नामयोगी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा ‘रामपाठ’ (पूर्वार्ध)

12 Oct 2024 23:14:23
 
Namyogi Brahmachaitanya Gondawalekar
 
 
महाराष्ट्राला लाभलेला आधुनिक संतपरंपरेमध्ये गोंदवल्याचे संत ब्रह्मचैतन्य (गणपती घुगरदरे) हे ‘नामयोगी’ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी दासभावाने प्रभू रामाचा व नामाचा महिमा वाढविला. लाखो भक्तांची जीवने रामनाम भक्तीने उजळून टाकली. इ. स. १८४५ ते १९१३ असा त्यांचा कार्यकाळ असून, त्यांची ‘दैनंदिन प्रवचने’ आणि त्यांनी लिहिलेला ‘रामपाठ’ हे भाविक उपासकांचे पारमार्थिक पथदर्शक दीपस्तंभ आहेत. गोंदवलेकर महाराजांनी गोंदवले येथे बांधलेली दोन स्वतंत्र राममंदिरे आहेत. आधी रामाचे मग महाराजांच्या समाधीचे दर्शन केले जाते.
 
रामनामचि आत्मज्ञान। रामनामचि ब्रह्मपद।
रामनामचि निजसुख। रामनामचि वस्तु देख।
रामनामचि सर्वसिद्धी। रामनामेची तुटे उपाधी।
 
महाराष्ट्रातील आधुनिक संतांमध्ये अक्कलकोटचे स्वामीसमर्थ, शेगावचे गजानन महाराज, शिर्डीचे साईबाबा, पावसचे स्वामी स्वरूपानंद यांच्या बरोबर गोंदवलेकर महाराज हे एक अग्रणी, साक्षात्कारी संतसत्पुरुष होऊन गेले. त्यांचा रामभक्तीवर आणि नामभक्तीवर विशेष भर असल्याने त्यांना ‘नामयोगी’ म्हणूनच ओळखले जाते. किंबहुना, त्यांचा जन्मच ‘राम’ आणि ‘नाम’ भक्ती प्रचारार्थ झाला.
 
नामयोगी गोंदवलेकर महाराजांचा जन्म माघ शुद्ध दशमी दि. १९ फेब्रुवारी १८४५ साली गोंदवले (जि.सातारा) येथे झाला. त्यांना ६९ वर्षांचे आयुष्य लाभले. मार्गशीर्ष वद्य दशमी दि.२२ डिसेंबर १९१३ साली त्यांनी देह ठेवला. गणपती रावजी घुगरदरे (कुलकर्णी) असे त्यांचे पूर्ण नाव असून, त्यांच्या घराण्यात सात पिढ्या पंढरीची वारी चालत आलेली होती. नांदेड जिल्ह्यातील येहळेगावचे साक्षात्कारी सत्पुरुष श्री तुकामाई यांचा त्यांना अनुग्रह लाभलेला. तुकामाई हे सिद्ध पुरुष होते.
 
वयाच्या नवव्या वर्षी गुरूशोधार्थ गृहत्याग करून देशभर भ्रमंती करणार्‍या छोट्या गणपतीची (गोंदवलेकर महाराजांची) अखेर तुकामाईंशी भेट झाली. आजवर अनेक साधुसंत भेटले होते. पण, तुकामाईंना भेटताच महाराजांना गुरू भेटल्याची अंतरंग खात्री झाली. गुरुची त्यांनी अनेक खडतर परीक्षा देत, नऊ महिने उत्तम सेवा केली. अखेर रामनवमीच्या पावनदिनी दुपारी १२ वाजता गुरू तुकामाईंनी गणूला (गोंदवलेकर महाराजांना) अनुग्रह दिला आणि ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा त्रयोदशाक्षरी रामनाममंत्राची उपासना दिली. या अनुग्रहानंतर त्यांना गुरुंनी ‘ब्रह्मचैतन्य’ असे नाव दिले. “जनसामान्यांमध्ये रामोपासनेचा प्रचार, प्रसार करून नामस्मरण भक्तीने समाजाचे कल्याण करावे” असा गुरू तुकामाईंनी त्यांना उपदेश केला. गुरू अनुग्रह व उपदेशानंतर भारतभर भ्रमण करून ठिकठिकाणी रामभक्तीचा, रामोपासनेचा प्रचार करीत अखेर इ.स.१८७६ सालच्या सुमारास ‘ब्रह्मचैतन्य’ होऊन महाराज गोंदवले गावी परतले. ते बहुभाषिक होते. हिंदी, कन्नड, तेलुगू, संस्कृत भाषा त्यांना अवगत होत्या. गोंदवलेकर महाराज हे गृहस्थाश्रमी होते. प्रपंचात-समाजात राहून परमार्थ सफलपणे करण्याचा आदर्श त्यांनी समाजापुढे ठेवला. काही काळ त्यांनी गावचे वडिलोपार्जित कुलकर्णीपणही केले. पण, पुढे सर्व जबाबदार्‍यांतून मुक्त होऊन अखंड रामसेवा व रामनाम भक्ती प्रचारास वाहून घेतले. गोंदवल्यामध्ये ‘थोरले राम मंदिर’ आणि ‘धाकटे राम मंदिर’ अशी दोन स्वतंत्र राम मंदिरे बांधली.
 
राम एकदाता
 
संत ज्ञानदेवांच्या ‘हरिपाठा’प्रमाणे महाराजांनी ‘रामपाठ’ लिहिला आणि नित्यपाठासाठी एक सुलभ साधन दिले. त्यांची प्रवचने म्हणजे सहज संवादाचा सुरेख वस्तुपाठच आहे.
 
जनी जनार्दन रामाचे चिंतन।
सत्याची ही खाण रामनाम।
गाईचे रक्षण भूतदया जाण।
अतिथीस अन्न घाला तुम्ही॥
 
हा त्यांच्या एकूण जीवनकार्याचा बोध आहे. रामनाम घेण्यासाठी प्रापंचिक व्यवहार, उद्योग बाजूला सारण्याची गरज नाही. तुमची प्राप्त कामे, विहित कर्तव्ये पार पाडत रामनाम घ्या, रामाचे ध्यान करा, रामनामाचे चिंतन करा, असा त्यांनी सर्वांना उपदेश केला व त्यांच्या सहवासात येणार्‍या प्रत्येकाला रामनामाची गोडी लावली. सोवळ्या-ओवळ्याचा बाऊ न करता, शुद्ध मनाने रामनाम घेण्याचा सुलभ मार्ग त्यांनी सर्वांना दाखविला. ‘ब्रह्मचैतन्य’ महाराजांची प्रवचने ग्रंथरुपाने प्रकाशित झालेली आहेत. त्या 365 प्रवचनांमधील ‘जेथे नाम तेथे राम।’, ‘प्रपंचात राम कर्ता ही भावना ठेवावी’, ‘राम कर्ता हे चित्ती जाणून वर्तावे’, ‘रामाला अनन्यभावे शरण जा’,‘रामकर्ता या भावनेने समाधान मिळते’, ‘रामापायी ठेवा मन’, ‘राम ठेवील त्यात समाधान’, ‘ठेवता रामावर एक विश्वास’, ‘रामापरते सत्य नाही’, ही प्रवचने रामनामाचा अगाध अनंत महिमा कथन करणारी आहेत. त्याशिवाय श्रीरामनवमी उत्सवातील त्यांची चार प्रवचने या ग्रंथात स्वतंत्रपणे दिली आहेत ती रामनामाची गाथाच आहे. त्यातील काही वचने पाहा -
 
देवळे सभामंडपे न येत कामा। ज्याने नाही ठेविले हृदयी रामा॥
सर्व शास्त्रांचे सार। एक भजावा रघुवीर॥
तिन्ही लोकी श्रेष्ठ रामनाम एक।धरूनी विवेक जपे सदा॥
 
‘ब्रह्मचैतन्य’ तथा ‘दीनदास’
 
समर्थांच्या रामभक्तीचा आदर्श ‘हनुमंत’ आहे. त्यामुळे त्यांनी ‘रामी रामदासी’,‘रामदास’ अशा मुद्रा धारण केल्या व आपला राम दास्यत्वभाव अभिमानाने मिरवला, त्यातच धन्यता मानली. गोंदवलेकर महाराजांना गुरुंनी ‘ब्रह्मचैतन्य’ नाव दिले, तरी सुद्धा त्यांनी रामदासाप्रमाणेच आपणास ‘दीनदास’ नाममुद्रा लावण्यात धन्यता मानली. देवतेचे, गुरुचे दास्यत्व ही संतांची धन्यता आहे. सकल संतांनी दासभावाचे आपल्या साहित्यात अनुसरण केलेले आहे. तोच भाव ब्रह्मचैतन्यांच्या ठायी दिसतो.
 
हनुमंते केले लंकेसी उड्डाण। रामनाम ठाण हृदयामाजी।
दीनदास म्हणे वानर तरले। नामी कोटी कुळे उद्धरली॥
 
वायुपुत्र हनुमंत लंकादहनाचा पराक्रम करण्यात यशस्वी झाला. कारण, त्याच्या हृदयी ‘राम’ होता. तसेच राम नाम व राम सेवाभक्तीमुळे कोट्यवधी वानरे त्यांची कुळे उद्धरली, असे रामनाम तारक आहे. स्वतः ब्रह्मचैतन्य महाराज हेच आधुनिक काळातील हनुमंताचा अवतार मानले जातात. या दृष्टीने त्यांनी केलेले रामायणातील हनुमंताची स्तुती ही ‘ज्योतीने तेजाची आरती’च आहे.
 
दीनदास म्हणे स्मरा रघुनाथा। संसाराची चिंता त्यासी नसे।
जनी-जनार्दन रामाचे चिंतन। सत्याची खाण रामनाम॥
 
Powered By Sangraha 9.0