पितृपक्षातील अन्नदान : एक सामाजिक बांधिलकी

01 Oct 2024 22:23:21
samtol foundation initiative
 
 
आज सर्वपित्री अमावस्या. पितृपक्षातील शेवटचा दिवस. पितरांचे स्मरण करुन अन्नदान करण्याचा हा पंधरवडा. या कालावधीत गरजूंनाही अन्नदान करण्याकडे अनेकांचा कल असतो. पण, अन्नदान हे सर्वश्रेष्ठदान असल्यामुळे ते एका विशिष्ट कालावधीपुरते मर्यादित राहू नये आणि वर्षभरात आपापल्यापरिने यात समाजाचेही योगदान असावे. याच हेतूने ‘समतोल सेवा फाऊंडेशन’तर्फे अन्नदानाची मोहीम राबविली जाते आणि अन्नछत्राच्या माध्यमातून गरजूंची भूक भागवली जाते. त्याविषयी...

'समतोल सेवा फाऊंडेशन’ ही संस्था म्हणजे ‘समतोल फाऊंडेशन’चा एक भाग आहे. निराधार, निराश्रित मुलांना घेऊन ‘समतोल फाऊंडेशन’ गेली 20 वर्षे सातत्याने कार्यरत आहे. पण, अनेकांना ‘समतोल सेवा फाऊंडेशन’बाबत कदाचित कमी माहिती असावी. पण, हे लक्षात घ्यायला हवे की, मुलांबरोबर मोठ्यांच्यासुद्धा अनेक समस्या आहेत. त्यामध्ये मग जेवणाची समस्या असेल, आरोग्याची, सरकारी योजनांच्या माहिती असेल, असे अनेक विषय असू शकतात. यावरही काम करता येईल का, या उद्देशाने 2018 साली ‘समतोल सेवा फाऊंडेशन’ची स्थापना झाली.

प्रारंभी काही ठराविक पदाधिकार्‍यांना घेऊन संस्थेचे काम सुरु झाले. यातील मुख्य कार्यक्रम म्हणजे, अन्नदान सेवा होय. मा. आमदार व संस्थेचे सध्याचे अध्यक्ष संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये सुरु करण्यात आली. यामध्ये माझ्यासह अन्य सहकार्‍यांचाही समावेश आहे. एस. हरीहरन, संजय हे माझे सहकारी. त्यापैकी संजय यांचा प्रवास जास्त करून ग्रामीण भागाकडे जास्त झालेला आहे. आदिवासी पाड्यातील महिलावर्ग जेव्हा जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये वैद्यकीय सेवा घेण्यासाठी येतो, तेव्हा खूप त्रासलेला असतो. त्यातही प्रसुतीसाठी जास्त करून महिलावर्ग ठाणे शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालय गाठतात. मग तिथेच या महिलांना 15 ते 20 दिवस थांबणे गरजेचे होऊन जाते. अशा वेळी या महिलांच्या खाण्यापिण्याचा प्रश्न निर्माण होतो. या महिलांना आधार मिळावा, आपली पोटाची भूक तरी किमान भागावी, ही या महिलांची माफक अपेक्षा. हाच धागा ओळखून संजय यांनी हे अन्नदान सुरू केले. गेली सात वर्षे म्हणजेच 2 हजार, 555 दिवसांमध्ये 6 लाख, 38 हजार, 750 गरजूंनी अन्नदानाचा लाभ घेतला आहे. खरं तर आम्ही सातत्याने हे सर्व करत असताना, यासाठी लागणारा निधी फक्त वैयक्तिक देणगीतूनच जमा करत असतो आणि तेही वस्तू स्वरूपात, ज्यामध्ये डाळी, तांदूळ, तेल, कडधान्य अशा अन्नधान्याच्या सामानाचा समावेश आहे. 

हरीहरन सर यांनी काही वर्षे अन्नदानासाठी आर्थिक मदत केली. परंतु, सातत्याने लागणारा खर्च मोठ्या प्रमाणावर आहे. महिन्याला लाखभर रुपयेतरी खर्च होतो. पण, यामध्ये पाच हजारांपेक्षा जास्त गरजूंना अन्नदान केले जाते. अगदी शांतपणे, नम्रपणे हे अन्नदानाचे काम सुरू असते. शहरात या कामाची कुठेही बॅनरबाजी, पोस्टरबाजी अथवा कोणतीही जाहिरातबाजी केली जात नाही. अन्नछत्राचे वैशिष्ट्य असे की, इथे सर्व धर्मांतील गरजूंना अन्नदान केले जाते. तसेच घरगुती जेवणामध्ये जे पदार्थ असतात, तेच पदार्थ अन्नदान करतानाही ताटात वाढले जातात. शिवाय, अन्नछत्रातील जेवणासाठीही सर्व सामग्री ही चांगल्या दर्जाची वापरली जाते. म्हणूनच मी असे म्हणेन की, आम्ही खिचडी भंडारा करत नाही, तर अन्नदानच करतो.

आज ठाण्यातून अनेक दानशूर व्यक्ती अन्नछत्रासाठी पुढे येऊन आवर्जून मदत करत आहेत. कारण, शेवटी ही एक सामाजिक बांधिलकी आहे. यामध्ये कोणताही स्वार्थ नसून अगदी नि:स्वार्थ भावनेने ही सेवा अविरतपणे सुरु आहे.

सध्या पितृपक्ष सुरु आहे. हिंदू धर्मामध्ये पूर्वजांना श्राद्ध घालून आपण स्मरण करण्याचा हा पंधरवडा. या निमित्ताने अनेक लोक अन्नछत्राशी जोडले गेले. सेवा करताना हाच भाव महत्त्वाचा आहे.

यासंदर्भात आवर्जून एक प्रसंग नमूद करावासा वाटतो. एकदा तांदूळ संपले होते. त्यामुळे दुसर्‍या दिवशी अन्नदान होईल की नाही, याची चिंता होती. परंतु, म्हणतात ना सेवाकार्यामध्ये कधीही खंड पडत नाही, तेच खरे. श्री पुंडलीक भानुशाली यांनी या संधारभट कोणाकडून माहिती घेऊन तांदळाची तातडीने व्यवस्था केली. अन्नछत्र राबविताना असे अनेक प्रसंग अनेक वेळा अनुभवायला मिळाले आहेत.

अन्नदानामध्ये खरे समाधान हे ज्यावेळी आपण समोर असणार्‍या गरजूंना अन्नदान स्वतःच्या हाताने करतो, तेव्हा मिळते. पण, अनेकजण त्यासाठी ‘वेळ नाही’ असेही सांगतात. अशा सर्वांना म्हणूनच सांगावेसे वाटते की, सेवा करताना वेळ काढूनच सेवा करावी लागते, अशी आमची अपेक्षा आहे. वर्षातून एकदा येणारे पितृपक्ष हे यासाठीच असावे की काय, असे वाटते. शास्त्रीयदृष्ट्या निसर्गातील प्राणी, पक्षी, झाडे यांचे उगम व संवर्धन याचाही यांच्याशी संबंध जोडला आहे. झाडांमध्ये वड आणि पिंपळ यांची प्रत्यक्ष बीजनिर्मिती नाही, तर हे काम पक्षांमध्ये कावळेच करतात. म्हणून कावळ्यांना मानाचे स्थान पितृपक्षात दिलेले आहे.

कोरोनासारख्या महामारीमध्ये ऑक्सिजनचे महत्त्व प्रत्येकालाच कळले आहे. म्हणून पितृपक्षाला वर्षातील महत्त्वाचे स्थान दिले आहे. हीच सामाजिक बांधिलकी जर आपण जपली नाही, तर समाजही अनेक संकटांना सामोरे जाऊ शकतो.

आपण या सामाजिक बांधिलकीमध्ये सहभागी होऊन सहकार्य करावे व हे सेवाकार्य सातत्याने सुरू ठेवून समाजाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न करावा, अशी ‘समतोल सेवा फाऊंडेशन’ची विनंती आहे.
कारण, अन्नदान सर्वश्रेष्ठ दान!

विजय जाधव 
(लेखक ‘समतोल फाऊंडेशन’चे संस्थापक आहेत.)
Powered By Sangraha 9.0