मनोरा आमदार निवासासमोरील चौकाचे नामकरण

12 Oct 2024 15:41:58
 
rahul narvekar
 
मुंबई, दि. ११ : (Sahityaratna Annabhau Sathe Chowk) मनोरा आमदार निवासासमोरील चौकाला ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे’ यांचे नाव देण्यात येणार असून, विजयादशमीच्या मुहूर्तावर शनिवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता विधानसभा अध्यक्ष तथा कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल नार्वेकर यांच्या हस्ते या चौकाचे उद्घाटन होणार आहे.
 
या नामकरण निर्णयामुळे मातंग समाज बांधवांची गेल्या अनेक दिवसांची मागणी पूर्ण झाली असून, या निर्णयाचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात येत आहे.
 
मनोरा आमदार निवास समोरील चौकाला ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे’ यांचे नाव देण्यात यावे, ही मागणी पूर्ण व्हावी यादृष्टीने राहुल नार्वेकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
 
“दि. १ ऑगस्ट १९२० ते १८ जुलै १९६९ असे अवघे ४९ वर्षांचे आयुष्य अण्णाभाऊंना मिळाले. पण या अल्पकाळात त्यांनी कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवासवर्णन अशा विविध साहित्य प्रकारात आपण थक्क होवू इतके विपुल लेखन केले. आपली लेखणी आणि वाणीने मराठी साहित्यविश्वात शोषित-वंचितांचा आवाज बुलंद करणार्‍या या महान लेखक-समाजसुधारकास मी अभिवादन करतो, या चौक नामकरणामुळे आदरणीय अण्णाभाऊंची प्रेरणादायी स्मृती चिरंतन स्वरूपात जपण्यात येत आहे,” अशी कृतज्ञ भावना राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केली.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0