मुंबई, दि. १२ : म्हाडा कोंकण मंडळाच्या विरार बोळींज वसाहतीतील टप्पा क्रमांक १,२ व ३ मधील अल्प, मध्यम उत्पन्न गटातील ९४०९ सदनिकाधारकांकडून आकारण्यात येणारे मासिक सेवाशुल्क कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सेवाशुल्क कमी करण्याबाबत वसाहतीतील रहिवाशांकडून व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडून वारंवार मागणी करण्यात येत होती. त्याबाबत गृहनिर्माण मंत्री अतुल सावे व म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या संयुक्त बैठकीत झालेल्या निर्णयानुसार सदर प्रकल्पामध्ये आजतागायत प्रत्यक्ष ताबा घेतलेल्या व यापुढे ताबा घेणाऱ्या सर्व सदनिकाधारकांचे यापूर्वीचे सेवाशुल्क कमी करण्यात आले आहे.
या निर्णयानुसार, विरार बोळींज वसाहतीतील टप्पा क्रमांक एक, दोन व तीन मधील अल्प उत्पन्न गटातील सदनिकाधारकांकडून १४५० रुपये प्रतिमाह व मध्यम उत्पन्न गटातील सदनिकाधारकांकडून २४०० रुपये प्रतिमाह सेवाशुल्क आकारले जाणार आहे. पूर्वी अल्प उत्पन्न गटातील सदनिकाधारकांकडून २१२१ रुपये प्रतिमाह व मध्यम उत्पन्न गटातील सदनिका धारकांकडून ३४९३ रुपये प्रतिमाह सेवाशुल्क आकारण्यात येत होते. तसेच कोविड-१९ (मार्च २०२० ते मार्च २०२२ या दोन वर्षाच्या कालावधीकरिता) या वसाहतीतील सदनिका धारकांना सूट दिलेल्या सेवाशुल्कावर अतिरिक्त ५० टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. थकीत असलेल्या सेवाशुल्कावरील आकारण्यात येणारे विलंब शुल्क माफ करण्यात येत असून मूळ सेवाशुल्क भरण्याकरिता मार्च २०२५ पर्यंत मुभाही देण्यात आली आहे. तसेच एप्रिल २०२५ पासून वार्षिक १८ टक्के दराने आकारण्यात येणारे विलंब शुल्क आता वार्षिक १२ टक्के दराने आकारण्यात येणार आहे. ज्या सदनिकाधारकांनी अद्यापपर्यंत सेवा शुल्काचा भरणा केलेला आहे, त्या सदनिकाधारकांच्या सेवाशुल्कातील फरकाची रक्कम पुढील सेवा सेवाशुल्कामध्ये समायोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती कोंकण मंडळाच्या मुख्य अधिकारी श्रीमती रेवती गायकर यांनी दिली.