कोल्हापूर : "लव्ह जिहाद"ची एक लाख प्रकरणे समोर आली आहेत. या निवडणुकीत आपण ‘व्होट जिहाद’ पाहण्यास मिळाला. हिंदू धर्म संपविण्याकरिता आणि हिंदूविरोधी लोकांना पदावर बसविण्याकरिता जर मतदान होणार असेल, तर माझा हिंदू समाजाला दिशा देणार्या साधू-संत आणि सज्जन शक्तींच्या प्रतिनिधींनादेखील हिंदुत्व जागृत करावेच लागेल,” असे आवाहन राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, दिनांक ३० सप्टेंबर रोजी केले. कोल्हापूर येथे आयोजित संत समावेश कार्यक्रमात ते बोलत होते.
फडणवीस पुढे म्हणाले की, “एक काळ असा होता की, ‘लव्ह जिहाद’बाबत बोलले जायचे तर आम्हालाही वाटायचे की ‘लव्ह जिहाद’ची एखादी घटना आहे. पण आज दहा वर्षांनी पाहातो आहे की, एक लाख प्रकरणे समोर आली आहेत. हिंदू समाजातल्या मुलींना फूस लावून पळवून नेऊन लग्न केले. दोन धर्मांतल्या व्यक्तींचे लग्न झाले, तर नकार असण्याचे कारण नाही. पण खोटी ओळख सांगायची, खोटे बोलून फसवायचे आणि लग्नानंतर दोन-तीन मुले झाली की, सोडून द्यायचे आणि पुन्हा नवीन लग्न करायचे. हे षड्यंत्र चालले आहे. हे ‘लव्ह जिहाद’ आहे. आमच्या समाजातल्या मुलींना नासवण्याचे आणि फसविण्याचे काम चालले आहे,” असे ते म्हणाले.
“लोकसभा निवडणुकीत आपण पाहिले कशाप्रकारे आपल्याला व्होट जिहाद’ पाहण्यास मिळाला. काय अर्थ आहे ‘व्होट जिहाद’चा? धुळ्यासारखी जागा, ज्या जागेवर पाच विधानसभांत १ लाख, ९०हजार मतांनी पुढे असलेला उमेदवार हा मालेगावमध्ये या एका विधानसभेत १ लाख, ९४हजार मतांनी मागे जातो आणि चार हजार मतांनी निवडणूक हारतो. निवडणुकीतली हार-जीत महत्त्वाची नाही. कधी हा पक्ष, तर कधी तो पक्ष जिंकेल. पण काही लोकांचा आत्मविश्वास वाढला आहे की, आमची संख्या कमी असली तरीही आम्ही संघटित मतदान करून हिंदुत्ववाद्यांना पराभूत करू शकतो,” याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले. ते पुढे म्हणाले, “असे आपण म्हणतो ना, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, परंतु काळ सोकावतो. तशाप्रकारे काळ सोकावत आहे. या निवडणुकीतला ‘व्होट जिहाद’ आहे त्यात ४८पैकी १४मतदारसंघांमध्ये अशा जिहादी पद्धतीने आपल्याला मतदान होताना दिसले आहे.
हिंदुत्व जागृत करावंच लागेल
“हिंदू समाजाने कधीही दुसर्या धर्माचा अनादर केला नाही. हिंदू धर्म म्हणजे सहिष्णुता आहे. आमच्या रक्तात सहिष्णुता आहे. मात्र, जर हिंदू धर्म संपविण्याकरिता आणि हिंदूविरोधी लोकांना पदावर बसविण्याकरिता जर मतदान होणार असेल, तर माझा हिंदू समाजाला दिशा देणार्या साधू-संत आणि हिंदू धर्माला दिशा देणार्या सज्जनशक्तीच्या प्रतिनिधींना माझे आवाहन आहे की, तुम्हालाही हिंदुत्व जागृत करावेच लागेल. आज ती वेळ आलेली आहे. आज लोकसंख्येत कमी संख्या दिसत असली, तरी मोठ्या संख्येने धर्मपरिवर्तन होते आहे. तुम्हालाही हिंदू समाजाला जागरूक करावे लागणार आहे,” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.