राष्ट्रीय स्वयंसेवक संघ - शताब्दी सीमोल्लंघन

11 Oct 2024 23:49:07
 
Rashtriya Swansevak Sangha
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ९९ वर्ष पार करून आजच्या विजयादशमीच्या दिवशी शंभरीत प्रवेश करत आहे. एक वेगळे सीमोल्लंघन करण्यासाठी संघ तयार आहे. १९२५ साली नागपुरात लावलेले एक छोटेसे रोपटे आज वटवृक्षाचे स्वरूप धारण करते झाले आहे. त्यानिमित्ताने संघाच्या आजवरच्या वाटचालीचा मागोवा आणि भविष्यातील कार्यवाढीचा ध्यास अधोरेखित करणारा हा लेख..
 
सर्वप्रथम दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा! साडेतीन मुहूर्तांपैकी असा हा एक आजचा दिवस. दसरा-दशहरा/विजयादशमी/सीमोल्लंघन-अशा नावांनी आणि वैशिष्ट्यांनी ओळखला जाणारा हा सण.... या प्रत्येक वैशिष्ट्याला महत्व आहे आणि त्यात समाजाला काही संदेश आहे.
 
दशहरा-आपल्यातील दहा दुर्गुणांवर विजय-काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, स्वार्थ, अन्याय, क्रूरता आणि अहंकार.... म्हणायला आणि वाचायला सोपे वाटते ना? पण, याचा अंगीकार करणे खरंच तेवढेच कठीण आहे!!
 
रावणावर रामाने याच दिवशी विजय मिळवला.... सुष्ट शक्तीने दुष्ट शक्तीचा विनाश केला. पण, रामाने लंकेवर राज्य प्रस्थापित केले नाही. बिभीषणाचा राज्याभिषेक केला! रावण हा खरे तर एक दशग्रंथी ब्राह्मण, अत्यंत शूर, सर्व कलांचा भोक्ता. पण, असुर मानसिकतेमुळे क्रूरता आणि अन्याय करण्याची प्रवृत्ती, महिलांचा अपमान, अधर्मचा झालेला कळस म्हणून रामाला रावणाचा वध करावा लागला. या दिवशी दुष्ट प्रवृत्तीचा विनाश याचे प्रतीक म्हणून ‘रावण दहनाची परंपरा’ आहे.
 
सीमोल्लंघन करण्याचा दिवस. पूर्वापार पावसाळ्यानंतर शेतीचा हंगाम संपला की, देशाच्या रक्षणासाठी, आपल्या देशावर वाकडी नजर असणार्‍यांना जरब बसविण्यासाठी आणि शांततेच्या काळात लष्कराचे सक्षमीकरण करण्यासाठी, युवक आपापल्या शस्त्रांसह गावाबाहेर पडायचे. आपली सीमा ओलांडून जाण्याचा मुहूर्त म्हणजे सीमोल्लंघन, विजयादशमी. प्रत्येकाने आपापल्या क्षमतांचे उल्लंघन करून, आपल्या कर्तृत्वात वाढ करून, अधिक ज्ञान मिळवणे, अधिक धन मिळवणे, अधिक सन्मान मिळवणे. आपल्या क्षमतांचा आणि अंगभूत गुणांचा विस्तार करून कुटुंबाचा, समाजाचा आणि देशाचा उत्कर्ष साधणे म्हणजे सीमोल्लंघन. याचसाठी आपल्या संस्कृतीत या दिवशी ‘शस्त्र पूजनाची परंपरा’ आहे!
 
महिषासुरमर्दिनीने दुष्ट शक्तींचा विनाश केल्यावर आनंद व्यक्त करून, या विश्वात शांतता नांदावी आणि समृद्धी यावी यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात करण्याचा हा दिवस. समाजावर कोणतेही संकट आले, तर त्याच्या निर्वाणार्थ भवानी, दुर्गा, चंडिका, काली माता आपल्या साहाय्यार्थ धावून येतात. या मातेच्या हातात शस्त्र आहेत. प्रसंगी असुरांचे रक्त प्राशन करून या माता आपले रक्षण करतात. मात्र, भक्तांसाठी माता नेहमीच करुणामयी असते. याच वेळी सुगीचा हंगाम सुरू झालेला असल्यामुळे, आपण आपट्याची पाने सोन्याचे प्रतीक/सुख समृद्धीचे प्रतीक म्हणून सर्वांना वाटून शुभेच्छा देतो.
 
मंडळी, आपल्या संस्कृतीत या अशा उदात्त संकल्पना आहेत आणि त्याची जाणीव पूर्वापार आपल्या पूर्वजांनी ठेवली आणि पुढच्या पिढीला दिली. परंतु, असे असतानाही आपण हिंदू पारतंत्र्यात कसे गेलो? एवढा उज्ज्वल वारसा असतानाही, आमचे राष्ट्र गुलाम का झाले? याचा विचार डॉ. हेडगेवार यांनी केला. त्याचे फलस्वरुप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुरूवात झाली. साल होते 1925 आणि मुहूर्त होता विजयादशमीचा! हाच दिवस का? कारण, आमच्यापुढे आदर्श हा कालीमातेचा आणि प्रभू रामाचा आहे. सीमोल्लंघन करण्याचा हा दिवस आहे. देशासाठी, समाजासाठी कार्य सुरू करण्यासाठी यापेक्षा चांगला मुहूर्त तो कोणता? 
 
हिंदूच हिंदूपण विसरला, राष्ट्रासंबंधी स्वाभिमान विसरला, एकमेकांवरील विश्वास आणि अनुशासन विसरला. इंग्रजांनी हिंदू समाजाला जातीपातीमध्ये विभागण्याचे यशस्वी षड्यंत्र अवलंबिले व समाज जातीपातीमध्ये विभागाला गेला. हिंदू स्वतःपुरता विचार करायला लागला, आणि आत्मविस्मृत झाला. यामुळेच बरीच दशके पारतंत्र्यात गेला. हाच हरवलेला स्वाभिमान, एकत्वाची भावना आणि अनुशासन पुन्हा प्राप्त करण्यासाठी हिंदू संघटन आवश्यक आहे. असे सशक्त हिंदूसंघटन करण्यासाठी ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’ची स्थापना झाली. या आधी समाजामध्ये हे कार्य करण्याची स्वाभाविक रचना गुरुकुल, मंदिरे आणि पारिवारिक संस्कार यातून होत होती. परंतु, पारतंत्र्याच्या काळात ही गरज प्रकर्षाने निर्माण झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून डॉ. हेडगेवार यांनी ती रचना उभी केली.
 
हिंदू समाजाला संघटित करायचे, तर त्याची आत्मस्मृती जागृत केली पाहिजे. आपण कोण आहोत? आपला इतिहास काय होता? आपली संस्कृती आणि आपला धर्म कोणता आहे? याचे ज्ञान पुन्हा देण्याची आवश्यकता आहे. यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुरू झाला. यासाठी डॉ. हेडगेवार यांनी आपला धर्म, संस्कृती, परंपरा, जीवनमूल्ये, श्रेष्ठ विचार जगून दाखविणारी कार्यपद्धती शोधून काढली, ती म्हणजे संघशाखांची कार्यपद्धती. एक तासाची शाखा. अर्थात ही साचेबद्ध नाही, तर सतत विकसित होणारी पद्धती आहे. या पद्धतीचे एकच काम, ते म्हणजे व्यक्तिनिर्माण. अनुशासन, बंधुभाव, समरसता, स्वावलंबन, सेवाभाव, राष्ट्रप्रथम हे आणि असे संस्कार, कळत नकळत संघशाखेत होतात. डॉ. हेडगेवार असे म्हणत असत की, “ही व्यवस्था कृत्रिम आहे. समाज आणि संघ असे द्वैत ठेवायचे नसून, संघ लवकरात लवकर समाजात विलीन झाला पाहिजे. आपले हिंदूराष्ट्र आहे, आपण या हिंदू राष्ट्राचे अंग आहोत. हे अंग विघटनामुळे दुर्बल झाले आहे. ते सशक्त करून राष्ट्राला परम वैभवाकडे घेऊन जायचे आहे.”
 
संघ सुरू झाला तेव्हा, राजकीय कार्यक्रमांपासून संघाला दूर ठेवण्यात आले. कारण, संघ नुकताच सुरू झाला होता आणि व्यक्तिनिर्माणाचे काम निर्विघ्न सुरू ठेवायचे होते. डॉ. हेडगेवार स्वतः काँग्रेसशी संबंधित होत आणि काँग्रेसची पदाधिकारी म्हणून जबाबदारी असलेले होते. डॉक्टरजी स्वतः काँग्रेसच्या स्वातंत्र्य आंदोलनात होते. त्यासाठी त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. स्वातंत्र्य मिळवणे हे ध्येय असल्याने संघ स्थापनेनंतरही, डॉ. हेडगेवार यांनी व्यक्तिशः स्वतः आणि अनेक स्वयंसेवकांनी व्यक्तिशः काँग्रेसच्या आंदोलनात हिरहिरीने सहभाग घेतला. तेव्हाही डॉक्टरांना तुरुंगवास भोगावा लागला होता.
 
त्याकाळात एकूणच ‘हिंदू संघटन’ हा एक उपहासाचा विषय आणि त्यामुळे सुरूवातीला संघ कामाकडे पोराटोरांचे काम म्हणून स्वाभाविकपणे दुर्लक्ष केले गेले. त्या संघाच्या कामाचा प्रवास आता दुर्लक्ष ते विरोध ते समर्थन इथपर्यंत येऊन पोहोचला आहे. ‘उपेक्षा ते अपेक्षा’ असे याचे वर्णन करता येईल आणि आता वाटचाल सहयोगाच्या दिशेने होऊ लागली आहे.
 
डॉक्टरांनी आणि त्यांच्या सोबतच्या कार्यकर्त्यांनी अथक प्रवास आणि प्रयत्न करून, संघाचे काम देशभर पोहोचविले. डॉक्टरांच्या हयातीतच संघकामाचा वाढता आवाका सर्वांच्या लक्षात येऊ लागला होता. संघाने अखिल भारतीय स्वरूप घेतले होते. पण, संघकामाची दिशा मात्र कार्यकर्ता निर्माण यावरच भर देणारी होती, मात्र लक्ष निश्चित होते. सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी संघटन जे समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात राष्ट्रीय भावनेचा पुरस्कार जागवेल. संघाच्या आताच्या स्वरूप आणि विस्ताराची बीजे ही डॉक्टरांच्या संघविचारातच आहेत!
 
डॉक्टरांच्या निधनानंतर पूजनीय गुरुजींनी संघ कामाची धुरा सांभाळली. प्रचारक संकल्पना, झपाट्याने कार्यविस्तार आणि भारतभर अखंड प्रवास हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य. संघाची तात्विक आणि वैचारिक भूमिका समर्थपणे मांडण्याचे काम गुरुजींनी केले. फाळणीच्या काळात शरणार्थी/पीडीत हिंदू समाजाला आधार देण्याचे काम संघ स्वयंसेवकांनी केले. त्यावेळी गुरुजींनी देशभर झंझावाती प्रवास केला. महात्मा गांधींची हत्या आणि त्यामुळे संघावरील बंदी, आणि भारतभर संघ स्वयंसेवकांना लक्ष करून झालेले हल्ले, विरोधाचे वातावरण यामुळे संघकाम जवळपास २० वर्षे मागे फेकले गेले. त्यातूनही सावरून गुरुजींनी संघ कामाला पुन्हा एकदा गती दिली. संघ काहीही करणार नाही, पण, स्वयंसेवकच सर्व काही करेल, यावर भर देऊन अनेक क्षेत्रात कामे उभी राहिली. संघातून ज्येष्ठ प्रचारक निरनिराळ्या क्षेत्रांतील कामांना दिले गेले. भारतीय मजदूर संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विवेकानंद केंद्र, वनवासी कल्याण आश्रम, भारतीय जनसंघ इत्यादी कामे उभी राहिली. विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेपासून गुरुजी स्वतः लक्ष घालत होते. त्यांनी सर्व शंकराचार्य आणि धर्माचार्यांना एकत्र आणून, ‘न हिंदू पतितो भवेत्’ याची ऐतिहासिक घोषणा घडवून आणली. संघकामाचा विस्तार हा विविध क्षेत्रांपर्यंत पोचविला. गुरुजींच्या नंतर बाळासाहेब देवरस यांनी संघकामला सेवेचा आयाम जोडला. त्यांच्या कालावधीत देशावर आणीबाणी लादली गेली. त्यावेळी संघाने पूर्ण ताकदीनिशी त्याचा विरोध केला. सत्याग्रह, आंदोलन केले आणि आणीबाणी यशस्वीरित्या परतवून लावण्यास साहाय्य केले. नंतरच्या राजकीय घडामोडीत मात्र संघ अलिप्त राहिला. मीनाक्षीपूरम् धर्मांतर, नंतर एकात्मता यात्रा, फुटीरतावादी खलिस्तान चळवळ, राम जन्मभूमी मुक्ती आंदोलन, बाबरी ढाँचा पडल्यानंतर संघावर आलेली बंदी, अशा संघर्षाच्या घडामोडीत संघाने योग्य भूमिका घेतली आणि त्याचबरोबर कामाचा विस्तारही केला! डॉक्टरांच्या जन्मशताब्दी कालावधीत असंख्य सेवाकार्य सुरू केली गेली. संघशाखांना सेवेचा आयाम जोडला गेला! If untouchability is not bad, there is nothing bad in the world. Untouchability should go lock stock and barrel” ही भूमिका स्पष्टपणे मांडली गेली. नंतरच्या रज्जुभैय्या यांच्या कालावधीत राजकीय क्षेत्रात संघविचारांचा प्रभाव उमटू लागला होता. सेक्युलॅरिझम, समाजवाद वगैरेच्या खोट्या संकल्पनांना धक्का देणारा महत्त्वाचा परिवर्तनाचा असा हा या दोन्ही सरसंघचालकांचा कालावधी.
 
सुदर्शनजी यांचा कालखंड हा संघासाठी ‘संधीकालाचा कालखंड’ मानला जातो. देशाची सनातन हिंदू विचारसरणी आणि 1947 सालापासून अस्तित्वात आलेली विचारसरणी यातील संघर्षाचा हा कालावधी. इस्लाम, ख्रिश्चॅनिटी आणि मार्क्सिझम यांच्या एकांगी विचारधारेवर त्यांनी कठोर टीका केली. मुस्लीम आणि ख्रिश्चन यांच्याशी संवादही त्यांच्याच कालावधीत सुरू झाला. अर्थात, हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व याचा आग्रह जराही न सोडता.
 
सध्या मोहनजी भागवत हे सरसंघचालक आहेत. त्यांच्या कालावधीत संघाने कामात बरेच बदल केल्याचे लक्षात येईल. संघाकामाची व्याप्ती वाढविण्याकडे पूर्ण लक्ष आणि त्याचबरोबर संघ अधिक समाजाभिमुख व्हावा, असे प्रयत्न सुरू आहेत. सेवा, संपर्क आणि प्रचार या माध्यमातून समाजात जागरण घडवून आणण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. समाजातील सज्जनशक्ती जोडून, त्यांना संघाशी आणि निरनिराळ्या उपक्रमांना जोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच बरोबरीने विविध गतिविधी जसे गौसेवा, कुटुंब प्रबोधन, समरसता, पर्यावरण, सामाजिक सद्भाव, ग्रामविकास आणि धर्मजागरण या माध्यमातून समाजातील सज्जन शक्ती, निरनिराळ्या संस्था यांना जोडण्याचे काम वेगाने सुरू आहे. सर्व ज्ञाती, भाषिक, पंथ अशा सर्वांना संपर्क करून, भेदभाव विरहित हिंदूसमाज असे जागरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या सर्व माध्यमातून सनातन हिंदू विचारधारा समाजापर्यंत नेण्याचा आणि त्यात समाजाला जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. संघाच्या कार्यक्रमात आणि उपक्रमात समाजाचा सहभाग या पासून ते समाजाच्या सहयोगाने काम इथपर्यंत संघाचा प्रवास होत आहे. संघाप्रती आपुलकी, सद्भाव, सहभाग ते समाजाचा सहयोग असा हा प्रवास आहे. संघ आणि समाज हे वेगळे नाहीत, तर एकच आहेत या भूमिकेपर्यंत संघकामाची पुढची दिशा आणि प्रवास आहे. संघासंबंधी कुतूहल ते संघाशी जोडण्याची इच्छा असा हा प्रवास आहे. आजच्या घडीला दररोज अक्षरशः हजारो जण ’गेळप ठडड’ या माध्यमातून संघाशी जोडून घ्यायचा प्रयत्न करत आहेत. यात महाविद्यालयीन तरुण आणि व्यवसायी तरुण यांचे अधिकतम प्रमाण आहे. सध्या सरसंघचालक संघ समजून घ्यायचा असेल, तर प्रत्यक्ष संघकामाशी जोडून घेऊन अनुभव घ्या, असे आवाहनही करत आहेत. आज समाजाच्या संघाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. या अपेक्षा समाजाच्याच साहाय्याने पूर्णत्वास नेण्याचे मोठे आव्हान आहे.
 
असा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ९९ वर्ष पार करून आजच्या विजयादशमीच्या दिवशी शंभरीत प्रवेश करत आहे! एक वेगळे सीमोल्लंघन करण्यासाठी संघ तयार आहे. १९२५ साली नागपूरात लावलेले एक छोटेसे रोपटे आज वटवृक्षाचे स्वरूप धारण करते झाले आहे. आज भारतातील प्रत्येक राज्यात, प्रांतात, जिल्ह्यात, तालुक्यात, नगरात, छोट्या गावात, वस्तीत संघाचे काम सुरू आहे. दैनंदिन शाखा, साप्ताहिक मिलन आणि संघमंडळी या स्वरूपाचे काम, कोट्यावधी स्वयंसेवक, अनेक सेवाकार्य, जवळपास ३४ अखिल भारतीय स्तरावरील सहयोगी संस्था, विदेशात हिंदू स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून काम आणि अगणित स्वयंसेवकांनी उभे केलेल्या सेवासंस्थांचे काम, असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे राष्ट्रीय विचार जागविण्याचे काम नाही. डॉक्टरांनी संघ काम लवकरात लवकर विसर्जित व्हावे असे म्हटले होते. त्यासाठी ग्रामीण भागात एक टक्के आणि शहरी भागात तीन टक्के कार्यकर्ता स्वयंसेवक असावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. अजूनही हा पल्ला गाठायचा आहे!
 
या शताब्दी वर्षात काय दिशा असेल? डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे जाहीर कार्यक्रम, समारंभ वगैरे काहीही नाही. ध्यास फक्त आणि फक्त कार्यवाढीचा. विजयादशमीला सीमोल्लंघन करायचे उद्दिष्ट आहे. सीमोल्लंघनाचा अर्थ प्रत्येकाच्या सीमांचे उल्लंघन. प्रत्येकाने आपापल्या क्षमता ओलांडून, त्याही पलीकडे जाण्याचा प्रयत्न करणे. ते ही आपल्या स्वतःच्या प्रवृत्तीत, कुटुंबाच्या वातावरणात आणि समाज आणि देशाच्या प्रकृतीत सकारात्मक आणि आश्वासक बदल घडून यावा म्हणूनच संघाचे आणि स्वयंसेवकांचे सीमोल्लंघन हे कार्य विस्ताराचे आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचण्याचे आहे, प्रत्येक वस्तीत काम नेण्याचे आहे, समाजाचा सहयोग वाढविण्याचे आहे, सज्जन शक्तीला पाठबळ देऊन, त्यांच्या सहयोगाने समाज परिवर्तनाच्या कामाला वेग देण्याचे आहे. पंचपरिवर्तनाच्या माध्यमातून समाजात अपेक्षित बदल घडविण्याचे काम करायचे आहे. कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, स्व-आधारित जीवनशैली, नागरिक कर्तव्ये आणि समरसतापूर्ण व्यवहार हे पाच मुद्दे. त्यासाठी सज्जन शक्ती संघटित करून ‘संघे शक्ती कलौ युगे’ याचा अनुभव त्यांना देणे, समाजाचे नेतृत्व करणे यापासून समाजासोबत चालणे, समाजाचा सहयोग घेऊन चालणे आणि याचे पुढचे पाऊल म्हणजे राष्ट्रीय दृष्टिकोन असलेले समाज नेतृत्व उभे राहून, त्याच्या बरोबरीने वाटचाल करणे. इथपर्यंतचा पल्ला लवकरच गाठायचा आहे. यासाठी आपल्या सर्वांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे.
विजयादशमी आणि सीमोल्लंघनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
 
अरविंद जोशी 
Powered By Sangraha 9.0