मुंबई : भारताचे ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी ९ ऑक्टोबर २०२४ रात्री उशीरा वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती ठिक नव्हती आणि अखेर बुधवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रतन टाटा यांच्या निधनाने देशासह जगभरातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मराठी अभिनेता कुशल बद्रिके यानेही रतन टाटा यांच्या निधनानंतर भावूक पोस्ट शेअर केली आहे.
कुशलने त्याच्या सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत रतन टाटा यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे. त्याने लिहिले आहेक की,” एखाद्याला निरोप देताना आपण सहज “टा-टा” म्हणतो, पण “रतन टाटा” सर, तुम्हाला सहज निरोप देता येत नाहीये. तुम्ही देशाला नुसतं फोनने नाही तर माणुसकीने जोडलंत, माणसांमधल्या cancerच्या तारा कापून, इलेक्ट्रिकच्या तारांनी देश जगवलात. तुम्ही बनवलेल्या गाड्या जर भारतातल्या रस्त्यावरून धाऊ शकतात तर त्यातून आम्ही चंद्रावर सुद्धा सहज प्रवास करू अशी मला खात्री वाटते. भारताला सुजलाम सुफलाम म्हणतात ते तुमच्या सारख्या महान व्यक्तींमुळेच. “रतन टाटा” सर तसा आपला वैयक्तिक असा कधी संबंध आला नाही. लेकिन, मैने आपका नमक खाया है ! आणि संबंधाचं म्हणाल तर “देवा” सोबत ही माझा वयक्तिक असा कधी संबंध आला नाही, पण त्याचे अनंत उपकार कधीच विसरता येणार नाहीत. आणि तुमचे सुद्धा.
दरम्यान, टाटा समूहाने दिलेल्या माहितीनुसार, रतन टाटा यांच्या पार्थिवाचे दर्शन आज १० ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स लॉनमध्ये सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत घेता येणार आहे. तसेच, त्यांच्या पार्थिवावर शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.