ठाणे : (PM Narendra Modi) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात सेवा सप्ताह राबविण्यात येत असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यस्तरीय वैद्यकीय मदत कक्षाच्यावतीने भाजप नेते कृष्णा पाटील यांनी गोकूळनगर येथे दोन दिवसीय भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या आरोग्य शिबिरात विविध गंभीर आजार असलेल्या वृद्ध महिला, पुरुष, लहान मुले तसेच नागरिकांना त्यांच्या घराजवळ मोफत उपचार, औषधे मिळाली.
मोठ्या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी हजारो रुपयांचा खर्च होतो मात्र या आरोग्य शिबिरात आपल्या घराजवळ दर्जेदार उपचार मिळाल्यामुळे नागरिकांनी माजी नगरसेवक कृष्णा पाटील, नंदा पाटील यांचे कौतुक केले.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी राज्यात २५ हजार आरोग्य शिबीर घेण्याचे संकल्प केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कृष्णा पाटील यांच्या प्रभागात हे आरोग्य शिबीर आयोजित केले होते. या शिबिरासाठी ठाणे जिल्हा रुग्णालय, कौशल्य रुग्णालय, महावीर जैन रुग्णालयामधील ५० डॉक्टर, नर्स आणि कर्मचारी यांच्या समूहाने सहभाग घेतला होता. ८ आणि ९ ऑक्टोबर या दोन दिवशी झालेल्या या आरोग्य शिबिरात हृदयविकार, किडनीचे आजार, लिव्हर, डोळ्यांच्या आजारासह विविध ३० आजारांवर मोफत उपचार तसेच मोफत औषधे देण्यात आली. तसेच गरजू रुग्णांना मोफत ऑपरेशनसाठी पुढील रुग्णालयात पाठविण्यात आले. या शिबिरामध्ये वैद्यकीय मदत कक्षाचे सदस्य सदस्य डॉ राहुल कुलकर्णी, कविराज चव्हाण, ठाणे भाजप आरोग्य आघाडीच्या डॉ. अपर्णा ताजणे, गोकुळनगर प्रभागातील भाजप कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
रविवारी महागिरीत मोफत आरोग्य शिबिर
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातुन येत्या रविवारी देखील (ता.१३ ऑक्टो.) ठाण्यात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. भाजपच्या माजी नगरसेविका नम्रता कोळी आणि भाजप उपाध्यक्ष जयेंद्र कोळी यांनी ठाणे पश्चिमेकडील महागिरी कोळीवाडा येथील अंजुमन खैरुल इस्लाम हायस्कुलमध्ये रविवारी सकाळी ८ ते दुपारी २ या कालावधीत हे मोफत सामुदायिक आरोग्य शिबीर पार पडणार आहे.तरी, या मोफत आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा.असे आवाहन जयेंद्र कोळी यांनी केले आहे.