टाटा परिवारातील 'रत्न'

12 Oct 2024 22:01:28
 
Ratan Tata Death
 
 
रतन टाटा हे टाटा परिवारातील अनमोल रत्न होते. त्यांनी ३० वर्षे उद्योग समूहाचे नेतृत्त्व केले, एवढ्या एकाच कारणावरुन ते महान ठरत नाहीत किंवा टाटा उद्योग समूहाची त्यांनी प्रचंड भरभराट केली, या दुसर्‍या कारणामुळेही त्यांना महान म्हणता येणार नाही. व्यक्तीला मोठेपणा देणारी ही कारणे जरुर आहेत. परंतु, रतन टाटा यांचे अलौकिक मोठेपण टाटा समूहाने स्वीकारलेली मूल्ये जगण्याचे आहे.
 
रतन टाटा यांचे वयाच्या ८६व्या वर्षी निधन झाले. कृतार्थ जीवन जगून ते गेले. टाटा समूहाचे ३० वर्षे त्यांनी नेतृत्व केले. टाटा उद्योगाला शंभर वर्षे होऊन गेली आहेत. एवढा प्रदीर्घ काळ एक उद्योग समूह कायम राहणे, वाढत्या वयाबरोबर त्याची वाढ होत जाणे, नवीन आव्हाने स्वीकारून कालबाह्य उद्योग बंद करून, नवीन उद्योग सुरु करणे हे सर्वच काही अलौकिक आहे. पारिवारिकउद्योग घराणे दीर्घकाळाचा प्रवास करु शकत नाही. जो नियम राजघराण्याला लागू होतो, तोच नियम पारिवारिक उद्योगालाही लागू होतो. राजघराण्यात सर्वच पिढ्या कर्तृत्ववान निपजत नाहीत, औद्योगिक घराण्याचेही तसेच असते. टाटा उद्योग समूह मात्र त्याला अपवाद ठरावा.
 
रतन टाटा हे टाटा परिवारातील अनमोल रत्न होते. त्यांनी ३० वर्षे उद्योग समूहाचे नेतृत्त्व केले, एवढ्या एकाच कारणावरुन ते महान ठरत नाहीत किंवा टाटा उद्योग समूहाची त्यांनी प्रचंड भरभराट केली, या दुसर्‍या कारणामुळेही त्यांना महान म्हणता येणार नाही. व्यक्तीला मोठेपणा देणारी ही कारणे जरुर आहेत. परंतु, रतन टाटा यांचे अलौकिक मोठेपण टाटा समूहाने स्वीकारलेली मूल्ये जगण्याचे आहे.
 
टाटा समूहासारखा उद्योग हे एक आर्थिक क्षेत्रातील किंवा औद्योगिक क्षेत्रातील एक मोठे संघटन असते. संघटनशास्त्राचे काही शाश्वत नियम आहेत. हे नियम सर्व संघटनांना लागू होतात. या नियमाप्रमाणे जे संघटन चालविले जाते, ते परिणामकारक होते आणि त्याचे आयुष्यदेखील दीर्घकाळाचे असते. टाटा उद्योग समूहाने समूहाची म्हणून पाच मूल्ये स्वीकारलेली आहेत, यांना आपण तत्त्वेदेखील म्हणू शकतो आणि संघटनेची तत्त्वेदेखील म्हणू शकतो. ती अशी -
 
१) सचोटी - उद्योग चालवताना प्रामाणिक, पारदर्शी आणि नैतिकतेची जपवणूक करणारे राहू. जनछाननीच्या परीक्षेत आम्हाला खरे उतरायचे आहे.
 
२) ऐक्य - परस्पर विश्वास आणि आदर यावर आम्ही आमच्या सहयोगींशी व्यवहार करून सतत शिकण्याच्या भूमिकेत राहू.
 
३) जबाबदारी - आम्ही आमच्या व्यवसायात पर्यावरणीय आणि सामाजिक मूल्ये यांना समाविष्ट करू आणि याचे आश्वासन देऊ की, जे लोकांकडून आम्हाला प्राप्त होईल त्याच्या अनेक पटीत त्याची परतफेड आम्ही करू.
 
४) अग्रदूत - आम्ही आव्हानांचा धैर्याने आणि साहसाने स्वीकार करु. जी आव्हाने उभी राहतील त्यांना नाविन्यपूर्ण पद्धतीने सामोरे जाऊ.
 
 ५) उत्कृष्टता - आम्ही उच्च गुणवत्तेचा आग्रह धरू. सर्वोत्तम प्राप्त करण्याचाच प्रयत्न करू. (मूळ इंग्रजीचा हा भावानुवाद आहे.)
 
टाटा उद्योग समूहाचे भाग्य असे की, ही मूल्ये त्यांच्या पुस्तकात राहिली नाहीत, तर ही मूल्ये जगणारे चालते-बोलते आदर्श टाटा समूहात उभे राहिले. जमशेदजी टाटा, जे. आर. डी. टाटा, रतन टाटा, अशी मालिका आहे. रतन टाटा यांचे जीवन म्हणजे या पाचही संघटन मूल्यांचा किंवा तत्त्वांचा चालताबोलता आदर्श होता. तेे सचोटीने जीवन जगले. त्यांच्याविषयी असे म्हटले गेले की, आपल्या सहकार्‍यांबरोबर काम करताना त्यांना कधी कमीपणा वाटला नाही. यंत्रावर काम करताना हात काळे करावे लागतात, ते त्यांनी केले. म्हणून त्यांच्याविषयी ज्यांनी ज्यांनी लेखन केलेले आहे, त्यांनी अत्यंत ‘नम्रता’ या त्यांच्या लोकोत्तर गुणांचे कौतुक केले आहे. सचोटीबरोबर प्रामाणिकता, नम्रता सहृदयता, इत्यादी गुण आपोआप येतात.
 
टाटा समूहाचे दुसरे मूल्य किंवा संघटन ऐक्य हे आहे. ज्या संघटनेत लाखो लोक काम करतात, कामाची क्षेत्रे वेगवेगळी असतात, कामाला लागणार्‍या कौशल्याची आणि गुणवत्तेची प्रचंड विविधता असते, अशा समूहात ऐक्य प्रस्थापित करणे, हे अतिशय अवघड काम आहे. एका अर्थाने ही वेगवेगळ्या क्षमतेच्या माणसांची सर्कस असते. त्या प्रत्येकाकडून योग्य ते काम करून घेणे आणि त्याचवेळी त्याच्यात समूहभावना निर्माण करणे, परस्पर विश्वास निर्माण करणे, हे सोपे काम नाही. रतन टाटा यांनी ३० वर्षे काय केले, तर या समूहात जबरदस्त ऐक्यभावना निर्माण करण्याचे काम केले. त्याचे पैशात मोल करता येणार नाही.
 
आपल्या देशात ज्या संघटनांची वाताहत होते, मग ते राजकीय संघटन असो, सामाजिक-धार्मिक संघटन असो, तेथे संघटनेच्या प्रमुखाला हा ऐक्यभाव निर्माण करणे जमत नाही, त्यात तो अयशस्वी होतो. त्यांनी रतन टाटा यांच्या जीवनाचा अभ्यास करावा, हा फुकटचा सल्ला मी देत नाही.
 
जबाबदारीची जाणीव ही अतिशय महत्त्वाची असते. उद्योग समूहातील जबाबदारी उत्पादन करण्याची असते. उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल निसर्गातून घ्यावा लागतो. नको असलेले पदार्थ सोडून द्यावे लागतात, त्याने प्रदूषण वाढते. रतन टाटा यांनी पर्यावरण रक्षणाची अतिशय महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यांच्या उद्योगांमुळे पर्यावरणाला प्रचंड हानी झालेली आहे, अशी फार मोठी बातमी कधी आलेली नाही. जबाबदारीच्या तत्त्वात आणखी एक विषय येतो, तो म्हणजे उद्योगातून जे धन प्राप्त होते, त्याचा विनियोग शिक्षण, आरोग्य, गरजूंना विविध प्रकारची मदत यासाठी करायचा असतो. याबाबतीत टाटा उद्योेगसमूह आणि त्याचे नेतृत्त्व यांनी आदर्श निर्माण केलेला आहे.
 
रतन टाटा यांनी उद्योग समूहाचे नेतृत्त्व करीत असताना टाटा उद्योग समूहाचा विस्तार जगभर केला. ‘टेटली’, ‘जॅग्वार’, ‘लॅण्ड रोव्हर’, ‘कोरस’, या विदेशी कंपन्या टाटा समूहाने हस्तगत केल्या. तोपर्यंत विदेशी बहुराष्ट्रीय कंपन्या अन्य देशांतील छोट्या-मोठ्या कंपन्या आपल्या ताब्यात घेत असत. रतन टाटा यांनी कालचक्र फिरवले. भारतीय कंपन्या ताब्यात घेण्याचे दिवस संपले असून, आता आम्हीच तुम्हाला ताब्यात घेतो, हे त्यांनी दाखवून दिले. जो उद्योजक सर्व प्रकारे विचार करून आणि योग्य वेळी, योग्य निर्णय करण्याचे धाडस दाखवितो, तो यशस्वी होतो. रतन टाटा व्यक्तिगत जीवनातदेखील धाडसी होते. ‘एफ -१६ फायटर जेट विमान’ चालविणारे नागरी क्षेत्रातील ते पहिलेच भारतीय असावेत. जेट फायटर चालविण्यासाठी तशीच हिंमत लागते. कुठल्याही क्षेत्रात हिंमतबाज नेतृत्त्व लागते. राजकीय क्षेत्राचा जर विचार केला, तर धाडसी निर्णय योग्य वेळी आणि अचूकपणे करावे लागतात. जे नेते असे निर्णय करतात, ते यशस्वी होतात. अन्यांचे काय होते, हे सांगण्याची गरज नाही.
 
रतन टाटा यांनी नेहमीच उत्कृष्टतेचा ध्यास धरला. आज भारताचा विचार केला, तर भारतातील डोंगरदर्‍यात राहणार्‍या घरांपर्यंत जी दोन नावे लोकांना माहीत आहेत, त्यातील एक नाव महात्मा गांधींचे आहे आणि दुसरे नाव टाटांचे आहे. टाटा मीठ, टाटा चहा, टाटा एस. टी. बस ही प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य भाग झालेली आहेत. ज्या वस्तूंवर टाटांचे नाव आहे, ती वस्तू डोळे झाकून घ्यावी, अशी भारतातील परिस्थिती आहे आणि उलट चिनी नाव असेल, तर पैसा फुकट घालविण्यासाठी घ्यावी, अशी भावना आहे.
 
रतन टाटा महान होते, कारण संघटनेची मूल्ये आणि तत्त्वे ते तंतोतंत जगत होते. त्यांच्या बाबतीत असे म्हणायला पाहिजे की, मूल्य आणि व्यक्ती समरूप झाले होते. अशा व्यक्ती समाजाची धारणा करतात. धारणा म्हणजे मूल्याधिष्ठित समाजाचे सातत्य कायम ठेवणे. रतन टाटा हे त्या अर्थाने दीपस्तंभ होते. जे अफाट श्रीमंत आहेत, त्यांच्याबद्दल समाजात पराकोटीचा आदरभाव निर्माण होत नाही, ही आपल्या समाजाची मानसिकता आहे. रतन टाटांचा विचार केला, तर ते कुबेरपुत्रच होते. परंतु, ते तुकारामांचे वचन जगत होते. ‘जोडुनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेचकरी।’ श्रीमंतीत जगणे सोपे असते. परंतु, मूल्याधारित जीवन जगणे अतिशय कठीण असते. असा मूल्याधारित जीवन जगणारा धर्मवीर असतो. रतन टाटा यांना कोटी कोटी प्रणाम!
Powered By Sangraha 9.0