विदुषकांचा ‘हसरा मेळावा’

13 Oct 2024 23:34:01
 
Dussehra Melawa
 
अडीच वर्ष स्वत:चे हट्ट पुरवण्यासाठी प्रामाणिक आणि भोळ्या शिवसैनिकांच्या भावनांचा बाजार मांडत, सोनिया गांधी समोर झुकून मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मागच्या युती सरकारने सुरू केलेल्या प्रत्येक योजना कद्रु मनोवृत्तीने बंद करण्याचा सपाटाच लावला. त्यांच्या या सूडाग्नीमध्ये मुंबईची मेट्रोदेखील होरपळली. अखेर सध्याच्या महायुती सरकार काळात ती पुन्हा सुरू झाली, आणि सेवेत देखील आली. मात्र, सूडाग्नी आणि बालहट्ट पुरवण्याचा भार मुंबईकरांच्या खिशावर पडला हे पुण्य उद्धव ठाकरे यांचेच! 
 
साडे तीन मुहूर्तांपैकी एक असणारा दसर्‍यासारख्या दिवस. हिंदू सणांच्या दिवशी हिंदू तेजाला झळाळी देण्यासाठी, हिंदूहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेला दसरा मेळाव्याचे उत्तम निमित्त. मात्र, या सगळ्याला मातीमोल करण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले आहे. विचारांचे सोने लुटूया सांगून, शिवतीर्थावर आलेल्या प्रत्येक हिंदू बांधवाच्या मनात, त्याच्याच हिंदू बांधवांविरोधात विखार निर्माण करण्याचे पापच उद्धव ठाकरे आणि त्यांच्या बागलबच्च्यांनी केले आहे. हिंदू पराक्रमाच्या अनेक कथा सांगून, हिंदू तेजाचे स्फुल्लिंग चेतवण्याची अमूल्य संधी असताना, मुस्लिमांच्या दाढ्या कुरवाळण्याचे उद्योग उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर केले. अडीच वर्ष स्वत:चे हट्ट पुरवण्यासाठी प्रामाणिक आणि भोळ्या शिवसैनिकांच्या भावनांचा बाजार मांडत, सोनिया गांधी समोर झुकून मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मागच्या युती सरकारने सुरू केलेल्या प्रत्येक योजना कद्रु मनोवृत्तीने बंद करण्याचा सपाटाच लावला. त्यांच्या या सूडाग्नीमध्ये मुंबईची मेट्रोदेखील होरपळली. अखेर सध्याच्या महायुती सरकार काळात ती पुन्हा सुरू झाली, आणि सेवेत देखील आली. मात्र, सूडाग्नी आणि बालहट्ट पुरवण्याचा भार मुंबईकरांच्या खिशावर पडला हे पुण्य उद्धव ठाकरे यांचेच!
 
आता, पुन्हा एकदा विधानसभेच्या तोंडावर त्यांनी कुईकुई ओरडायला सुरुवात केली आहे. त्यामध्ये त्यांनी सत्तेत आल्यास या सरकाराचे निर्णय रद्द करणार असल्याचे म्हटले आहे. तेव्हा दैव न करो पण, यांचे सरकार आल्यास महाराष्ट्र यांच्या सुडाग्नीत होरपळेल हे निश्चित. आजकाल त्यांना गोमातेला ‘राज्यमाते’चा दर्जा दिला याचा देखील त्रास होऊ लागला आहे. तसेच, खरे हिंदुत्व आणि खोटे हिंदुत्व ही ओळ पकडूनच ते हिंदूंमध्ये फुट पाडू पाहत आहेतच. ते ऐकून ‘ढवळ्या शेजारी पोवळा बांधला, वाण नाही पण गुण लागला’ या म्हणीची आठवण आज समस्त हिंदूंना होत आहे. कारण, परदेशात जाऊन हिंदू धर्माविषयी राहुल गांधी हीच ओळ पकडून त्यांचे बालबोध ज्ञान पाजळत असतात. एकूणच काय तर, हिंदू सणांच्या पवित्र संध्याकाळीच हिंदूंमध्ये फुट पाडत, काय सुरू करणार पेक्षा काय काय बंद करणार सांगताना, येत्या निवडणुकीत मतांसाठी झोळी पसरवत दसर्‍या मेळाव्याचा हसरा मेळावा केला हे खरे.
 
 
नेमके ‘गद्दार’ कोण?
 
विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, जवळपास प्रत्येकानेच आपापल्या रणवाद्यांचा नाद केला आहे. कुणी तुतारी फुंकली आहे, तर कोणी पांचजन्य फुंकला आहे. काही लांडग्यांनी मात्र उगाचच रुदन सुरू केले आहे. विधानसभा प्रचाराचा भाग म्हणून आज विरोधीपक्षाकडून ’गद्दारांचा पंचनामा’ सरकारचे अपयश प्रसिद्ध करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. त्यात विविध गोष्टींवर टीक करण्यात आली होती. मात्र, याचे नावच इतके मजेशीर ठेवले होते की, नेमके ’गद्दारांचा पंचनामा’, ‘गद्दारांच्या कृत्याचा पंचनामा’ की, ‘गद्दारांनी केलेला पंचनामा’ हेच कळेनासे झाले आहे. कारण, या प्रकाशन कार्यक्रमाच्यावेळी बसलेल्या प्रत्येकाने कायमच कशाशी ना कशाशी गद्दारी केलीच आहे. मात्र, यात काँग्रेसची गद्दारी सर्वात वरच्या दर्जाचीच. तरीही ते इतरांना ’गद्दार’ म्हणत फिरतात हा आत्मविश्वासही शिकण्यासारखा आहे.
 
या प्रकाशन सोहळ्यातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे, काँग्रेस यामध्ये बाजू मांडताना म्हणते की, “ज्यांनी शिवरायांच्या राज्यभिषेकाला विरोध केला, त्याच विचारधारेचे सरकार देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत आहेत.” आजवर या काँग्रेसला सर्वकाळ पूजनीय असलेल्या पं. नेहरु यांनी शिवरायांचा उपमर्द पंतप्रधान असताना केला त्याबद्दल काँग्रेस कधी माफी मागणार? नेहरु चुकले, त्यांचे छत्रपतींबद्दलचे आकलन जुजबी होते, त्यांच्या हिंदुस्थानच्या इतिहासाचा अभ्यास तोकडा होता असे कधी सांगणार? याची प्रत्येक हिंदू चकोरचातकासारखी वाट पाहत असताना, हे बिलंदर दुसर्‍याकडे बोट दाखवून मोकळे होतात. अरे, ज्यांनी कित्येक वर्ष राष्ट्रीय बोर्डाच्या अभ्यासक्रमात मुघलांच्या सत्तेवर पानेच्यापाने खरडली, मात्र छत्रपती शिवराय असोत अथवा महाराणा प्रताप यांना तो सन्मान देण्याचा मोठेपणा जे दाखवू शकले नाही, ज्यांना अकबर भूमीपुत्र वाटतो. मात्र, हिंदू राजे ज्यांना बंडखोर वाटतात, १८५७ सालच्या स्वातंत्र्यसमराचीही ज्यांनी बंड म्हणून हेटाळणी केली, तेच काँग्रेस आज कोणाला गद्दार म्हणायचा अधिकार राखून आहे का, हे आधी पाटोले यांनी ध्यानात ठेवले पाहिजे. काँग्रेसच्या पापांचा इतिहास एवढा मोठा आहे की, ते इतरांना गद्दार म्हणूच तरे कसे शकतात? म्हणूनच शीर्षकातील ’गद्दार’ म्हणजे कोण, हा प्रश्न सामान्य जनतेच्या मनात अधिक गडद होतो आहे.
 
 
 
 
कौस्तुभ वीरकर 
Powered By Sangraha 9.0