परराष्ट्र मंत्री लवकरच श्रीलंका दौऱ्यावर

01 Oct 2024 17:45:39

jaishankar
 
 
नवी दिल्ली: भारताचा महत्त्वाचा मित्र देश असलेल्या श्रीलंकेत सत्ताबदल होऊन कम्युनिस्ट विचारसरणीचे सरकार स्थापन झाले आहे. या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री डॉ. सुब्रमण्यम जयशंकर श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहेत.

गेल्या आठवड्यात अनुरा कुमार दिसानायके यांची श्रीलंकेच्या नवीन राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर या आठवड्यात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर शेजारील श्रीलंकेला भेट देणार आहेत. नव्या राष्ट्रप्रमुखांनी पदभार स्वीकारल्यानंतर कोणत्याही मोठ्या भारतीय नेत्याचा हा पहिलाच श्रीलंका दौरा आहे. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि श्रीलंकेचे नवीन सरकार यांच्यातील बैठक महत्वाची ठरणार आहे.

श्रीलंकेच्या परराष्ट्र धोरणातील संभाव्य बदलाबाबत भारता सतर्क आहे. हिंदी महासागरातील भारताच्या या शेजारी देशात मार्क्सवादी विचारसरणीचे सरकार सत्तेवर आले आहे. त्यामुळे भारत – प्रशांत महासागर प्रदेशातील सद्यस्थिती पाहता श्रीलंकेत होणारे बदल महत्त्वाचे ठरणार आहेत. डॉ. जयशंकर हे चालू आठवड्यातच श्रीलंका दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी दिल्लीत दिसानायके यांची भेट घेतली. आपल्या भेटीदरम्यान दिसानायके यांनी तत्कालीन परराष्ट्र मंत्री तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांची भेट घेतली होती.

आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर डॉ. जयशंकर यांचेच वर्चस्व
सध्या विविध आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर हे वर्चस्व गाजवताना दिसत आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावरून त्यांनी नुकतेच भारत आणि पाकिस्तानमध्ये चर्चेसाठी केवळ पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा शिल्लक असल्याचे सुनावले आहे. त्याचप्रमाणे चीनलादेखील जशास तसे प्रत्युत्तर त्यांनी दिले आहे. त्याचप्रमाणे भारताचा रशिया आणि युक्रेनसोबतच्या संवादातही ते केंद्रस्थानी आहेत.



 
Powered By Sangraha 9.0