तू नवदुर्गा रणदुर्गा अक्षय अविनाशी

11 Oct 2024 23:05:04
 
Navdurga Randurga
 
अध्यात्मानुसार प्राण्याचे शरीर पुरुषतत्वाचे प्रतिक आहे, तर शरीराच्या चलनवलनासाठी आवश्यक असलेले चैतन्य, चेतना म्हणजेच ऊर्जा म्हणजे स्त्री होय! स्त्री ही अनंत काळाची माता आहे, वात्सल्य हे तिचेच रुप. मात्र, गरज पडल्यास ती काली होते, महाकाली होते. हिंदूंना हा इतिहास तसा नवा नाही, पण उजळणी म्हणून स्त्री पराक्रमाचा घेतलेला आढावा...
 
य अंबे जगदंबे सकलांची माता तू सकलांची माता,’ हे जगदीश खेबुडकरांचे गीत गेली चाळीस वर्षे लोकप्रिय आहे. १९८४ साली आलेल्या ’कुलस्वामिनी अंबाबाई’ या चित्रपटातले हे गीत संगीतकार विश्वनाथ मोरे यांनी संगीतबद्ध केलेले असून, आशा भोसले यांनी गायलेले आहे.
 
भव म्हणजे भगवान शिव. त्याची शक्ती म्हणजे भवानी. हिंदू कालगणनेनुसार युगानुयुगे ही भवानी तिच्या विविध रूपांनी, जगाचा व्यवहार चालू ठेवण्याचे तिचे कार्य करत आहे. बुद्धी, विद्या, कला यांची अधिष्ठात्री असते, तेव्हा ती सरस्वती या रूपात असते. सुख, समृद्धी, संपत्ती, आनंद यांची अधिष्ठात्री असते तेव्हा ती महालक्ष्मी असते आणि दुष्ट, दुर्जनांचा संहार करणारी, असुरांचा उच्छेद करून सज्जनांचे परित्राण करणारी म्हणून जेव्हा ती प्रकट होते, तेव्हा ती चंडिका, दुर्गा, महाकाली असते. लोकांना तिची ही सगळीच रूपे सारखीच प्रिय आहेत.
 
सध्या जगातला सर्वात मोठा संप्रदाय म्हणजे ख्रिश्चन धर्म किंवा ख्रिस्तानुयायी उपासना संप्रदाय. त्याचा धर्मग्रंथ जो बायबल, तो साधारणपणे इसवी सनाच्या दुसर्‍या शतकात तयार झाला. दुसरा मोठा उपासना संप्रदाय म्हणजे इस्लाम. त्यांचा धर्मग्रंथ जो कुराण, तो इस्लामी मत संस्थापक मुहम्मद पैगंबर यांच्या हयातीतच म्हणजे, इ. स. ६१० ते इ.स. ६३२ या कालखंडात निर्माण झाला, असे इस्लामी धर्मपंडितांचेच म्हणणे आहे.
 
हिंदूंचे धर्मग्रंथ जे वेद आणि उपनिषदे त्यांचा काळ कित्येक हजार वर्षांपूर्वीचा आहे. वेद-उपनिषदांचे सार असणारी जी भगवद्गीता, तीच मुळी किमान पाच हजार वर्षांपूर्वी भर रणांगणावर सांगितली गेली. आधुनिक काळातले महान दार्शनिक ऋषी असे ज्यांच्याबद्दल रोमा रोलाँ आणि बर्टांड्र रसेल उद्गार काढतात ते योगी अरविंद म्हणतात की, ऋग्वेदाची रचना हजारो नव्हे, तर काही लाख वर्षांपूर्वी झाली. आणि आजमितीला ऋग्वेद हा जगातला प्राचीनतम ग्रंथ आहे, हे (भारतीय हिंदू विद्वान सोडून) जगभरच्या सगळ्या विद्वानांना मान्य आहे.
 
ऋगवेदाची दहा मंडले किंवा प्रकरणे आहेत. पहिल्याच मंडलात ’दीर्घतमस् सूक्त’ नावाचे एक सूक्त आहे. म्हणजे दीर्घतमस् नावाच्या मंत्रद्रष्ट्या ऋषीने या सूक्ताची रचना केलेली आहे. या सूक्तात एक युद्धकथा आहे. खेळ नावाचा राजा शत्रूशी युद्ध करत असताना, त्याची पत्नी राणी विश्चला ही देखील त्याच्या बरोबरीने युद्धात भाग घेत होती. युद्धाच्या धुमश्चक्रीत शत्रूच्या हत्याराच्या आघाताने राणीचा डावा पाय तुटला. खेळ राजाने देवांचे वैद्य जे अश्विनीकुमार त्यांना पाचारण केले. अश्विनीकुमार आले आणि त्यांनी योग्य ती शस्त्रक्रिया करून, राणीला नवा लोखंडी पाय बसवून दिला.
अनेक सहस्रकांपूर्वी भारतीय म्हणजेच हिंदू स्त्रिया पतीच्या बरोबरीने युद्धात सहभागी होत होत्या. जखमीही होत होत्या आणि जखमींना कृत्रिम अवयव बसवण्याइतके हिंदू शल्यशास्त्र प्रगत होते.
 
सिंदुरासुर किंवा सिंधू दैत्य याच्याशी लढाई करायला निघालेल्या गणपती-विनायकाच्या गणांमध्ये म्हणजेच सैन्यांमध्ये ऋद्धी, सिद्धी, बुद्धी अणिमा, लधिमा, गरिमा, महिमा आणि इशिता अशा आठ महिला सेनापतींच्या हाताखाली, महिलांचे युद्धनिपुण असे एक स्वतंत्र पथकच होते, असा उल्लेख गणेशपुराणामध्ये आहे. महिषासुराच्या निर्दालनासाठी निघालेल्या जगदंबेच्या सैन्यातही, देवगणांसोबत महिला योद्ध्यांचे एक स्वतंत्र पथक होते असा उल्लेख देवी भागवतामध्ये येतो.
 
महाभारतात जरी कृष्ण असला तरी, महाभारत म्हणजे कृष्णाचे चरित्र नव्हे. कृष्णचरित्र म्हणजे हरिवंश हा ग्रंथ. त्यात सत्यभामेच्या युद्धकौशल्याचा उल्लेख येतो. प्रागज्योतिषपूरचा राजा नरकासूर याला म्हणे वरदान होते की, कुणा महिलेशी युद्ध केल्याशिवाय त्याला मरण येणार नाही. हे प्रागज्योतिषपूर सध्याचा आसाम किंवा प्राचीन कामरूप देशात, आजच्या गोहाटी शहराच्या परिसरात होते, असे म्हणतात. तर या वरदानाचा फायदा घेण्यासाठी कृष्णाने सत्यभामेला रणांगणावर नेले. आता प्रश्न पडतोच की, तिलाच का? पट्टराणी रुक्मिणीला का नाही ? किंवा जिला चक्रव्यूह कसा रचावा, इतके सखोल युद्धशास्त्रीय ज्ञान त्यानेच दिले होते, या भगिनी सुभद्रेला का नाही? याची उत्तरे माहीत नाहीत. संशोधनास प्रचंड वाव आहे. हे सगळे आम्हा हिंदूंचेच ज्ञानभांडार आहे. त्याचे विस्मृत दुवे- मिसिंग लिंक्स आम्हीच शोधून काढायचे आहेत. असो, तर सत्यभामेला पुढे करून घमासान लढाई केल्यावर अखेर कृष्णाने, अश्विन कृष्ण चतुर्दशीला पहाटे, नरकासुराला सुदर्शन चक्राने ठार मारले, हे आपल्याला माहितच आहे.
 
इ. स. पूर्व ३२५च्या सुमारास ग्रीस-मॅकेडोनियाचा राजा अलेक्झांडर हा दिग्विजयासाठी बाहेर पडला. पॅलेस्टाईन, इजिप्त इत्यादी प्रदेशांमधील राज्ये-साम्राज्य उद्धवस्त करत त्याने पर्शिया उर्फ इराणचे प्रबळ ससानियन साम्राज्य देखील जिंकले. आता तो चित्रळ आणि काबूल नद्यांच्या परिसरात म्हणजेच, अफगाणिस्तानात उतरला. त्यावेळी तिथे गांधार या मोठ्या राज्यासह अनेक छोटी गणराज्ये होती. एक नगर म्हणजे एक गणराज्य अशी सुद्धा होती. अलेक्झांडरला वाटले की, आपण यांना सहज जिंकू. पण, ही गणराज्ये तलवारीची भलतीच तिखट होती. अष्टक नावाच्या गणराज्याने ग्रीकांना तब्बल 30 दिवस झुंजवले. अनंत संतापलेल्या अलेक्झांडरने पराभूत अष्टक राज्यातल्या सैनिकांसह एकूण एक नागरिकाला ठार मारले. पण, पुढच्या टप्प्यावर तर याहून भयंकर सेना ग्रीकांची वाट पाहात होती. आश्वलायन नावाचे गणराज्य आणि त्याची राजधानी मशकावती इथे राणी कृपा ही, महिला सेनानी घोड्यावर स्वार होऊन आपल्या कजाखी महिला नि पुरुष पथकांसह ग्रीकांची वाट पाहात होती.
 
मशक म्हणजे चिलूट, मच्छर, दिव्याच्या ज्योतीभोवती घिरट्या घालणारा छोटासा किडा. पण, मशकावतीची राणी कृपा गरूडासारखी ग्रीकांवर तुटून पडली. घनघोर संग्राम झाला. खुद्द अलेक्झांडरला जबर जखमा झाल्या. पण, अखेर ग्रीकांनी बाजी मारली. आश्वलायन गणराज्य पराभूत झाले. विशेष म्हणजे राज्यातील एकूण एक पुरुष आणि स्त्रिया लढत-लढत ठार झाल्या. कुणीही हत्यार टाकून शरण गेले नाही. आजही बघा, अफगाणिस्तानातले पठाण टोळ्या करून राहतात. ते किती कडवे योद्धे आहेत, याचा अनुभव इंग्रज, अमेरिकन्स आणि रशियन्स सगळ्यांनीच घेतला आहे. दुर्दैवाने त्यांनी इस्लाम स्वीकारला आहे आणि त्यामुळे आपल्या घरातल्या रणरागिणींना बुरख्यात नि घरात बंद करून ठेवले आहे. बायांनो, पाश्चिमात्य राष्ट्रांचा सगळ्यात महान नायक जो अलेक्झांडर, त्याला भर रणांगणात प्राणांतिक जखमा करणार्‍या हिंदू राणी कृपा हिच्या तुम्ही वंशज आहात, हे त्यांना कोण सांगणार? इसवी सनाच्या पहिल्या शतकात, अलेक्झांडरचा इतिहास लिहून काढणारा रोमन इतिहासकार क्विंटस् कर्टियस् रुफस् हा राणी कृपा हिचा उल्लेख ‘क्लिओफेस’ या नावाने करतो.
 
देश कोणताही असो, धर्म, संस्कृती कोणतीही असो, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्रीने रणांगणात उतरणे हे वैशिष्ट्य आपल्याला अनेक ठिकाणी दिसते. मुळातच स्त्री ही शक्तिस्वरूपा आहे. देवांनी त्या शांत, सौम्य महामायेला युद्ध करण्यासाठी म्हणून आवाहन केले. तेव्हा ती शांत स्वरूप टाकून , अत्यंत भीषण अशा रणगर्जना करत युद्धासाठी उभी ठाकली. तिचे ते कराल रूप पाहून देवांनाही धडकी भरली, या वर्णनाचा अर्थ काय?
 
आपल्या हिंदू संदर्भातला अर्थ आपण वर पाहिलाच आहे. आता एका अमेरिकन रणरागिणीची कथा ऐका. १७व्या शतकात युरोपातल्या अनेक देशांमधले, मुख्यतः इंग्लंडमधले लोक अमेरिका या नव्या जगात जाऊन स्थायिक झाले. सुरूवातीला ते इंग्लंडच्याच सिंहासनाशी एकनिष्ठ होते. पण, शतकभराच्या काळात यांच्यात स्वातंत्र्याची अस्मिता निर्माण झाली. त्यांना इंग्लंडचे प्रभुत्व सहन होईनासे झाले आणि अखेर १७७६साली १३ अमेरिकन वसाहतींनी एकत्र येऊन, आपले स्वातंत्र्य घोषित केले. इंग्लंड ही गोष्ट सहजपणे मान्य करणारे नव्हते. त्यामुळे युद्ध सुरू झाले. हेच ते प्रख्यात ‘अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध.’ जनरल जॉर्ज वॉशिंग्टन हा या युद्धात अमेरिकेचा सर्वोच्च सेनापती होता. खरे म्हणजे लढायांना सुरूवात १७७५ पासूनच झाली होती. युद्ध थेट १७८३ सालापर्यंत सुरू राहिले आणि अखेर इंग्लंडने अमेरिकन वसाहती गमावल्या.
 
या कालखंडात आजच्या न्यूयॉर्क-न्यूजर्सी जवळ मॉनमॉथ येथे, १७७८ साली एक घनचक्कर लढाई झाली होती. त्यात स्वातंत्र्यसेनेतून लढणारा जॉन हेस नावाचा एक तोपची होता. एका तोफेसाठी साधारण चार किंवा पाच जणांचा गट असे. एक जण पुढे आकडी लावलेली दांडी घेऊन, तोफेच्या नळीत ती घालून, तोफ साफ करीत असे. मग आधी ओला कपडा बांधलेली दांडी नि मग कोरडा फडका बांधलेली दांडी फिरवून तोफ थंड आणि स्वच्छ करण्यात येई, मग प्रथम रेशमी कपड्यात पुरचुंडी करून बांधलेली बारूद, त्यावर गवताची चुंबळ, त्यावर लोखंडी तोफगोळा नि त्यावर पुन्हा गवताची चुंबळ एवढे जिन्नस ठासून भरण्यात येत. मग तोफेच्या मागच्या बाजूला असलेले छिद्र, त्याला तोफेचा कान म्हणायचे, त्यात सुतळी वात घालून तिच्यावर कोरडी सफेद बारूद टाकण्यात येई. मग हातात एक बेचकी किंवा गलोल म्हणजे इंग्रजी वाय आकाराची काठी घेतलेला साहाय्यक तोपची पुढे येई. त्या बेचकीवर कायम एक दोरखंड पेटवून ठेवलेला असे. मुख्य तोपची तोफेचे ठासणे, तोफेचा कोन हे एकदा तपासून पाही नि साहाय्यकाच्या हातातला पेटता दोरखंड घेऊन वातीवर टेकावे. वात-बारूद गवत’ पेटून गोळ्याला गती मिळे, नि धुडुमधाड आवाज करत गोळा शत्रूवर जाऊन पडे.
 
जॉन हेसची बायको मॉली पिचर-हेस ही म्हणाली, “मी का मागे राहू? पण येणार,” घनचक्कर युद्धात मॉली सैनिकांना पाणी देणे, जखमींना पिछाडीला नेणे इत्यादी कामे उत्साहाने आणि बिनदिक्कत करत होती. एका क्षणी तिचा नवरा जॉन हेसच शत्रूच्या मार्‍याने जखमी होऊन पडला, मॉलीने गोलंदाजीचे तंत्र बघूनच अवगत केले होते. ती ताबडतोब पुढे झाली आणि एखाद्या प्रशिक्षित तोपचीप्रमाणे तिने ती तोफ चालू ठेवली. ही कथा नंतर फार प्रसिद्ध झाली. आपल्याकडे जसे कुणाही वीर महिलेला कौतुकाने ’झाशीची राणी’ म्हटले जाते, तसे आज अमेरिकन कुणाही वीर स्त्रीला ‘मॉली पिचर’ म्हणतात. दि.१३ ऑक्टोबर १७५४ हा मॉलीचा जन्मदिवस. म्हणजे या वर्षी तिच्या जन्माला २७० वर्षे झाली.
 
Powered By Sangraha 9.0