संघ बढता जा रहा हैं.....

11 Oct 2024 21:48:21

Hindu Swayamsevak Sangh
 
संघ बढता जा रहा हैं - आज संघ केवळ भारतातील कानाकोपऱ्यात नाही तर भारताबाहेरही आहे. संघाच्या प्रेरणेतून तेथील भारतीय वंशाची लोकं 'हिंदू स्वयंसेवक संघ', 'सेवा इंटरनॅशनल', 'विश्व हिंदू परिषद' , 'फ्रेंड्स सोसायटी ऑफ इंडिया' , 'बालगोकुल' अशा अनेक संस्थांच्या माध्यमातून त्या त्या देशातील गरजेनुसार काम करत आहेत. ५० हून अधिक देशांत हे जाळे विणले गेले आहे. गेल्या काही वर्षांपासून दैनंदिन संघशाखेबरोबरच आपल्या समाजाला पूरक अशा काही क्षेत्रांत भरीव काम चालू आहे. आजच्याच दिवशी दसऱ्याच्या मुहूर्तावर १९२५ साली स्थापन झालेल्या आणि शताब्दी वर्षात पदार्पण करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या यशस्वी वाटचालीचा धांडोळा घेणारा हा लेख...
 
आपल्या हिंदू राष्ट्राला (परिचित भाषेत भारत देशाला) स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेक राष्ट्रभक्तांनी आपल्या आयुष्याची आहुती दिली, पैकी एक म्हणजे संघ संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार.
 
नागपुरातील सीताबर्डीच्या किल्ल्यावरून युनियन जॅक खाली उतरवण्यासारख्या अनेक घटनांतून केशवचे बालवयापासूनचे सक्रिय राष्ट्रप्रेम ध्यानात येते. कोलकता येथे वैद्यकीय शिक्षण घेत असताना तेथील क्रांतिकार्यात (काँग्रेसच्या जहाल गटात) सहभाग होता. डॉ. ही पदवी मिळवून नागपुरात परतल्यावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये (मवाळ गटात) सक्रिय होते. जंगल सत्याग्रहात वर्षभर सश्रम कारावासात होते. स्वातंत्र्य चळवळीत सहभागी असताना डॉ. ना ' जातीपाती, चाली रिती ' अश्या अनेक विविधतेमुळे हिंदू समाज (भारतीय) असंघटित, स्वार्थी आणि दुबळा झाला आहे आणि जर हिंदुराष्ट्राला पुन्हा स्वातंत्र्य आणि वैभव प्राप्त करायचे नव्हे ते कायमचे टिकवायचे असेल तर निस्वार्थ, देशप्रेम, शिस्त ह्या त्रीसूत्रीचा अवलंब करून हिंदू समाज संघटित करण्याशिवाय गत्यंतर नाही. त्यातूनच १९२५ सालच्या दसऱ्याला नागपुरात मोहित्यांच्या पडक्या वाड्याच्या पटांगणात संघ शाखेची सुरुवात झाली.
 
एक तासाची संघशाखा हीच गेल्या शंभर वर्षाच्या विशाल संघकार्याची गुरुकिल्ली आहे. तासभराच्या शाखेत काही अनिवार्य कार्यक्रम (उदा. एकात्मता मंत्र, भगव्या ध्वजाला साक्षी ठेवून प्रार्थना) सोडले तर बल (शक्ती), अनुशासन, संस्कार , आणि एकात्मता ( किंवा संघटन) ह्यासाठी विविध कार्यक्रम (खेळ, व्यायाम, समता, गीत, बोधकथा, सुभाषित) होतात. शाखा एक तासच असली तरी तेच रुजलेले संस्कार,शिस्त आणि अनुशासन उर्वरित २३ तास अन्य ठिकाणीही आपल्या अनुकरणात राहतील हा दैनंदिन शाखेचा उद्देश आहे.
 
दैनंदिन शाखेव्यातिरिक्त सहा उत्सव सण साजरे केले जातात. वर्षप्रतिपदा (हिंदू कालगणने प्रमाणे वर्षाचा पहिला सण), हिंदू साम्राज्य दिन (ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी जेव्हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तो दिवस - संघाने जन्मापेक्षा कर्माला महत्त्व दिले आणि म्हणून जयंती ऐवजी राज्याभिषेक दिन साजरा केला जातो), गुरुपूजन आणि समर्पण (संघात व्यक्तिमहत्व अजिबात नाही त्यामुळे सतत प्रेरणा देणारा आणि आपल्या सनातन धर्माचे प्रतीक असलेला भगवा ध्वज गुरुस्थानी आहे. संघात देगणी घेतली जात नाही, संघाचा सर्व आर्थिक खर्च हा गुरुपूजनाच्या दिवशी केवळ संघ स्वयंसेवकांनी केलेल्या समर्पणातून भागवला जातो आणि विशेष म्हणजे वर्षाच्या शेवटी शिल्लक काहीही न ठेवता , राहिलेली शिल्लक अन्य संस्थांना दिली जाते), रक्षाबंधन (राष्ट्रप्रेमाच्या धाग्याने सर्व समाजाचे रक्षण करण्यासाठी एकत्र येणे) विजयादशमी (दसऱ्याला निघणारे पथसंचलन - माझ्या माहितीत तरी असे पथसंचलन फक्त संघाचेच होते), मकरसंक्रांत (तिळगुळाच्या माध्यमातून सर्व समजात स्नेह-सौहार्दपूर्ण वातावरण राखणे) असे सहा उत्सव साजरे केले जातात.
 
१९४८ गांधीहत्येशी संघाचा सुतराम संबंध नसताना सरकारने बंदी घातली, गुरुजींच्या (माधव सदाशिव गोळवलकर) नेतृत्वात संघाने शांततेने आणि धीराने सर्व सोसले. क्रियेला प्रतिक्रियेने उत्तर न देता , प्रतिसाद दिला. विविध क्षेत्रात संस्थात्मक काम करण्याचे ठरवले, पथ्य हे पाळले की संघाने ह्या संस्था उभ्या केल्या नाहीत, तर संघाने प्रचारक किंवा स्वयंसेवकांना निवडून त्यांना विविध क्षेत्रात पाठवले आणि त्यांनी नवीन संस्था जीवाचे रान करून उभ्या आणि समृद्ध केल्या. संघ परिवार हा शब्द त्यातूनच रूढ झाला. जनसंघ (आताचा भाजपा), ABVP, भारतीय मजदुर संघ, वनवासी कल्याण आश्रम, विश्व हिंदू परिषद, संस्कार भारती, क्रीडा भारती, अश्या अनेक संस्था त्यातून आपल्या पायावर उभ्या राहिल्या. संघ ह्या पैकी कुठल्याही संस्थेत हस्तक्षेप करत नाही, पण समन्वयाचे काम करतो, आवश्यकता असेल तेथे स्वयंसेवक पुरवतो. संघात, संघ शाखेला पॉवर हाऊसची ऊपमा दिली जाते , म्हणजे तेथे सतत वीज ( म्हणजे शक्ती) तयार केली जाते आणि ती जेथे आवश्यकता असेल तेथे पुरवली जाते. संघ स्वयंसेवकांना समाजात काम करताना एक कानमंत्र अवश्य दिला जातो की, आपल्याला समाजाला संघटित करायचे आहे, समाजात वेगळे संघटन उभे करायचे नाही आणि समाजातील सकारात्मक ( Strengths) घटकांचा सुयोग्य वापर करा.
 
संघाने आपली मूल्ये सतत जपली पण काळाप्रमाणे संघ आवश्यक बदलही करत आहे, हेच संघाच्या वाढीचे प्रमुख कारण आहे. अयोध्येतील बाबरी ढाचा जेव्हा पडला तेव्हा पुन्हा संघावर बंदी आली, त्यावेळी कै. प्रमोद महाजनांच एक भाषण ऐकले होते - "संघ काही हाफ पँट मध्ये नाही, जोपर्यंत एका माणसाला दुसऱ्या माणसाबरोबर भेटता येणार नाही, तोपर्यंत संघ बंदी होऊच शकत नाही." अरे हो संघाची हाफ चड्डी (निकर) ही एक मोठी ओळख होती, पण आता ती फुलपँट झाली, पट्टा ही चामड्या ऐवजी कापडी आला. गंमत म्हणजे हाफ पँट ची लाज वाटल्यामुळे जे संघाचा गणवेश घालायचे नाहीत ते आता गणवेश घालून स्वतः ला मिरवतात, संघाचे गणवेशधारी स्वयंसेवक त्यामुळे वाढलेच बरं. संघाला सिल्व्हर, गोल्डन जुबली साजरी करायची नाही असे संघ संस्थापक नेहमी म्हणायचे, याचा अर्थ काम गतीने व्हावे, त्यामुळे संघ वाढीसाठी नेहमीच कार्यशील असतो. "जॉइन आरएसएस", वेब साईट अश्या आधुनिक तंत्रांचा वापर होत आहेच पण संघाचा आत्मा आहे संपर्क, त्यामुळे नवीन नवीन लोकांशी संपर्क करून सज्जनशक्तीला संघात आणण्याचे काम अविरत सुरू आहे.
 
आपल्यावर (आपल्या जिल्ह्यापासून ते अगदी देश पातळीवर) कुठलीही आपत्कालीन स्थिती आली की संघ स्वयंसेवक तेथे निस्वार्थ बुद्धीने जातो , काम करतो, आवश्यक निधी उभा करतो हे सर्वपरिचित आहे परंतु अश्या समस्या आल्यानंतर काम सुरू केल्यास त्याला काही मर्यादा असतात, आणि म्हणून कायमस्वरूपी काम करण्यासाठी जनकल्याण समिती सारख्या संस्था उभ्या राहिल्या. संघाने "नरसेवा हीच नारायणसेवा", किंवा "जनसेवा ही ईश्वरभक्ती" ही केवळ गीते म्हंटली नाही तर अनेक सेवाकार्य उभी केली. मुंबईतील टाटा हॉस्पिटल ला बाहेरून येणाऱ्या रुग्णांना राहण्याची सोय नाना पालकर केंद्रात केली जाते, संभाजीनगर येथील डॉ. हेडगेवार रुग्णालय तर एक आदर्श उदाहरण आहे.
 
संघाची कार्यपद्धती आणि संघात वापरले गेलेले काही चपखल शब्द ह्या साध्या,सोप्या गोष्टींमुळे निस्वार्थ बुद्धीने आणि शिस्तबध्द पद्धतीने काम करणारे अगणित राष्ट्रभक्त तयार होतात. उदा. संघशाखेत आल्यावर चपला एका ओळीने काढल्या जातात, ह्याचा परिणाम की सामाजिक ठिकाणी संघ स्वयंसेवकांची चप्पल इकडे तिकडे उडवलेली मिळणार नाही. इंग्रजांनी आदिवासी हा शब्द जाणून बुजून रूढ केला, पण संघात त्यांना वनवासी (म्हणजे वनात राहतात ते वनवासी आणि शहरात राहतात ते शहरी , गावात राहतात ते ग्रामीण). एक छोटासा खेळ - "काश्मीर किसका है | हमारा है" पण त्याचा अनेक वर्षांनी परिणाम म्हणजे काश्मीरचे ३७० रद्द झाले. गरीब लोक झोपड्यात राहतात पण त्यांना झोपडपट्टी असे न संबोधता "सेवावस्ती " हा सुयोग्य शब्द वापरला जातो. "चंदन" म्हणजे सगळ्यांनी एकत्र बसून आणलेले पदार्थ खायचे ( पॉट पार्टी म्हणा), शेजारी बसलेला कुठल्या जातीचा, आर्थिक किंवा शिक्षण काय सारे भेद एका क्षणात गळून पडतात. "बैठक" म्हणजे बोली भाषेत आपण मीटिंग म्हणतो ह्याचाही दैंनदिन काम कसे चाललंय ह्याचा आढावा घेणे, व पुढील गोष्टींचे नियोजन ह्यासाठी खूप उपयोग होतो. विशेष म्हणजे बैठकीत आपापले विचार मांडू शकतो, पण नंतर सर्वानुमते जे ठरेल त्याप्रमाणे सगळे काम करतात, बैठकी बाहेर आपला वेगळा अजेंडा घेऊन कुणी काम करत नाही, ह्यामुळे जे ठरले तेच घडते. ' चंदन है इस देश की माटी ', ' देश हमे देता है सबकुच, हम भी तो कूच देना सिखे ' अश्या साध्या सोप्या गीन गायानातून देशभक्ती रक्तात कधी भिनते ते कळतच नाही.
 
संघ बढता जा रहा है - आज संघ केवळ भारतातील कानाकोपऱ्यात नाही तर भारतबाहेरही आहे. संघाच्या प्रेरणेतून तेथील भारतीय वंशाची लोक "हिंदू स्वयंसेवक संघ", "सेवा इंटरनॅशनल", "विश्व हिंदू परिषद" , "फ्रेंड्स सोसायटी ऑफ इंडिया" , "बालगोकुलं " अश्या अनेक संस्थांच्या माध्यमातून त्या त्या देशातील गरजेनुसार काम करत आहेत. ५० हून अधिक देशात हे जाळे विणले गेले आहे. गेली काही वर्षापासून दैनंदिन संघशाखेबरोबरच आपल्या समाजाला पूरक अश्या काही क्षेत्रात भरीव काम चालू आहे. "पर्यावरण" विभाग 3P ( पेड, प्लास्टिक, पानी) वर काम करत आहे. एकत्र कुटुंब पद्धती हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य पण "हम दो हमारे दो" किंवा आता तर एकच ह्यामुळे कौटुंबिक मूल्यांचे जतन अवघड होत आहे (उदा. केक कळल्याशिवाय वाढदिवस सोडा हल्ली लग्न पण साजरे होत नाही) , ते सुधारण्यासाठी "कुटुंब प्रबोधन" आहे. खरा भारत अजूनही खेड्यात आहे, आणि हरित क्रांती आणि धवल क्रांतीच्या नादात आपण गो आधारित शेती सोडून रासायनिक शेती करू लागलो, बियाणे जतन न करता हायब्रीड बियाणे विकत घेऊ लागलो, ज्याचे दुष्परिणाम सर्वसमाज कुपोषण, मधुमेह, कॅन्सर सारख्या भयानक आजारांतून भोगत आहे, ह्यात बदल आणण्यासाठी ग्रामविकास आणि गोसेवा असे विभाग काम बघत आहेत. अलगावतावाद, मतपरिवर्तन ( किंवा धर्मांतरण) ह्या समस्या केवळ सीमा भागात सीमित राहिल्या नसून दहशतवाद आणि जिहादच्या अनेक घटना आपल्या वस्तीत घडत आहेत,त्यासाठी धर्म जागरण विभाग आहे.
 
संघ म्हणजे काय हे एका छोट्या लेखात समजून घेणे हे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे, त्यासाठी खरी गरज आहे ते संघ अनुभवण्याची आणि संघ अनुभवायचा असेल तर दैनंदिन संघशाखेत जाण्याशिवाय पर्याय नाही. रोज थेंब थेंब होणाऱ्या जलाभिषेकानेच आपण शुद्ध होतो. म्हणूनच म्हणेन - " संघात चला. आम्ही बी घडलो,.तुम्ही बी घडा ना".
 
 अजित वर्तक, गोरेगाव पूर्व
८०९७७९६०७०
Powered By Sangraha 9.0