नवी मुंबई विमानतळ धावपट्टीची यशस्वी चाचणी

सुखोई विमानाच्या नवी मुंबई विमानतळावर घिरट्या

    12-Oct-2024
Total Views |

NMIA


नवी मुंबई, दि.१२ :
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची भारतीय वायुदलाच्या विमानांसह यशस्वी चाचणी घेण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. भारतीय वायुदलाचे C-295 हे विमान धावपट्टीवर यशस्वीपणे उतरविण्यात आले. यावेळी, या विमानावार पाण्याचे उंचच उंच फवारे मारत 'वॉटर सॅल्यूट' देण्यात आले. याबरोबरच लढाऊ विमान सुखोई ३०नेही या विमानतळाच्या यशात फ्लयिंगपास करून अनोखी सलामी दिली.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे काम प्रगतीपथावर आहे. नवी मुंबई विमानतळाचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरु होते. त्यावर एका धावपट्टीचे काम पूर्ण झाले. याचाच एक भाग म्हणून विमानतळाच्या धावपट्टीची शुक्रवार दि.११ रोजी यशस्वी चाचणी घेण्यात आली. या चाचणीदरम्यान वायुदलाच्या 'सी 295' विमानाने विमानतळावरून सात ते आठ घिरट्या अवकाशात घातल्या. त्यानंतर हे विमान धावपट्टीवर उतरले. विमान धावपट्टीवर उतरताच त्याला 'वॉटर सॅल्यूट' देण्यात आले. या चाचणीनंतर सुखोई 30 या लढाऊ विमानानेही फ्लायपास केला. लँडींग करणाऱ्या सी 295 विमानाच्या वैमानिक कॅप्टनचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.


यावेळी केंद्रिय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सिडको महामंडळाचे अध्यक्ष, संजय शिरसाट,खा. श्रीरंग बारणे,खा. सुनील तटकरे,खा.डॉ. श्रीकांत शिंदे, खा. नरेश म्हस्के, आ. गणेश नाईक,आ. प्रशांत ठाकूर, आ महेश बालदी, अपर मुख्य सचिव गृह इकबालसिंग चहल, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, विजय सिंघल, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, विभागीय आयुक्त डॉ देशमुख, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 'C295' विमान हे गांधीनगरहून तर सुखोई हे विमान पुण्यातून आले होते.

महाराष्ट्राच्या प्रगतीला आणखी वेग : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

यावेळी माध्यमाशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,"आजचा दिवस इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल असे नमूद करून या यशस्वी चाचणीचे महत्त्व अधोरेखित केले. विमानतळाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. विजयादशमीच्या एक दिवस आधी झालेल्या या कार्यक्रमामुळे सर्वसामान्य नागरिक आणि प्रवाशांसाठी मोठा आनंद आहे. मार्च २०२५ मध्ये हे विमानतळ नियमित प्रवासी सेवेसाठी सुरू होईल. वेळेआधीच काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.तसेच सिडको ने केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल सर्व टीमचे अभिनंदन केले. हे विमानतळ सर्वसामान्यांसाठी मोठे आश्रयस्थान बनेल तसेच यामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीला आणखी वेग येईल. या विमानतळामुळे हजारो रोजगाराच्या संधी निर्माण होतील. तसेच इथे आयटी पार्क आणि व्यावसायिक केंद्रे उभारली जातील", असा विश्वास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

हे विमानतळ आधुनिक भारताची झलक : देवेंद्र फडणवीस

"आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. ज्या नवी मुंबई विमानतळाचे काम आपणं सुरु केलं होतं त्या विमानतळावर पाहिलं लँडिंग झाले आहे. आणि हे लँडिंग यशस्वी झाले आहे. जयावेळी आम्ही या विमानतळाचे काम सुरु केले तेव्हा विरोधकांनी टीका केली, हे विमानतळ होणार नाही असे म्हणाले होते. मात्र आज चाचणी लँडिंग झाले आहे. लवकरच व्यावसायिक वापरासाठी हे विमानतळ सुरु होईल. हे विमानतळ अत्यंत आधुनिक आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे शिवडी न्हावाशेवा सी लिंक, मुंबई तसेच नवी मुंबई मेट्रो, दोन खाडी मार्गाने जोडला जात असून तो देशातील एक विशेष प्रकल्प ठरणार आहे. या विमानतळामुळे मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळेल. हे विमानतळ आधुनिक भारताची झलक दाखवणारे असेल", असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.