प.पू. सरसंघचालकांचे विचारपाथेय

    12-Oct-2024
Total Views |
Dr. Mohan Bhagwat
 
 प. पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी विजयादशमी उत्सवानिमित्त रेशीमबागेतून स्वयंसेवकांना संबोधित केले. यावेळी सरसंघचालकांनी विविध विषयांवर भाष्य करीत, स्वयंसेवकांचे मार्गदर्शन आणि दिशादिग्दर्शन केले. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार, देशविरोधी पसरविले जाणारे नॅरेटिव्ह आणि संस्कार-मूल्यांच्या हानीसह अन्य महत्त्वपूर्ण विषयांवरही सरसंघचालकांनी मौलिक विचार मांडले. सरसंघचालकांच्या विचारगर्भ उद्बोधनाचा हा सारांश..
 
आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय डॉ. कोपिल्लिल राधाकृष्णनजी, व्यासपीठावर उपस्थित विदर्भ प्रांताचे मा. संघचालक, मा. सह संघचालक, नागपूर महानगराचे मा. संघचालक, अन्य अधिकारी गण, नागरिक सज्जन, माता, भगिनी आणि आत्मीय स्वयंसेवक बंधू...
 
श्री विजयादशमी युगाब्द ५१२६च्या शुभ दिवशी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या कार्याच्या १००व्या वर्षात प्रवेश करत आहे.
 
पुण्यस्मरण
 
गेल्या वर्षी याच पावन दिवशी, राणी दुर्गावतीच्या ५००व्या जयंतीनिमित्त त्यांच्या तेजस्वी जीवनयज्ञाचे आपण स्मरण केले होते. यावर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे ३००वे जयंतीवर्ष आपण साजरे करीत आहोत. देवी अहिल्याबाई एक कुशल राज्य प्रशासक, प्रजाहितदक्ष कर्तव्यपरायण शासक, धर्म, संस्कृती आणि देशाची प्रखर अभिमानी, शीलसंपन्नतेच्या अनुपम आदर्श तसेच, रणनीतीची उत्कृष्ट जाण असलेल्या राज्यकर्त्या होत्या. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या अद्भुत क्षमतांच्या आधारे त्यांनी घर आणि राज्य सांभाळून आपल्या अखिल भारतीय दूरदृष्टीने आपल्या राज्याच्या सीमेबाहेरही तीर्थक्षेत्रांचा जीर्णोद्धार आणि मंदिरांचे पुर्ननिर्माण करून समाजातील समरसता आणि संस्कृती जपली, ते कार्य समाजातील मातृशक्तीसह आपल्या सर्वांसाठीही आजही अनुकरणीय आहे. तसेच, त्या भारताच्या मातृशक्तीच्या कर्तृत्व आणि नेतृत्वाच्या देदीप्यमान परंपरेच्या उज्ज्वल प्रतीक आहेत.
 
यावर्षी आर्य समाजाचे संस्थापक महर्षी दयानंद सरस्वती यांची २००वी जयंती आहे. पराधीन मानसिकतेतून मुक्त होत कालप्रवाहात नीतिमत्ता आणि सामाजिक चालीरीतींमध्ये आलेल्या विकृती दूर करून समाजाला आपल्या मूळच्या शाश्वत मूल्यांवर दृढ उभे करण्याचा प्रचंड उद्यम त्यांनी केला. भारताच्या नवोत्थानातील प्रेरक शक्तींमध्ये त्यांचे प्रमुख नाव आहे.
 
रामराज्यासारखे वातावरण निर्माण होण्यासाठी प्रजेची गुणवत्ता, चारित्र्य आणि स्वधर्मावर दृढ श्रद्धा निर्माण करणारा संस्कार आणि दायित्वभाव प्रत्येकामध्ये रुजवणारी सत्संग मोहीम परमपूज्य श्री श्री अनुकुलचंद्र ठाकूरांनी सुरू केली. आजचा बांगलादेश आणि विभाजनपूर्व उत्तर बंगालमधील पबना येथे जन्मलेले, श्री श्री अनुकुलचंद्र ठाकूरजी होमियोपॅथीचे डॉक्टर होते. त्यांच्या आईनेच त्यांना आध्यात्मिक साधनेची दीक्षा दिली होती. वैयक्तिक समस्यांबाबत त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांमध्ये चारित्र्यविकास आणि सेवाभाव विकसित करण्याची प्रक्रिया साहजिकच ’सत्संग’ बनली, जी सेवाभावी संस्था म्हणून सन १९२५ साली नोंदणीकृत झाली. २०२४ ते २०२५या काळात त्या कर्मधारेची शताब्दीही ’सत्संग’चे मुख्यालय असलेल्या देवघर (झारखंड) येथे साजरी होणार आहे. सेवा, संस्कार आणि विकासाच्या अनेक उपक्रमांद्वारे हे ’सत्संग’ अभियान पुढे जात आहे.
 
भगवान बिरसा मुंडा यांच्या १५०व्या जयंतीवर्षाला दि. १५ नोव्हेंबरपासून सुरूवात होणार आहे. ही सार्धशती आपल्याला जनजातीय बांधवांची गुलामगिरी आणि शोषणातून आणि स्वदेशाची विदेशी वर्चस्वातून मुक्ती, अस्तित्व आणि आपल्या अस्मितेचे रक्षण करण्यासाठी तसेच, स्वधर्माचेही रक्षण करण्यासाठी भगवान बिरसा मुंडा यांनी दिलेल्या ‘उलगुलान’च्या प्रेरणेची आठवण करून देईल. भगवान बिरसा मुंडा यांच्या तेजस्वी जीवनयज्ञामुळेच आपल्या जनजातीय बांधवांच्या स्वाभिमान, विकास आणि राष्ट्रीय जीवनातील योगदानाचा सुदृढ आधार प्राप्त झाला आहे.
 
व्यक्तिगत व राष्ट्रीय चारित्र्य
 
देश, धर्म, संस्कृती आणि समाजाच्या हितासाठी प्रामाणिकपणे आणि नि:स्वार्थपणे जीवन समर्पित करणार्‍या अशा व्यक्तिमत्त्वांचे आपण स्मरण करतो. कारण, त्यांनी केवळ आपल्या सर्वांच्या हितासाठीच काम केले नाही, तर त्यांनी आपल्या जीवनाचा आदर्श आपल्यापुढे प्रस्थापित केला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांत आणि वेगवेगळ्या कालखंडात काम करणार्‍या या सर्व लोकांच्या जीवनात काही गोष्टी समान होत्या. नि:स्वार्थीपणा, निर्वैरता आणि निर्भयता हा त्यांचा स्वभाव होता. जेव्हा जेव्हा संघर्षाचे प्रसंग आले, तेव्हा तेव्हा ते कर्तव्य मानून पूर्ण सामर्थ्याने आणि आवश्यक त्या कठोरतेने त्यांनी पार पाडले. पण, त्यांनी द्वेष किंवा शत्रुत्वाला कधीच थारा दिला नाही. उज्ज्वल शीलसंपन्नता हीच त्यांच्या जीवनाची ओळख होती. म्हणूनच त्यांची उपस्थिती हा दुर्जनांसाठी वचक, तर सज्जनांसाठी आधार होता. वर्तमान परिस्थिती आपल्या सर्वांकडून अशाच प्रकारच्या जीवनव्यवहाराची अपेक्षा करीत आहे. परिस्थिती अनुकूल असो वा प्रतिकूल, वैयक्तिक आणि राष्ट्रीय चारित्र्याची अशी दृढताच मांगल्य आणि सज्जनतेच्या विजयासाठी शक्तीचा आधार बनते.
 
देशाची प्रगती
 
आजचे युग हे मानवजातीच्या वेगवान भौतिक प्रगतीचे युग आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपण आपले जीवन सुख-सुविधांनी परिपूर्ण केले आहे. पण, दुसरीकडे आपल्याच स्वार्थातून उठलेले संघर्ष आपल्याला विनाशाकडे ढकलत आहेत.
मध्य-पूर्वेत ‘हमास’ने इस्रायलबरोबर पुकारलेल्या संघर्षाची व्याप्ती कुठपर्यंत पसरेल, याची चिंता सर्वांनाच भेडसावत आहे. आपल्या देशातही आशा-आकांक्षांसह आव्हाने आणि समस्याही उभ्या ठाकल्या आहेत. या विजयादशमीच्या भाषणात परंपरेने या दोन्ही गोष्टींवर शक्य तेवढी तपशीलवार चर्चा केली जाते. पण, आज मी केवळ काही आव्हानांवर चर्चा करणार आहे. कारण, देशाने आशा-आकांक्षांच्या पूर्ततेसाठी गाठलेली गती कायम राहणार आहे. गेल्या काही वर्षांत भारत एक समर्थ राष्ट्र म्हणून सार्‍या जगात प्रतिष्ठाप्राप्त झाल्याचे सर्वच जण अनुभवतो आहोत. साहजिकच, आपल्या परंपरेत आणि भावनेत अंतर्भूत असलेल्या कल्पनांचा अनेक क्षेत्रात आदर वाढला आहे. आज जग आपली विश्वबंधुत्वाची भावना, पर्यावरणाकडे पाहण्याची दृष्टी, योग इत्यादींचा नि:संकोच स्वीकार करीत आहे. समाजात विशेषत: तरुण पिढीमध्ये ’स्व’ बोधाची भावना वाढत आहे. आपण अनेक क्षेत्रात हळूहळू प्रगती करत आहोत. जम्मू-काश्मीरसह सर्व निवडणुका शांततेत पार पडल्या. देशाची युवाशक्ती, मातृशक्ती, उद्योजक, शेतकरी, मजूर, सैनिक, प्रशासन आणि सरकार असे सर्वच घटक निष्ठेने कार्यरत राहतील, असा माझा विश्वास आहे.
गेल्या काही वर्षात या सर्वांनी राष्ट्रहिताच्या प्रेरणेने केलेल्या प्रयत्नांमुळे जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा, शक्ती, कीर्ती आणि स्थान निरंतर वाढत आहे. पण, जणू आपल्या सर्वांच्या निर्धाराची परीक्षा पाहण्यासाठी काही बुद्धिभेद करणारी कारस्थाने आपल्यासमोर आहेत, जी आपल्याला नीट समजून घेण्याची गरज आहे. देशाच्या सद्यस्थितीवर एक नजर टाकली, तर आपल्यासमोर अशी आव्हाने स्पष्टपणे दिसतात. देशभरात चहुदिशांना अस्थिरता आणि अशांतता निर्माण करण्याच्या प्रयत्नांना वेग आला आहे.
 
देशविरोधी कुप्रयास
 
भारताला जगात असे महत्त्व प्राप्त होत असताना, त्याला खीळ घालणार्‍या, निहित स्वार्थ असलेल्या शक्तींचे असणेही काहीसे अपेक्षितच आहे. उदारमतवादी, लोकशाही प्रकृतीच्या आणि जागतिक शांततेसाठी वचनबद्ध असल्याचा दावा करणार्‍या देशांची ही बांधिलकी त्यांच्या सुरक्षा आणि स्वार्थाचा प्रश्न निर्माण होताच अंतर्धान पावते. मग ते बेकायदेशीर किंवा हिंसक मार्गांनी इतर देशांवर हल्ला करण्यात किंवा लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या त्यांच्या सरकारांना उलथून टाकण्यात मागे राहत नाहीत. भारतात आणि बाहेर जगात घडणार्‍या घटनांकडे लक्ष दिल्यास, प्रत्येकाला या गोष्टी समजू शकतात. असत्य किंवा अर्धसत्य याच्याआधारे भारताची प्रतिमा मलीन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
 
बांगलादेशात नुकताच हिंसक सत्ताबदल झाला. त्याची तात्कालिक आणि स्थानिक कारणे ही त्या घटनाक्रमाची एक बाजू आहे. पण, त्या देशातील हिंदू समाजावर नाहक पाशवी अत्याचाराची परंपरा पुन्हा एकदा दिसून आली. त्या अत्याचारांच्या निषेधार्थ, तेथील हिंदू समाज यावेळी संघटित होऊन बचावासाठी घराबाहेर पडला, त्यामुळे काही प्रमाणात बचावला. पण, जोपर्यंत हा अत्याचारी जिहादी स्वभाव तेथे आहे, तोपर्यंत तेथील हिंदूंसह सर्व अल्पसंख्याक समाजाच्या डोक्यावर धोक्याची तलवार लटकत राहणार आहे. त्यामुळेच त्या देशातून भारतात होणारी बेकायदेशीर घुसखोरी आणि परिणामी लोकसंख्येचा असमतोल हा देशातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. या अवैध घुसखोरीमुळे परस्पर सौहार्द आणि देशाच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बांगलादेशात अल्पसंख्याक बनलेल्या हिंदू समाजाला औदार्य, मानवता आणि सद्भावना या मूल्यांच्या सर्व समर्थकांची, विशेषतः भारत सरकार आणि जगभरातील हिंदूंची मदत आवश्यक आहे. असंघटित आणि दुर्बल राहणे म्हणजे दुष्टांच्या अत्याचारांना आमंत्रण देणे, हा धडा जगभरातील हिंदू समाजानेही घेतला पाहिजे. पण, प्रकरण इथेच थांबत नाही. आता भारत नको म्हणून पाकिस्तानला आवताण देण्याची चर्चा आहे. अशा चर्चा घडवून भारतावर कोणकोणत्या देशांना दबाव आणायचा आहे, हे सांगण्याची गरज नाही. त्याची उपाययोजना हा शासनाचा विषय आहे. पण, समाजासाठी सर्वांत चिंतेची बाब म्हणजे, समाजात असलेले मांगल्य आणि संस्कार नष्टभ्रष्ट करण्याचे, विविधतेचे अलगाववादात रूपांतर करण्याचे, समस्याग्रस्त समाजगटांमध्ये व्यवस्थेबद्दल अविश्वास निर्माण करणे आणि असंतोषाचे अराजकतेत रूपांतर करण्याचे प्रयत्न वाढले आहेत.
 
’डीप स्टेट’, ’वोकिजम’, ’कल्चरल मार्क्सिस्ट’ असे शब्द सध्या चर्चेत आहेत. किंबहुना, हे सर्वच सांस्कृतिक परंपरांचे घोषित शत्रू आहेत. सांस्कृतिक मूल्ये, परंपरा आणि जे काही उदात्त किंवा मंगल मानले जाते, त्याचा संपूर्ण नाश हा या समूहाच्या कार्याचा भाग आहे. समाजाचे मन घडवणार्‍या यंत्रणा आणि संस्था - उदा. शिक्षण व्यवस्था आणि शैक्षणिक संस्था, संवाद माध्यमे, बौद्धिक संवाद इत्यादींना आपल्या प्रभावाखाली आणणे आणि त्यांच्याद्वारे समाजातील विचार, मूल्ये आणि श्रद्धा नष्ट करणे, ही या पद्धतीची पहिली पायरी आहे. समाजात एकत्र राहणार्‍या, कोणताही घटकाच्या वास्तविक किंवा कृत्रिमरित्या निर्माण केलेल्या विशिष्टता, मागणी, गरज किंवा समस्या यांच्या आधारे वेगळे होण्यास प्रवृत्त केले जाते. त्यांच्यात अन्यायाची भावना निर्माण होते. असंतोषाला हवा देऊन तो घटक समाजाच्या इतर घटकांपेक्षा वेगळा आणि व्यवस्थेविरुद्ध आक्रमक बनवला जातो. समाजातील विभेदरेषा शोधून थेट संघर्ष निर्माण केला जातो. व्यवस्था, कायदा, शासन, प्रशासन इत्यादींबद्दल अविश्वास आणि द्वेष वाढवून अराजकता आणि भीतीचे वातावरण निर्माण केले जाते. त्यामुळे त्या देशावर वर्चस्व प्रस्थापित करणे सोपे जाते.
 
बहुपक्षीय लोकशाही शासन प्रणालीमध्ये, पक्ष सत्ता मिळविण्यासाठी स्पर्धा करतात. परस्पर सद्भावनेपेक्षा किंवा राष्ट्राच्या एकता आणि अखंडतेपेक्षा समाजातील लहान हितसंबंध महत्त्वाचे ठरले किंवा पक्षांमधील स्पर्धेमध्ये समाजाची सद्भावना आणि राष्ट्राचा अभिमान आणि एकात्मता या गोष्टी दुय्यम मानल्या गेल्या, तर अशा पक्षीय राजकारणात म्हणजे एका पक्षाच्या समर्थनार्थ उभे राहून पर्यायी राजनीतीच्या नावे आपली विनाशकारी कार्यसूची पुढे नेणे, ही त्यांची कार्यपद्धती आहे. ही काल्पनिक कथा नसून, जगातील अनेक देशांमध्ये घडलेली एक वास्तविकता आहे. पाश्चिमात्य जगातील प्रगत देशांमध्ये या मंत्रविप्लवामुळे जीवनातील स्थैर्य, शांतता आणि मांगल्य संकटात सापडल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. तथाकथित ‘अरब स्प्रिंग’पासून शेजारच्या बांगलादेशात नुकत्याच घडलेल्या घटनांपर्यंत हीच पद्धत अवलंबलेली पाहिली आहे. आपण भारतभर अशाच प्रकारचे दुष्ट प्रयत्न पाहत आहोत - विशेषत: सीमावर्ती भाग आणि जनजातीय लोकसंख्या असलेल्या भागात हे प्रकर्षाने दिसून येते.
 
आपले राष्ट्रीय जीवन सांस्कृतिक एकात्मता आणि श्रेष्ठ सभ्यतेच्या भक्कम पायावर उभे आहे. आपले सामाजिक जीवन उदात्त जीवनमूल्यांनी प्रेरित आणि पोषित आहे. आपल्या राष्ट्रीय जीवनाला हानी पोहोचवण्याचे किंवा नष्ट करण्याचे असे दुष्ट प्रयत्न अगोदरच थांबवणे आवश्यक आहे. त्यासाठी जागरूक समाजालाच प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी आपल्या सांस्कृतिक जीवनदर्शन आणि राज्यघटनेने दिलेल्या मार्गावर आधारित ‘लोकतांत्रिक’ योजना बनवायला हवी. एक सशक्त विमर्श उभा करून वैचारिक आणि सांस्कृतिक प्रदूषण पसरवणार्‍या या कारस्थानांपासून समाजाचे रक्षण करणे ही काळाची गरज आहे.
 
संस्कारांच्या, मूल्यांच्या हानीचे दुष्परिणाम
 
विविध यंत्रणा आणि संस्थांकडून पसरवलेला विकृत प्रचार आणि वाईट मूल्ये भारतातील नवीन पिढीच्या विचारांवर, शब्दांवर आणि कृतींवर वाईट परिणाम करत आहेत. मोठ्यांसोबतच लहान मुलांच्या हातातही मोबाईल पोहोचला आहे, तिथे काय दाखवले जाते, मुले काय पाहत आहेत, यावर फारसे नियंत्रण नाही. त्या सामग्रीचा उल्लेख करणे म्हणजे सभ्यतेचे उल्लंघन होईल, असे हे अत्यंत घृणास्पद आहे. आपल्या स्वतःच्या घरात, कुटुंबात आणि समाजात जाहिराती आणि विकृत दृक-श्राव्य सामग्रीवर कायदेशीर नियंत्रणाची नितांत गरज आहे. तरुण पिढीमध्ये वणव्यासारखी पसरत चाललेली अमलीपदार्थांची सवय समाजालाही आतून पोकळ करत आहे. चांगुलपणाकडे नेणार्‍या मूल्यांचे पुनरुज्जीवन करावे लागेल.
 
मूल्यांच्या र्‍हासाचाच हा परिणाम आहे की, ‘मातृवत् परदारेषु’ मानल्या जाणार्‍या आपल्या देशात मातृशक्तीला अनेक ठिकाणी बलात्कारासारख्या घटनांना सामोरे जावे लागत आहे. कोलकात्याच्या आर. जी. कार हॉस्पिटलमध्ये घडलेली घटना ही संपूर्ण समाजाला कलंकित करणार्‍या अशा घटनांपैकी एक आहे. अशा निंदनीय घटनेचा निषेध आणि त्वरित, संवेदनशील कारवाई करावी, या मागणीसाठी संपूर्ण समाज वैद्यकीय क्षेत्रातील बांधवांच्या पाठीशी उभा राहिला. पण, एवढा जघन्य गुन्हा घडल्यानंतरही गुन्हेगारांना संरक्षण देण्यासाठी काही लोकांकडून जे घृणास्पद प्रयत्न केले गेले, त्यातून गुन्हेगारी, राजकारण आणि दुष्कृती यांची सांगड आपल्याला कशी बिघडवत आहे, हेच दिसून येते.
 
स्त्रियांकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोन - ‘मातृत्व परदारेषु’ - ही आपली सांस्कृतिक देणगी आहे, जी आपल्याला आपल्या सांस्कृतिक परंपरेतून प्राप्त होते. ज्या कुटुंबांतून आणि ज्या माध्यमांतून समाजाला केवळ करमणूकच नाही, तर ज्ञानप्राप्तीही होत आहे, त्या माध्यमांना याचे भान नसणे, या मूल्यांकडे नकळत वा जाणूनबुजून दुर्लक्ष करणे किंवा अनादर करणे, हे खूप महागात पडते आहे. कुटुंब, समाज आणि प्रसारमाध्यमांद्वारे ही सांस्कृतिक मूल्ये रुजवण्याची व्यवस्था पुन्हा जागृत करायला हवी.
 
शक्तीचे महत्त्व
 
आज भारतात सर्वत्र मूल्यांचा र्‍हास आणि भेदभाव करणार्‍या घटकांच्या समाज तोडण्याच्या खेळी दिसत आहेत. जात, भाषा, प्रदेश इत्यादी छोट्या वैशिष्ट्यांच्या आधारे सामान्य समाजाला वेगळे करून संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. छोट्या हितसंबंध आणि छोट्या अस्मितांमध्ये अडकून सर्वनाश करू शकणारे समोर उभे ठाकलेले संकट समाजाला दीर्घकाळ समजू नये, अशी व्यवस्था केली जात आहे. त्यामुळे आज देशाच्या वायव्य सीमेला लागून असलेल्या पंजाब, जम्मू-काश्मीर, लडाख, सागरी सीमाक्षेत्रातील केरळ, तामिळनाडू आणि बिहारपासून मणिपूरपर्यंत संपूर्ण पूर्वांचल अस्वस्थ आहे. या भाषणात पूर्वी नमूद केलेली सर्व परिस्थिती या सर्व राज्यांमध्येही दिसून येईल.
 
देशात विनाकारण कट्टरतावादाला चिथावणी देणार्‍या घटनांमध्येही अचानक वाढ होताना दिसते आहे. परिस्थिती किंवा धोरणांबद्दल असंतोष असू शकतो. परंतु, ते व्यक्त करण्याचे आणि विरोध करण्याचे लोकशाही मार्ग आहेत. त्यांचे पालन न करता हिंसाचार करणे, समाजातील एखाद्या विशिष्ट वर्गावर हल्ला करणे, विनाकारण हिंसाचार करणे, भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, ही गुंडगिरी आहे, असे भडकावण्याचे प्रयत्न होतात वा नियोजनबद्ध पद्धतीने केले जातात. आदरणीय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अशा वागण्याला ’अराजकतेचे व्याकरण’ ('Grammar of Anarchy) असे म्हटले आहे. नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवादरम्यान श्री गणपती विसर्जनाच्या मिरवणुकांवरील दगडफेकीच्या घटना आणि त्यानंतर निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती, हे त्याच व्याकरणाचे उदाहरण आहे. अशा घटना घडू न देणे, घडल्यास त्यावर ताबडतोब नियंत्रण आणणे, दंगेखोरांना तत्काळ शिक्षा करणे, हे प्रशासनाचे काम आहे. पण, ते पोहोचेपर्यंत समाजालाच स्वत:च्या व प्रियजनांच्या जीविताचे व मालमत्तेचे रक्षण करावे लागते. त्यामुळे समाजानेही सदैव पूर्णपणे सजग, सतर्क राहण्याची आणि या वाईट प्रवृत्तींना, त्यांना पाठीशी घालणार्‍यांना ओळखण्याची गरज निर्माण झाली आहे.
 
परिस्थितीचे वरील वर्णन घाबरवणे, धमकावणे, झुंजविणे यासाठी नाही. अशी परिस्थिती निर्माण होते आहे, हे आपण सर्वजण अनुभवत आहोत. सर्वांनी मिळून हा देश एकसंध, सुखी, शांत, समृद्ध आणि सशक्त बनवणे, ही प्रत्येकाची इच्छा आणि कर्तव्य आहे. यामध्ये हिंदू समाजाची जबाबदारी अधिक आहे. त्यामुळे समाजात विशिष्ट प्रकारची स्थिती, सजगता आणि विशिष्ट दिशेने संयुक्त प्रयत्नांची गरज आहे. जेव्हा समाज स्वतः जागृत होतो, स्वतःच्या प्रयत्नाने आपले भाग्य लिहितो, तेव्हा महापुरुष, संघटन, संस्था, प्रशासन, शासन इत्यादी सर्व साहाय्यकारी होतात. शरीराच्या निरोगी अवस्थेत, प्रथम घसरण येते आणि रोग नंतर घेरतात. ‘देवसुद्धा दुर्बलांची पर्वा करत नाही,’ असे एक सुभाषित प्रसिद्ध आहे.
 
अश्वं नैव गजं नैव,
व्याघ्रं नैव च नैव च।
अजापुत्रं बलिं दद्यात्,
देवो दुर्बल घातक:॥
 
त्यामुळेच शताब्दी वर्ष पूर्ण झाल्यानंतर काही विषय हाती घेऊन समाजातील सर्व सज्जनांना सक्रिय करण्याचा विचार संघाचे स्वयंसेवक करत आहेत.
 
समरसता व सद्भावना
 
समाजाच्या सुदृढ आणि सशक्त होण्यासाठी पहिली अट म्हणजे समाजातील विविध घटकांमधील सामाजिक समरसता आणि परस्पर सद्भाव, समंजसपणा. केवळ काही प्रतीकात्मक कार्यक्रम करून हे काम पूर्ण होत नाही. समाजातील सर्व वर्ग आणि स्तरातील व्यक्ती आणि कुटुंबांमध्ये मैत्री असली पाहिजे. आपण सर्वांनी वैयक्तिक आणि कौटुंबिक स्तरावर हा पुढाकार घेतला पाहिजे. एकमेकांच्या सणाच्या प्रसंगी प्रत्येकाच्या सहभागाने ते संपूर्ण समाजाचे उत्सव बनले पाहिजेत. मंदिरे, जलकुंभ, स्मशानभूमी इत्यादी सार्वजनिक वापराच्या आणि श्रद्धेच्या ठिकाणी समाजातील सर्व घटकांच्या सहभागासाठी वातावरण असणे आवश्यक आहे. परिस्थितीमुळे समाजातील विविध घटकांच्या गरजा सर्व घटकांनी समजून घेतल्या पाहिजेत. ज्याप्रमाणे कुटुंबातील सक्षम सदस्य काहीवेळा स्वतःचे नुकसान सहन करूनही, कमकुवत सदस्यांसाठी अधिक तरतुदी करतात, त्याचप्रमाणे आपुलकीची भावना लक्षात घेऊन अशा गरजांचा विचार केला पाहिजे.
 
समाजात अनेक जाती, वर्गांचे संचालन करणार्‍या संस्थादेखील आहेत, ज्या समाजातील विविध जाती गटांना नियंत्रित करतात. संबंधित जातींची प्रगती, सुधारणा आणि प्रबोधन आणि त्यांच्या कल्याणाचा विचार या संस्थांच्या नेतृत्वातून केला जातो. या दोन मुद्द्यांवर जात समाजातील नेत्यांनी एकत्र बसून नियमित चर्चा केली, तर समाजात सर्वत्र सामंजस्याचे वातावरण निर्माण होईल. समाजात फूट पाडण्याचे कोणतेही कुचक्र यशस्वी होणार नाही. पहिला विषय हा आहे की, आपण सर्व विविध जाती आणि वर्ग मिळून देशाच्या हितासाठी, आपल्या कार्यक्षेत्रातील संपूर्ण समाजाच्या हितासाठी, काय करू शकतो? त्याची योजना बनवून ती परिणामांपर्यंत घेऊन जावी. असाच आणखी एक विषय म्हणजे, आपल्यातील दुर्बल जाती किंवा वर्गाच्या कल्याणासाठी आपण सर्व मिळून काय करू शकतो? असे विचार व कृती नित्य घडत राहिल्यास समाज सुदृढ होईल आणि समरसतेचे वातावरणही निर्माण होईल.
 
पर्यावरण
 
अलिकडच्या वर्षांत आपल्या देशात जाणवत असलेली जागतिक समस्या म्हणजे पर्यावरणाची बिघडलेली स्थिती. ऋतुचक्र अनियमित आणि उग्र बनले आहे. उपभोगतावाद आणि जडवादाच्या अपूर्ण वैचारिक आधारावर चाललेला मानवाचा तथाकथित विकासप्रवास हा जवळपास मानवासह संपूर्ण सृष्टीच्या विनाशाचा प्रवास बनला आहे. आपल्या भारताच्या परंपरेतून मिळालेल्या संपूर्ण, सर्वांगीण आणि एकात्म दृष्टीच्या आधारे आपण आपला विकासमार्ग बनवायला हवा होता. परंतु, आपण तसे केले नाही. सध्या हा प्रकार थोडासा ऐकायला मिळतोय, पण वरवर पाहता काही गोष्टी मान्य झाल्या आहेत, काही गोष्टी बदलल्या आहेत. यापेक्षा जास्त काम झालेले नाही. विकासाच्या नावाखाली विनाशाकडे नेणार्‍या विकासाच्या अपूर्ण मार्गावर आंधळेपणाने अनुसरण केल्याचे परिणामही आपण भोगत आहोत. उन्हाळा ऋतू अक्षरश: जाळतो, पाऊस वाहून घेऊन जातो आणि हिवाळा ऋतू जीवन गोठवतो. ऋतूंची ही वेडी तीव्रता आपण अनुभवत आहोत. जंगले तोडल्यामुळे हिरवळ नष्ट झाली, नद्या कोरड्या पडल्या, रसायनांनी आपले अन्न, पाणी, हवा आणि पृथ्वी विषारी केली, पर्वत कोसळू लागले, जमीन फुटू लागली, हे सारे अनुभव गेल्या काही वर्षांत देशभरात येत आहेत. आपल्या वैचारिक आधारावर आपण स्वतःचा मार्ग तयार केला पाहिजे, जो या सर्व तोट्यांवर मात करेल आणि आपल्याला शाश्वत, सर्वांगीण आणि एकात्मिक विकास देईल, याला पर्याय नाही. हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा संपूर्ण देशात समान वैचारिक भूमिका असेल आणि देशाची विविधता लक्षात घेऊन अंमलबजावणीचा विचार असेल. पण, आपण सामान्य लोक आपल्या घरातून तीन छोट्या छोट्या गोष्टी करून सुरुवात करू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे, पाण्याचा किमान आवश्यक वापर आणि पावसाच्या पाण्याचे संवर्धन. दुसरी गोष्ट म्हणजे, प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर करू नये, ज्याला इंग्रजीत ‘सिंगल यूज प्लास्टिक’ म्हणतात, त्या वापरावर पूर्णपणे बंदी. तिसरी गोष्ट म्हणजे, तुमच्या घराबाहेरही हिरवळ वाढेल, झाडे लावली जातील, तुमच्या जंगलातील झाडे आणि परंपरेने लावलेली झाडे सर्वत्र उभी राहतील, याची काळजी घेणे. पर्यावरणासंदर्भातील धोरणात्मक प्रश्न सोडवायला वेळ लागेल, पण हे सोपे काम आपण आपल्या घरापासून लगेच सुरू करू शकतो.
 
संस्कार जागरण
 
संस्कारांच्या क्षरणाच्या संदर्भात अशी तीन स्थाने आहेत, जिथून संस्कार मिळतात, ती संस्कार देण्याची व्यवस्था पुनर्स्थापित करावी लागेल, ती समर्थ, सक्षम करावी लागेल. शिक्षण व्यवस्था पोटाची खळगी भरण्याचे शिक्षण देण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठीही काम करते. आपल्या देशाची सांस्कृतिक मूल्ये साररूपात सांगणारे एक सुभाषित आहे-
 
मातृवत् परदारेषु परद्रव्येषु लोष्ठवत्।
आत्मवत् सर्व भूतेषु य: पश्यति स: पंडित:॥
 
स्त्रियांना मातासमान सन्मानाने वागविण्याची दृष्टी, इतर लोकांच्या संपत्तीला माती समजणे, स्वकष्टाने सन्मार्गाने धन मिळवणे आणि इतरांना दुःख आणि त्रास देणारे असे वर्तन किंवा कार्य न करणे, ही वर्तवणूक ज्याच्याकडे असेल, तो सुशिक्षित समजला जातो. नव्या शैक्षणिक धोरणात या प्रकारचे मूल्यशिक्षण आणि त्या अनुषंगाने अभ्यासक्रम देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र, प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंतच्या शिक्षकांची उदाहरणे विद्यार्थ्यांसमोर दिसल्याशिवाय हे शिक्षण प्रभावी ठरणार नाही. त्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी नवीन यंत्रणा निर्माण करावी लागणार आहे. दुसरे स्थान म्हणजे, समाजातील वातावरण. समाजातील प्रतिष्ठित लोकांच्या लोकप्रियतेमुळे लोक त्यांचे अनुसरण करतात. या सर्व गोष्टी त्यांच्या आचरणात दिसल्या पाहिजेत. त्या प्रमुख व्यक्तींनी या गोष्टींचे मंडण करायला हवे आणि त्यांच्या प्रभावाखाली समाजात चाललेल्या विविध प्रबोधनात्मक कार्यातून हे मूल्यशिक्षण व्हायला हवे. सोशल मीडियाचा वापर समाजाला जोडण्यासाठी, सुसंस्कृत बनवण्यासाठी केला पाहिजे, वाईट संस्कृती पसरवण्यासाठी नाही, याची काळजी सर्व सज्जनांनी घ्यायला हवी.
 
परंतु, शिक्षणाची सुरुवात आणि परिणामस्वरूप बनणारी स्वभावप्रवृत्ती तीन ते १२ वर्षे वयापर्यंत घरातच तयार होते. घरातील वडीलधार्‍यांची वागणूक, घरातील वातावरण आणि घरात होणारे जिव्हाळ्याचे संवाद यातून हे शिक्षण साधले जाते. आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या घराची चिंता करत असताना, हा संवाद जर उत्स्फूर्त नसेल, तर साप्ताहिक आयोजनातून सुरू करावा लागेल. स्व गौरव, देश प्रेम, नीतिमत्ता, श्रेयबोध, कर्तव्यबोध इत्यादी अनेक गुण या काळात विकसित होतात. हे ध्यानात घेऊन या कार्याचा शुभारंभ आपल्या घरापासूनच करायला हवा.
 
नागरिक अनुशासन
 
जीवनमूल्यांच्या अभिव्यक्तीचा आणखी एक पैलू म्हणजे आपले सामाजिक वर्तन. आपण समाजात एकत्र राहतो. आपण एकत्र आनंदाने राहू शकू, यासाठी काही नियम केले जातात. देशकाल परिस्थितीनुसार यात बदल होत राहतात. पण, आपण आनंदाने एकत्र राहता यावे, म्हणून त्या नियमांचे भक्तिभावाने पालन करणे आवश्यक असते. जेव्हा आपण एकत्र राहतो, तेव्हा आपण एकमेकांबद्दलच्या आपल्या वागण्यात काही कर्तव्ये आणि शिस्त विकसित करतो. कायदा आणि राज्यघटना ही देखील एक सामाजिक शिस्त आहे. समाजातील प्रत्येकजण आनंदाने, एकत्र राहावा, प्रगती करत राहावे आणि विखुरले जाऊ नये, याची निश्चिती करण्यासाठी काही अधिष्ठान आणि नियम आहेत. आम्ही भारतीय जनतेने संविधानाद्वारे स्वतःला ही वचनबद्धता दिली आहे. राज्यघटनेच्या प्रस्तावनेतील या वाक्याचा भाव लक्षात घेऊन, प्रत्येकाने संविधानाने व कायद्याने दिलेले कर्तव्य सक्षमपणे पार पाडायचे असते. सर्व लहान-मोठ्या गोष्टींमध्ये हा नियम आणि ही व्यवस्था आपण पाळली पाहिजे. वाहतुकीचे नियम आहेत, विविध प्रकारचे कर वेळेवर भरावे लागतात, त्यामध्ये वैयक्तिक आणि सामाजिक आर्थिक शुद्धतेची आणि पारदर्शकतेची शिस्तही असते. अशा अनेक नियमांचे पालन कर्तव्यबुद्धीने निर्वहन करायला हवे. नियम आणि व्यवस्था याचे पालन शब्दशः आणि भाव लक्षात घेऊन असे दोन्ही प्रकारे (In Letter And Spirit) केले पाहिजे. हे योग्य रीतीने होण्यासाठी आपल्या राज्यघटनेतील चार प्रकरणांची, म्हणजे संविधानाची प्रस्तावना, मार्गदर्शक तत्त्वे, नागरिकांची कर्तव्ये आणि नागरिकांचे हक्क या सर्व गोष्टींची माहिती सर्वत्र पोहोचली पाहिजे, त्यातून समाजाचे प्रबोधन होत राहायला हवे. कुटुंबातून मिळालेली परस्पर वर्तनाची शिस्त, परस्पर व्यवहारातील मांगल्य, सद्भावना, शालीनता आणि सामाजिक वर्तनात देशभक्ती, समाजाप्रती आत्मीयता, कायदा आणि संविधानाचे निर्दोष पालन, या सर्व गोष्टी मिळून व्यक्तीचे वैयक्तिक आणि राष्ट्रीय चारित्र्य घडते. देशाची सुरक्षा, एकता, अखंडता आणि विकास सुनिश्चित करण्यासाठी चारित्र्याचे हे दोन पैलू निर्दोष आणि परिपूर्ण असणे अत्यंत आवश्यक आहे. वैयक्तिक आणि राष्ट्रीय चारित्र्याच्या या साधनेत आपण सर्वांनी सजगता आणि सातत्य राखायला हवे.
 
स्व-गौरव
 
या सर्व गोष्टी सतत टिकवून ठेवण्यासाठी जी प्रेरणा आवश्यक असते ती ‘स्व-गौरवाची’ प्रेरणा असते. आम्ही कोण आहोत? आपली परंपरा आणि आपले गंतव्यस्थान काय आहे? भारतीय म्हणून असलेली आपली सर्व विविधता असूनही, प्राचीन काळापासून चालत आलेल्या एका मोठ्या, सर्वसमावेशक, मानवी म्हणून असलेल्या आपल्या ओळखीचे स्पष्ट स्वरूप काय आहे? या सर्व गोष्टींचे ज्ञान प्रत्येकाला असणे आवश्यक आहे. त्या तेजस्वी गुणांचा अंगीकार केल्याने त्याचा अभिमान मन आणि बुद्धीमध्ये रुजतो, स्थिरावतो आणि त्याच्या आधारावर आपला स्वाभिमान साकार होतो. या स्व-गौरवाच्या प्रेरणाबळामुळेच जगात आपल्या प्रगती आणि स्वावलंबनाचे कारण बनावे, असे आपले वर्तन होते. यालाच आपण ‘स्वदेशीचे आचरण’ म्हणतो. राष्ट्रीय धोरणातील त्याची अभिव्यक्ती समाजातील दैनंदिन जीवनातील व्यक्तींच्या स्वदेशी वर्तनावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. याला ‘स्वदेशी आचरण’ म्हणतात. घरात जे बनते, ते बाहेरून आणू नये. देशातील रोजगार चालावा, वाढावा असे इतके देशात आपल्या घराबाहेरून आणावे. जे देशात बनते, ते बाहेरून आणू नये. देशात बनत नसलेल्या गोष्टीशिवाय जगण्याची सवय लावून घ्यावी. जीवनावश्यक अशी एखादी वस्तू असेल, ज्याशिवाय काम करणे अशक्य असेल, तरच ती विदेशातून विकत घ्यावी. घरातील भाषा, भूषा, भजन, भवन, भ्रमण आणि भोजन हे आपलेच असावे आणि आपल्या परंपरेनुसार याची काळजी घेणे, हेच थोडक्यात स्वदेशी वर्तन आहे. सर्व क्षेत्रात देश स्वावलंबी झाला की, स्वदेशी व्यवहार सोपा होतो. त्यामुळे स्वतंत्र देशाच्या धोरणात देशाला स्वावलंबी बनविणारी नीती अवलंबायला हवी आणि त्याबरोबरच समाजाने प्रयत्नपूर्वक स्वदेशी वर्तनाला जीवनाचा आणि स्वभावाचा एक भाग बनवला पाहिजे.
 
मन-वचन-कर्म, विवेक
 
राष्ट्रीय चारित्र्याच्या वर्तनाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे कोणत्याही प्रकारच्या अतिरेकी आणि अवैध प्रथेपासून स्वतःला दूर ठेवणे. आपला देश हा विविधतेने नटलेला देश आहे. त्याला आम्ही भेद मानत नाही, मानूही नये. आपली विविधता हे सृष्टीचे नैसर्गिक वैशिष्ट्य आहे. एवढा प्राचीन इतिहास, विस्तीर्ण क्षेत्रफळ आणि प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात ही सर्व वैशिष्ट्ये स्वाभाविक आहेत. आपापल्या विशिष्टतेचा अभिमान आणि त्यांच्याबद्दलची संवेदनशीलता देखील स्वाभाविक आहे. या विविधतेमुळे समाजव्यवहारात आणि राष्ट्रजीवनात जे काही घडते, ते सर्वांना नेहमीच अनुकूल असेल किंवा सर्वांनाच सुखावेल, असे होणे शक्य नाही. या सर्व गोष्टी कोणत्याही एका समाजाने केल्या आहेत, असेही नाही. याला प्रत्युत्तर म्हणून कायदा आणि सुव्यवस्थेला बगल देणे आणि बेकायदेशीर किंवा हिंसक मार्गाने अडथळे निर्माण करणे, समाजातील एका संपूर्ण वर्गाला जबाबदार धरणे, विचार, शब्द आणि कृतीत शिष्टाचाराचे उल्लंघन करणे, ही देशासाठी अनुचित गोष्ट आहे.देशातील व्यक्तींसाठी किंचितही लाभकारी नाही. सहिष्णुता आणि सद्भावना ही भारताची परंपरा आहे. असहिष्णुता आणि दुर्भावना हे भारतविरोधी आणि मानवविरोधी दुर्गुण आहेत. त्यामुळे कितीही क्रोध आला, तरी असा असंयम टाळायला हवा आणि तसे करून आपल्या माणसांना वाचवायला हवे. आपल्या कायावाचामने आणि कृतीतूनही कोणाच्याही श्रद्धेचा, पूज्य स्थानाचा, महापुरुषांचा, धर्मग्रंथाचा, अवताराचा, संतांचा अपमान होणार नाही, याची काळजी आपण घेतली पाहिजे. दुर्दैवाने, असे काही दुसर्‍याकडून घडले तरीही, आपण स्वतःवर नियंत्रण ठेवावे. सर्व गोष्टींहून मोलाची, महत्त्वाची गोष्ट आहे समाजातील एकात्मता, एकोपा आणि सद्व्यवहार. हे कोणत्याही राष्ट्रासाठी, कोणत्याही काळी, अंतिम सत्य आहे आणि मानवांच्या आनंदी अस्तित्वाचा आणि सहजीवनाचा एकमेव उपाय आहे.
 
संघटित शक्ती आणि शुद्ध नैतिकता हेच शांतता आणि उन्नतीचा आधार आहेत. परंतु, आधुनिक जगाची रीत बनली आहे त्यानुसार जग सत्याला सत्याच्या स्वतःच्या मूल्यानुसार सत्य म्हणून स्वीकारत नाही. जग शक्तीचा स्वीकार करते. जगातील प्रत्येक राष्ट्राला माहित आहे की भारताच्या मोठ्या होण्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये सद्भावना आणि समतोल निर्माण होईल आणि जग शांतता आणि बंधुतेकडे वाटचाल करेल. तरीही संकुचित स्वार्थ, अहंकार किंवा द्वेषामुळे भारताला मर्यादेत ठेवण्याचे बलाढ्य देशांचे प्रयत्न आपण सर्वजण अनुभवतो आहोत. भारताचे सामर्थ्य जितके वाढेल तितकी भारताची स्वीकारार्हताही वाढेल.
 
‘बलहीनोंकों नही पूछता, बलवानों को विश्व पूजता’
 
ही आजच्या जगाची पद्धत आहे. त्यामुळे उपरोक्त सद्भाव आणि संयमी वातावरण प्रस्थापित करण्यासाठी सज्जनांना सबल बनावे लागेल. जेव्हा शक्ती शीलयुक्त सद्गुणांनी भरलेली असते, तेव्हा ती शांतीचा आधार बनते. दुष्ट लोक स्वार्थासाठी एकत्र येतात आणि सावध राहतात. केवळ शक्तीनेच त्यांना नियंत्रित केले जाऊ शकते. सज्जनांचा सर्वांशी सद्भावना ठेवून असतात, पण एकत्र कसे यायचे ते सज्जनांना कळत नाही. त्यामुळे ते दुर्बल दिसतात. सज्जनांना ही संघटित सामर्थ्यनिर्मितीची क्षमता आत्मसात करावी लागेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे हिंदू समाजाच्या या शीलसंपन्न शक्तीच्या साधनेचे नाव आहे. संघाचे स्वयंसेवक या भाषणात आधी सांगितलेल्या सामाजिक सद्वर्तनाचे पाच मुद्दे घेऊन समाजातील सज्जनांना जोडण्याचा विचार करत आहेत. भारताच्या प्रगतीत अडथळे आणणारे, स्वतःच्या स्वार्थासाठी भारतविरोधी लोकांसोबत येऊन स्वभावतःच द्वेष आणि द्वेषात आनंद मानणारे, अशा शक्तींपासून देशाला सुरक्षित राहून पुढे जावे लागेल. त्यामुळे शीलसंपन्न व्यवहाराबरोबरच शक्तीसाधनाही महत्त्वाची आहे. म्हणूनच संघाच्या प्रार्थनेत कोणीही पराभूत करू शकणार नाही, अशी अजेय शक्ती आणि जगाने विनम्र व्हावे, असे सुशील ईश्वराकडे मागितले आहे. अनुकूल परिस्थितीतही या दोन गुणांशिवाय जगाच्या आणि मानवतेच्या कल्याणासाठी कोणतेही कार्य पूर्ण होऊ शकत नाही. नवरात्रीचा जागर करत असताना सर्व देवांनी आपापल्या शक्तींना एकरूप केले, त्यानंतरच त्या शीलसंपन्न संहत शक्तीने चिन्मयी जगदंबेला जागृत केले, दुष्ट शक्तींचा विनाश झाला, सज्जनांचे संरक्षण झाले आणि जगाचे कल्याण झाले. याच विश्वमंगल साधनेचा संघ मौन पुजारी आहे. ही साधना आपल्या सर्वांना आपल्या पवित्र मातृभूमीला परम वैभवशाली बनविण्यासाठी सामर्थ्य आणि यश देईल. या अध्यात्मिक साधनेने, जगातील सर्व राष्ट्रे स्वतःची प्रगती साधतील आणि आनंद, सुखशांती आणि सद्भावनांनी भरलेले नवीन जग निर्माण करण्यात आपापले योगदान देतील. त्या साधनेमार्गात आपण सारे सादर आमंत्रित आहात.
 
हिन्दू भूमि का कण कण हो अब, शक्ति का अवतार उठे,
जल थल से अम्बर से फिर,
हिन्दू की जय जय कार उठे
जग जननी का जयकार उठे
॥ भारत माता की जय ॥