कदम कदम बढाऐ जा!

Total Views |

Marathi Actress Chhaya Kadam
 
मुंबईतील कलिनामध्ये मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या अभिनेत्री छाया कदम यांचे वडील गिरणी कामगार होते. बारावीत एकदा अनुत्तीर्ण झाल्यावरही न खचता त्यांनी ‘टेक्सटाईल डिझाईन’ची पदवी मिळवली आणि राज्यस्तरावर कबड्डीही खेळल्या. शाळा-महाविद्यालयात नाटकांमध्ये भूमिका साकारणार्‍या छाया यांनी पुढे अभिनयाचीच वाट निवडली. वामन केंद्रे यांच्या ‘झुलवा’ नाटकासह ‘फाट्याचं पाणी’, ‘विठ्ठल’ आणि ‘दगडांचा देव’ अशा लघुपटांमध्येही भूमिका साकारल्या. त्यानंतर चित्रपटात संधी मिळाली, पण ‘बाईमाणूस’ हा पहिला चित्रपट पडद्यापर्यंत आला नाही. मात्र, आता थेट ‘कान्स’ आणि ‘ऑस्कर’ गाठणार्‍या छाया कदम यांच्या प्रवासाबद्दल त्यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने केलेली ही खास बातचित...
 
रण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ या चित्रपटाला यंदाचे ऑस्कर नामांकन नुकतेच जाहीर झाले आहे. त्याबद्दल आपले मनोगत मांडताना छाया कदम म्हणाल्या की, “लापता लेडीज’ या माझ्या चित्रपटाला ज्यावेळी ‘ऑस्कर’साठी नामांकन मिळाले आहे, हे मला समजले, त्यावेळी स्पेनमध्ये माझ्या ‘ऑल वुई इमॅजीन अ‍ॅज लाईट’ या चित्रपटाच्या विशेष कार्यक्रमासाठी फिल्म फेस्टिवलसाठी आले होते आणि त्यानंतर स्पेनहून पॅरिसला जाण्यासाठी ट्रेनमध्ये बसले आणि मला बातमी मिळाली की, ‘लापता लेडीज’ची निवड ‘ऑस्कर’साठी झाली आहे. पण, आदल्याच दिवशी मला अशी बातमी समजली होती की, ‘लापता लेडीज’ हा चित्रपट ‘ऑस्कर’साठी शॉर्टलिस्ट झाला आहे आणि ते समजल्यावर मी लगेच चित्रपटाच्या दिग्दर्शिका किरण राव यांना फोन केला आणि अभिनंदन केले. त्यावर ते म्हणाले की, “अगं अजून असं काही झालं नाही. ते २७ तारखेला जाहीर होणार आहे.” पण, मग नंतर मला बातमी मिळाली की, नामांकन मिळाले आहे, ती फार आनंदाची बाब होती माझ्यासाठी. कारण, आपण म्हणजे ‘लापता लेडीज’ ‘ऑस्कर’ला जाणार, याची मला मनापासून खात्री होतीच. ज्यावेळी त्यावर शिक्कामोर्तब झाला, तेव्हा मला ‘लापता लेडीज’ या आमच्या चित्रपटाचा सगळा प्रवास नजरेसमोर उभा राहिला. कारण, प्रत्येक कलाकाराची ती आस असते की जागतिक पातळीवर आपल्या कामाची दखल घेतली गेली पाहिजे आणि ‘ऑस्कर’ने जर का ती घेतली, तर त्याहून अगदी मोठी गोष्ट काय असणार आहे?”
 
अभिनय क्षेत्रात कुणीही ‘गॉडफादर’ नसताना छाया कदम यांनी आपला प्रवास सुरु केला होता. त्याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, “माझा अभिनयाचा प्रवास तसा मी फार उशिरा सुरु केला. पण, आता मागे वळून पाहताना या प्रवासात ज्यांनी मला साथ दिली, ज्यांनी माझ्या कामाचे कौतुक केले, ज्यांना नाही आवडले त्यांनी टीका केली. त्या सगळ्यांचीच आठवण येते. कारण, आज मी ‘अभिनेत्री छाया कदम’ असेन, तर या सगळ्यांमुळेच आहे. ज्यावेळी मानसिकरित्या खचून जात होते, त्यावेळीदेखील केवळ कलाक्षेत्रातीलच नाही, तर इतर क्षेत्रांतील, माझ्या गावातील, वाडीतील बायका अशा सर्व मंडळींनी मला जो आधार दिला, त्या सगळ्यांचीच मी ऋणी आहे. कारण, आज मी जेव्हा ‘कान्स’ला गेले किंवा परदेशात फिरत आहे, तेव्हा लोकांना असं वाटतं की, वा! किती छान तयार होऊन छाया परदेशात आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. पण, माझे गाव ते परदेश हा प्रवास किती कठीण होता, तो माझा मलाच माहीत आहे. मी कोकणातील असल्यामुळे सुरुवातीला माझ्या भाषेचीदेखील गल्लत होती. माझा जन्म जरी मुंबईत झाला असला, तरी मी एका गिरणी कामगाराची मुलगी असल्यामुळे माझे राहणीमान, वागणे, बोलणे हे कलाक्षेत्रात अपेक्षित असावे, त्यापेक्षा फार निराळे होते. पण, अभिनयक्षेत्राची पार्श्वभूमी नसलेली छाया आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे, ती केवळ मायबाप रसिक प्रेक्षकांमुळेच, याचा मला अभिमान आणि आनंद आहे.”
 
‘सैराट’, ‘फँड्री’, ‘झुंड’ अशा अनेक हिंदी, मराठी चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारणार्‍या छाया कदम यांनाही टीकाकारांचा सामना करावा लागला. त्यांच्याबद्दल सांगताना त्या म्हणाल्या की, “आपण किती उत्तम अभिनय करत आहोत, हे वारंवार सांगणारी माणसे आपल्या आजूबाजूला असतातच. पण, आपल्या चुका दाखवणारे टीकाकार, ‘क्रिटिक्स’ मंडळीदेखील तितकीच महत्त्वाची असतात. माझ्या बाबतीत माझी मित्रमंडळीच माझे टीकाकार आहेत, जे माझे चांगले काम झाल्यानंतर माझे कौतुक तर करतातच; पण अजून मी काय करु शकते, यासाठी प्रोत्साहन देणारा मित्रपरिवारही असणे फार गरजेचे आहे.”
 
चित्रपटसृष्टीचा पायाच मुळी मराठी माणसाने रोवला. पण, तरीही ‘ऑस्कर’ मराठी चित्रपटांपासून का दूर आहे, यावर आपलं मत मांडताना छाया म्हणतात की, “मराठी चित्रपट ‘ऑस्कर’ला जावे इतक्या ताकदीचे नक्कीच आहेत. पण, काही गणितं कदाचित बसत नसल्यामुळे आपली ‘ऑस्कर’वारी यशस्वी होत नाही. मला एक बाब आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे, मी जितक्या नव्या लेखक, दिग्दर्शकांना भेटते, त्यांच्याकडे फार छान गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. पण, कदाचित त्यांना योग्य पाठबळ, आर्थिक मदत न मिळाल्यामुळे ते मागे राहतात. त्यामुळे ही स्थिती जर बदलली, तर नक्कीच अजून आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी चित्रपटांचे कौतुक होईल, असे मला नक्कीच वाटते.”
 
छाया पुढे म्हणतात की, “मला सामान्य प्रेक्षकांनी मोठे केले आहे. कारण, आजवर मी ज्या ज्या भूमिका साकारल्या, त्या त्यांना त्यांच्या घरातील वाटतात. प्रेक्षकांना माझ्यातील अभिनेत्रीपेक्षा ती भूमिका जास्त जवळची वाटते. त्यामुळे मला खरं तर फार आनंद होतो, जेव्हा लोक मला ‘छाया कदम’ अशी हाक न मारता, माझ्या पात्राच्या नावावरुन मला हाक मारतात किंवा ओळखतात. मला जरा भूतकाळातील माझ्याबद्दलची एक गोष्ट सांगायची होती. ती अशी की, ज्यावेळी मी चित्रपटात कामे करण्यास सुरुवात केली, तेव्हा फारशा माझ्या मुलाखती व्हायच्या नाहीत. पण, त्यातही जर का माझ्या चित्रपटाचा उल्लेख असलेला एखादा लेख पेपरमध्ये आला आणि त्यात माझे नाव असेल, तर मी ते कात्रण जपून ठेवायचे. काही वेळा वाटायचे की, अरे माझी मुलाखत का घेत नाही? काय कारण आहे? पण, कालांतराने माझ्या एक लक्षात आले की, मी जर का याच ग्लॅमरमध्ये अकडले, तर मी चांगले काम करु शकणार नाही. त्यामुळे आपण आपल्या कामाशी एकनिष्ठ असावे. जग आपली दखल घेईल आणि त्यानुसार मी केवळ कामच करत राहिले. असे म्हणत चित्रपटसृष्टीत आजवर मिळालेल्या सर्व श्रेयाचे मानकरी रसिक प्रेक्षक आहेत,” असे छाया कदम म्हणाल्या.

रसिका शिंदे - पॉल

रुईया महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण. चार वर्ष पत्रकारिता क्षेत्रात विविध वृत्तपत्र आणि डिजीटल माध्यमांत कार्यरत. सध्या 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मनोरंजन प्रतिनिधी' म्हणून कार्यरत.