‘पंतप्रधान गतिशक्ती’अंतर्गत महाराष्ट्रातील पायाभूत प्रकल्पांचा आढावा

12 Oct 2024 13:31:39

pm gatishakti
 
नवी दिल्ली, दि. ११ : (PM Gatishakti) ‘पंतप्रधान गतिशक्ती’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना चालना देण्यासाठी नेटवर्क नियोजन गटाची (एनपीजी) ८१वी बैठक उद्योग आणि अंतर्गत व्यापार (डीपीआयटी) विभागाचे अतिरिक्त सचिव राजीव सिंह ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली.
 
या बैठकीत पाच महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे मूल्यांकन करण्यात आले. ज्यात महाराष्ट्रातील दोन महत्त्वाचे रस्तेप्रकल्प होते. जुन्नर-तळेघर रस्ता आणि भीमाशंकर-राजगुरुनगर रस्त्यांच्या सुधारणांवर विशेष भर देण्यात आला. या प्रकल्पांचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे वाहतुकीला गती देणे, पर्यटनक्षेत्राचा विकास आणि स्थानिक समाजाचा सर्वांगीण विकास हे आहे.
 
महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील ५५.९४ किमी लांबीच्या जुन्नर-तळेघर रस्त्याचे उन्नतीकरण हा ‘ब्राऊनफिल्ड’ प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे उद्दिष्ट भीमाशंकर, जुन्नर आणि बांकरफाटा यांच्यातील दळणवळण सुधारून मालवाहतूक आणि प्रवासीवाहतूक वाढवणे आहे. या भागात असलेले भीमाशंकर मंदिर आणि शिवनेरी किल्ल्यासारखे ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. या प्रकल्पामुळे पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला गती मिळेल.
भीमाशंकर ते राजगुरुनगर या ६०.४५ किमी लांबीच्या रस्त्यांच्या पायाभूत सुविधांच्या सुधारणांचा समावेश असलेला हा ‘ब्राऊनफिल्ड’ प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा उद्देश दुर्गम भागांतील दळणवळण सोयीस्कर करणे, प्रवासाचा वेळ कमी करणे आणि स्थानिक बाजारपेठांपर्यंत प्रवेश सोपा करणे हा आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक शेतकरी आणि व्यावसायिकांना मोठा फायदा होईल, कारण यामुळे वाहतूक खर्च कमी होईल आणि त्यांच्या मालाची विक्री जलद होईल. तसेच, या मार्गावरील शिक्षण आणि आरोग्यसेवा सुधारण्यासही मदत होणार आहे.
 
या दोन प्रकल्पांव्यतिरिक्त उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधील अन्य तीन प्रकल्पांचाही या बैठकीत आढावा घेण्यात आला. सर्व प्रकल्प ‘पीएम गतिशक्ती’च्या तत्त्वांशी सुसंगत असल्याचे निरीक्षण करण्यात आले आहे, ज्यामुळे या प्रकल्पांचा अंतर्गत विकास आणि प्रदेशांच्या सर्वांगीण प्रगतीत महत्त्वाचा वाटा राहील. हे पायाभूत प्रकल्प राज्यातील दळणवळण, पर्यटन, आणि आर्थिक विकासाला चालना देऊन स्थानिक आणि प्रादेशिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान देतील.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0