आज नवरात्राची नववी अर्थात ‘नवमी’ ही तिथी... आज आपण पाहणार आहोत, सातार्यातील काळुबाईची कथा...तर गोष्ट अशी घडली, सत्य युगात मांढव्य ऋषी यज्ञ करत होते. प्रदीर्घ काळ चाललेल्या यज्ञाची पूर्णाहुती जवळ आल्याची माहिती गुप्तचराने लाख्यासुरास दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या लाख्यासुराने हा यज्ञ थांबवण्याचे फर्मान तत्काळ त्याच्या सेवकांना दिले. त्यानुसार या असुराचे सैन्य ऋषींच्या यज्ञामध्ये अडथळा आणण्यासाठी निघाले. हे समजताच, सावध झालेल्या मांढव्य ऋषींनी भगवान आशुतोषाची आराधना केली. फक्त काजकल्पद्रुम असणार्या, पिनाकपाणी नीलकंठेश्वराने साक्षात ऋषींना दर्शन दिले आणि आदिमाया पराशक्ती असणार्या अन्नपूर्णास्वरूपिनी पार्वतीची उपासना करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार शीघ्रतेने मांढव्य ऋषींनी पार्वतीची उपासना सुरू केली. कठोर तपश्चर्या पाहून प्रसन्न झालेल्या आदिमायेने यज्ञ पूर्ण होण्याचे वरदान तर ऋषींना दिलेच, मात्र स्वार्थाचा विचार करतील ते साधू कसले? साधू सज्जनांच्या हृदयाला स्वार्थाचा लवलेशही शिवत नाही.
‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह झिजविती परोपकारे’ असे उगाच का म्हटले आहे. स्वतःचा यज्ञ पूर्ण होणार म्हणून एवढ्यावर समाधान न मानता मांढव्य ऋषींनी या लाख्यासुराचा अंत करून समस्त प्रजाजनांना सुखी करण्याची विनंती जगदंबेस केली. भक्तवत्सल असणार्या आईने तत्काळ ही विनंती मान्य करत या असुराच्या निःपातासाठी मी अवतार घेईन, असे वरदान ऋषींना दिले. कालांतराने ऋषींचा यज्ञ आईच्या आशीर्वादाने पूर्ण झाला. मात्र, भविष्यात असे संकट येऊ नये, यासाठी दिलेल्या वरदानानुसार आई जगदंबा, पर्वतराज हिमालयाला सोडून सह्याद्रीतील या महादेवाच्या डोंगरावर येऊन थांबली. या लाख्यासुराला महादेवांनी दिलेल्या वरदानानुसार सकाळच्या कोणत्याही प्रहरात त्याचे निर्दालन करणे शक्य नव्हते. त्यामुळे त्याचा वध करण्यासाठी रात्रीची वेळ जगदंबेने निवडली. पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री काळुबाईचा अवतार घेऊन साक्षात त्या लाख्यासुराला युद्धाचे आव्हान देवीने दिले. घनघोर झालेल्या युद्धामध्ये दीर्घकाळ लढा देऊनही लाख्यासुराला यश आले नाही. अखेर हातातील खड्गाने लाख्यासुराचा अंत करून देवीने त्याच्यावर विजय मिळवला. मात्र, पुन्हा त्यातून नवीन असुर जन्माला येऊ नये, यासाठी साक्षात जगदंबेने कालिका होऊन या लाख्यासुराचे रक्तही प्राशन केले. त्यामुळे प्रजाजनांमध्ये संतोष झाला. सर्वांनी जगदंबेची स्तुती केली, तिची आरती केली. हे पाहून संतुष्ट झालेल्या जगदंबेने सर्वांना आशीर्वाद दिला आणि ती पुन्हा कैलासावर जायला निघाली. त्यावेळी सर्वांनी तिची वाट अडवली आणि या शंभूमहादेवाच्या डोंगररांगेतच वास्तव्य करण्यास विनंती केली. भक्तांची असणारी ही प्रीती आणि त्यातून निर्माण झालेला हा बंध आईला मोडवेना. आईने कैलास शिखरी स्वगृही जाण्याचा निर्णय रद्द करत, या डोंगरावरच वास्तव्य केले, ते आजचे काळुबाई मंदिर होय.
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात मांढरदेव भागात काळुबाई अर्थात श्री काळेश्वरी हिचे मंदिर आहे. समुद्रसपाटीपासून पाच हजार फूट उंचावर शिखरावरती आई विराजमान आहे. नवसाला पावणारी अशी तिची ख्याती पंचक्रोशीत असून अनेक भक्त तिच्या दर्शनासाठी तिथे गर्दी करतात.
हे देवीचे मंदिर कधी बांधले, कोणी बांधले याचा इतिहास ज्ञात नसला तरी त्याची शैली हेमाडपंथी असल्याने ते प्राचीन असल्याचे समजते. मंदिर लहान असून त्यात सभामंडप व मोठा गाभारा आहे. कळस रेखीव असून त्यावर गाय, सिंह यांच्या मूर्ती बसविलेल्या आहेत. मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिरासमोर दीपमाळा आहेत. मंदिर लहान असून त्यात सभामंडप व मोठा गाभारा आहे. गाभार्यामध्ये चांदीचे सुरेख काम केले आहे. देवीची मूर्ती चतुर्भुजा असून ती स्वयंभू आहे. जगदंबेच्या उजव्या हातात त्रिशूल आणि तलवार असून डाव्या हातात दैत्याची मान आणि ढाल पकडली आहे. देवी उभी असून तिचे एक पाय दैत्याच्या छातीवर ठेवलेले आहे. जगदंबेचे वाहन सिंह आहे. पौष पौर्णिमेला या देवीचा उत्सव साजरा केला जातो. त्यावेळी आईची मिरवणूक काढली जाते. असंख्य भक्तांच्या उपस्थितीत हा उत्सव संपन्न होतो. त्यावेळी छबिना मिरवणूक काढली जाते. उत्सवकाळात जत्रा येथे मोठ्या प्रमाणावर होते. आईचा आवडता पदार्थ पुरणपोळी असल्याने अनेक भक्त पुरणपोळीचा नैवेद्य घेऊनच गडावर येतात. आईचे दर्शन घेतात मनोकामना सांगतात आणि पूर्ण झालेल्या मनोकामनांसहित नवस फेडायलाही येथे भाविकांची गर्दी होते. देवी तिच्या भक्तांच्या हाकेला धावून जाते, अशी अनेकांची श्रद्धा आहे. देवी तिच्या सर्व भक्तांवर जसा कृपाशीर्वाद ठेवते, तशीच कृपा आपणा सर्वांवर होवो, हीच जगदंबेचरणी प्रार्थना.
जय जगदंब.
कौस्तुभ वीरकर