मागील आठवड्यात प्रसारमाध्यमांतील एका बातमीने सर्वांचेच लक्ष वेधले गेले. ते म्हणजे ‘वीर सावरकर’ चित्रपटाची ‘ऑस्कर’साठी झालेली निवड. त्यानंतर ही प्रवेशिका अधिकृत नसल्याचे ‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’कडून सांगण्यात आले असले, तरी या चित्रपटाच्या निर्मात्यांनी स्वतंत्रपणे त्याची प्रवेशिका सादर केली असल्यामुळे या चित्रपटाचा ‘ऑस्कर’साठी निश्चितपणे विचार होणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार सिनेमाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचतील आणि चर्चादेखील होईल. त्यानिमित्ताने...
रणदिप हुड्डा यांचा ‘वीर सावरकर’ चित्रपट दि. 22 मार्च 2024 या दिवशी प्रदर्शित झाला. पण, दि. 14 मार्चलाच हा चित्रपट बघण्याचे भाग्य मला लाभले. याचे कारण म्हणजे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचे तज्ज्ञ अभ्यासक म्हणून मुंबईच्या फिल्म डिव्हिजनमध्ये ‘सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’च्यावतीने नियमित परीक्षक मंडळासमवेत चित्रपटाबाबत परीक्षण करून आवश्यक त्या सूचना किंवा बदल सूचवण्याची संधी मिळाली. त्यानंतरच या चित्रपटाला प्रमाणित करून प्रदर्शनाची परवानगी मिळणार होती. ‘फिल्म डिव्हिजन’च्या संकुलातील थिएटरमध्ये या चित्रपटाचे परीक्षण करताना पहिल्यांदाच तो बघण्याचे भाग्य मिळाल्याचा आनंद आणि अभिमान माझ्यासारख्या सावरकरभक्ताला झाला होता. पण, त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार तसेच त्यांच्या कृती चुकीच्या पद्धतीने प्रदर्शित होणार नाहीत, याबाबत आवश्यक सूचना अथवा बदल सूचवून त्यांचे वास्तववादी चित्रणदेखील जगभरातील सावरकरभक्तांपर्यंत पोहोचवण्याची ही अमोल संधी मिळाली असल्याचे समाधानदेखील होते. चित्रपटाच्या प्रारंभापासून त्याचे सादरीकरण हे तांत्रिकदृष्ट्या उच्च दर्जाचे होतेच.
परंतु, कथानक, अभिनय यांचे वास्तववादी चित्रण पाहताना समोर तात्यारावच आहेत, याचा भासच होत होता. तात्यांनी लिहिलेले सर्वच साहित्य अनेकदा वाचले गेले होते. त्यांच्या अनुवाद प्रकल्पावरदेखील कार्य करताना अनेक संदर्भ बारकाईने अभ्यासता आले होते. त्यामुळे ते संदर्भदेखील आठवत गेले आणि निर्माते, लेखक यांनी घेतलेली मेहनत आढळून आली. पण, तरीही काही गोष्टी अधिक परिणामकारक होण्यासाठी काही बदल आवश्यक वाटले. या प्रदर्शनानंतर निर्माते रणदिप हुड्डा यांच्यासमवेत ‘सेन्सॉर बोर्डा’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता वत्स यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत त्यांनी आणि लेखक उत्कर्ष नैथानी यांनी ते सुधारित करण्याचे ठरवले. त्यानंतर त्याचे प्रमाणीकरण होऊन चित्रपट दि. 22 मार्च रोजी जगभर झळकला. जगभरातील प्रेक्षकांनी त्याचे जोरदार स्वागत केले. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार सर्वदूर पोहोचले गेले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांवरील अभ्यासक तज्ज्ञ म्हणून चित्रपटाचे परीक्षण केल्यानंतर निश्चितपणे आशावाद आहे की, हा चित्रपट केवळ भारतीय स्वातंत्र्यलढ्यापुरता मर्यादित नाही, तर देशासाठी लढणारा एक योद्धा कसा कसावा, याचा आदर्श संपूर्ण जगाला देणार आहे. त्यामुळेच तात्यांचे कार्य हे जगभर आदर्शवादी ठरते आणि त्याचा विचार ‘ऑस्कर’च्या निवडप्रक्रियेतील मंडळी निश्चित करतील.
अशोक शिंदे
9821374626
ashokrshinde@gmail.com