धर्मादाय आरोग्य सेवकांच्या पदनिर्मितीस मान्यता

12 Oct 2024 15:24:33

Dharmaday hospital

मुंबई, दि. १२ :
धर्मादाय रुग्णालयांमध्ये निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना मोफत व सवलतीच्या दरात उपचार देण्यासाठी योजना कार्यान्वीत आहे. धर्मादाय रुग्णालयांत रुग्णांना मदत व मार्गदर्शन करण्यासाठी शासनाचे प्रतिनिधी उपलब्ध असल्यास, त्यांना वेळेत उपचार मिळणे, योजनेची वेळोवेळी माहिती उपलब्ध करून देण्यास सहाय्यक होईल. ही बाब विचारात घेऊन धर्मादाय रुग्णालयांमध्ये एकूण १८६ धर्मादाय आरोग्य सेवकांची बाह्यस्त्रोताने नेमणूक करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री तथा विधी व न्याय मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विभागामार्फत घेण्यात आला आहे. ही पदे धर्मादाय आयुक्त कार्यालयामार्फत भरण्यात येणार आहेत.

धर्मादाय रुग्णालये योजनेची अंमलबजावणी करीत असतांना सद्यस्थितीत संबंधित धर्मादाय रुग्णालयांमार्फतच वैद्यकीय समाजसेवकाची नेमणूक करण्यात येत होती. हा समाजसेवक रुग्णालयाचा प्रतिनिधी असल्याने त्यांच्यामार्फत रुग्ण किंवा रुग्णांच्या नातेवाईकांना योजनेची उचित माहिती न मिळणे, अनावश्यक कागदपत्रे मागणे, योजनेंतर्गत उपचार करण्यास टाळाटाळ करणे आदी बाबी शासनाच्या निदर्शनास आल्या होत्या. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी धर्मादाय रुग्णालय योजनेच्या अंमलबजावणीसाठी विशेष मदत कक्षाची स्थापना, ऑनलाईन प्रणाली, उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता हेल्पलाईनसह आरोग्य सेवकांची पदभरतीची सुधारणा केली आहे.
आरोग्य सेवकांच्या पदभरतीमुळे धर्मादाय रुग्णालये अधिकाधिक लोकाभिमुख होतील. रुग्ण किंवा रुग्णांच्या नातेवाईकांना योजनेची योग्य माहिती, त्यांच्यावर केवळ आवश्यक कागदपत्रांच्या आधारे उपचार करण्यात येतील. खऱ्या गोर-गरीब गरजू रुग्णांना योजनेनुसार उपचार मिळणे सुलभ होईल. धर्मादाय रुग्णालयाकडून रिक्त खाटांची वेळोवेळी अद्यावत माहिती ऑनलाईन पोर्टलवर देण्यात येत आहे किंवा कसे याबाबत धर्मादाय आरोग्य सेवक यावर लक्ष ठेवतील. योजनेची अधिक प्रभावी व पारदर्शक अंमलबजावणी होण्यास मदत होणार आहे.
Powered By Sangraha 9.0