मुंबई, दि. १२: महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमएमएमओसीएल) प्रवाशांच्या सोयीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत व्हॉट्सअॅपवर आधारित तिकीट सेवा सुरू केली आहे. नवरात्रोत्सवाचे औचित्य साधत या उपक्रमाचे उद्घाटन महिला प्रवाशांच्या हस्ते अभिमानाने करण्यात आले. मेट्रो लाईन २ए आणि ७च्या प्रवाशांसाठी ही नवीन सुविधा उपलब्ध आहे. यामुळे प्रवासी थेट व्हॉट्सअॅपवरून तिकीट खरेदी करू शकतात. यासाठी स्वतंत्र मोबाइल अॅपची गरज नाही. त्यामुळे अधिक सोपी युझर-फ्रेंडली म्हणजे वापरकर्त्यासाठी सोयीची असलेली सेवा उपलब्ध होणार आहे.
प्रवाशांना ८६५२६३५५०० या व्हॉट्सअॅप क्रमांकावर 'Hi' पाठवून किंवा स्थानकांवरील क्यूआर कोड स्कॅन करून संभाषणात्मक यंत्रणेच्या (कन्व्हर्सेशनल इंटरफेस) माध्यमातून प्रवासी तिकीट खरेदी करू शकतात. महामुंबई मेट्रोचे अध्यक्ष आणि एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी म्हणाले, "व्हॉट्सअॅप तिकीट सुविधेमुळे तिकीट खिडकीवरील रांगा कमी होण्यास मदत होईल आणि प्रवासाचा अनुभव अधिक सुलभ होईल. सध्या आमचे सुमारे ६२% प्रवासी कागदी क्यूआर तिकिटे वापरतात, ३% प्रवासी मोबाईल क्यूआर तिकिटे वापरतात आणि ३५% प्रवासी एनसीएमसी कार्ड वापरतात. आम्हाला आमच्या प्रवाशांना विनाअडथळा प्रवासाचा अनुभव द्यायचा आहे, आणि मला ही नवी तिकीट सेवा सादर करताना अत्यंत आनंद होत आहे."
एमएमएमओसीएलच्या व्यवस्थापकीय संचालिका रुबल अग्रवाल यांनी या उपक्रमासाठी व्हॉट्सअॅपची निवड करण्यामागील कारण स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, "प्रवासी मेट्रो तिकीट बुक करण्यासाठी प्रवाशांना सुलभ, कायम ॲक्सेस असलेला आणि परिचित प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यायचा होता. भारतभर व्हॉट्सअॅपचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने हाच सर्वोत्तम पर्याय होता. या साध्या आणि सोप्या पद्धतीने आमच्या मेट्रो सेवांशी संवाद साधता येऊन लाखो मुंबईकरांच्या प्रवासाच्या अनुभवात अमूलाग्र बदल घडून येणार आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आपण महिला सक्षमीकरणाचा व नवोपक्रमांचा उत्सव साजरा करत असतो. याच कालावधीत हा उपक्रम सुरू केल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.