते कपडे खरेदी करण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो. म्हणजेच, देशातील पारंपरिक दुकानांबरोबरच ई-कॉमर्स कंपन्यांची उलाढालही मोठ्या प्रमाणात होते. ‘व्होकल फॉर लोकल’ यातून स्थानिक लहान उद्योगांच्या मागणीतही वाढ होत आहे. मागणीत झालेली वाढ ही उत्पादन क्षेत्राला चालना देणारी ठरते. देशातील मध्यमवर्गाची वाढती संख्या, या वाढलेल्या मध्यमवर्गाची वाढलेली क्रयशक्ती, या क्रयशक्तीने उत्पादनाला दिलेले बळ असे हे भारतातील अर्थव्यवस्थेच्या वाढीचे मुख्य कारण आहे.
सणासुदीच्या कालावधीचे साधे उदाहरण फुलांचे घेतले, तर ४०० रुपये किलोने फुले विकली गेली. कोरोना काळात ही फुले मातीमोल भावाने विकली गेली. म्हणूनच, साथरोगानंतरच्या कालावधीत जेव्हा देशात सर्वत्र सण साजरे होऊ लागले, तेव्हा जागतिक परिस्थितीच्या विपरित भारतात वाढ नोंद झाली. म्हणूनच, भारतीय अर्थव्यवस्था जगभरातील तज्ज्ञांना अचंबित करत, वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आलेली दिसून येते. आताही जगाच्या वाढीचा दर २.६ टक्के इतकाच राहील असे मानले जात असताना, भारताच्या वाढीचा दर ७.२ टक्के इतका राहील, असे जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांना वाटते. रशिया-युक्रेन, इस्रायल-हमास या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जग सावध भूमिकेत असताना, भारतात मात्र वाढती मागणी नोंद झालेली आहे. ५०हजार कोटी हा प्राथमिक अंदाज असून, भविष्यात तो वाढूही शकतो.
भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सणासुदीचा हंगाम हा महत्त्वाचा एक महत्त्वपूर्ण कारक आहे. असंघटित क्षेत्र आणि पारंपरिक व्यापार या दोहोंच्या वाढीला चालना देण्यासाठी, सणवारांची महत्वपूर्ण भूमिका यातून अधिकच अधोरेखित झाली आहे. भारतातील उत्सवांनी सांस्कृतिक आणि अध्यात्मिक परंपरा तर कायम ठेवलीच आहे, त्याशिवाय देशाच्या अर्थव्यवस्थेलाही चालना दिली आहे. सणासुदीचा हंगाम सुरू असल्याने, तसेच सणांचा राजा असे ज्या दिवाळीबद्दल कौतुकाने बोलले जाते, ती दिवाळी अद्याप बाकी असल्याने, आर्थिक घडामोडींना आणखी चालना मिळेल, असा आशावाद नक्कीच सुखावणारा आहे.