बोरीवली तालुक्यातील जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी

12 Oct 2024 15:18:14

dharavi


मुंबई, दि.१२ :
बोरीवली तालुक्यातील मौजे आक्से येथील तसेच मौजे मालवणी येथील शासकीय जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यावेळी मुंबईतील इतरही भूखंडाबाबत महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
या प्रकल्पातील अपात्र झोपडी धारकांची गणना जशी जशी निश्तित होईल, त्याप्रमाणे धारावी पुनर्विकास प्राधिकरण यांनी मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडे यातील आवश्यक जमिनीची मागणी करावयाची आहे. या मिळकतीस जमीन महसूल अधिनियम त्याचप्रमाणे शासनाने वेळोवेळी घेतलेले सर्व धोरणात्मक निर्णय लागू राहतील. यासाठी सुमारे १४०एकर क्षेत्रापैकी वाटपासाठी उपलब्ध होणारे क्षेत्र धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या विशेष हेतू कंपनीकडून घरे बांधण्याकरिता या जमिनीची प्रचलित बाजार मूल्याच्या शंभर टक्के किंमत वसूल करून ती डीआरपी/एसआरए यांना देण्यात येईल.

वांद्रे शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांना घरांसाठी जागा

वांद्रे शासकीय वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरांसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यासंदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समिती ही जागेबाबतची निश्चित करणे, सदस्य संख्या निश्चित करणे तसेच इतर कार्यपद्धती ठरवणे याबाबत निर्णय घेईल.

कुर्ल्यातील शासकीय जमीन डायलेसिस सेंटरसाठी शाहीर अमर शेख प्रबोधनीला

कुर्ल्यातील चेंबूर येथील दोन हजार चौरस शासकीय जमीन डायलेसिस सेंटरसाठी शाहीर अमर शेख लोकनाट्य कला प्रबोधनी संस्थेस भाडेपट्टयाने देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ही प्रबोधिनी पद्मश्री पुरस्कारप्राप्त स्व.नामदेव ढसाळ व सुप्रसिद्ध लेखिका मलिका अमर शेख यांनी स्थापन केली असून, विविध कला व सामाजिक क्षेत्रात तिचे मोठे काम आहे. बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या विकास आराखडा ३४ नुसार रुग्णालयासाठी आरक्षित असलेला हा भूखंड विहीत कार्यपद्धतीनुसार या संस्थेच्या डायलेसीस सेंटरला भाडेपट्ट्याने देण्याचा निर्णय घेण्यात आला.
Powered By Sangraha 9.0