छंदोक्त वकील

01 Oct 2024 22:01:44
prakash labdhe


छंद जोपासण्याची हौस प्रत्येकालाच असते. अनेक जण विविध छंद जोपसतातही. जुन्या स्टॅम्प आणि तिकिटाच्या माध्यमातून देशाचे जुने वैभव दाखवणार्‍या अॅड.
 प्रकाश लब्धे यांच्याविषयी...

बर्‍याचदा व्यक्ती, घर चालवणे, कुटुंबाचा गाडा हाकणे, पैसे कमवणे या सगळ्यात स्वत:च्या आवडी-निवडी किंवा छंद विसरून जातात. आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात आपला जुना भारत देश कसा होता? आपल्याकडे काय अलौकिक ठेवा होता? हे आजच्या पिढीला माहिती असावे यासाठी अ‍ॅड. प्रकाश लब्धे आपला व्यवसाय संभाळत, हा छंद जोपासत आहेत. 14 जून 1951 साली जन्मलेल्या अ‍ॅड. प्रकाश लब्धे यांचे बालपण, मुंबईमधील दादर येथील हिंदमाता येथे गेले. त्यांनी शालेय शिक्षणाचे धडे शिरोडकर हायस्कूलमधून घेतले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणाकरिता त्यांनी रुपारेल महाविद्यालयात प्रवेश घेऊन, कला या शाखेत बी.ए. ही पदवी प्राप्त केली.
 
पुढे, कायद्याचे शिक्षण घ्यावे हा विचार करत त्यांनी, न्यु रुपारेल लॉ कॉलेजमधून एल.एल.बी.चे शिक्षण घेतले. पण, घरात आर्थिक चणचण असल्या कारणाने लब्धे सकाळी कायद्याचे शिक्षण घेत, तर दुपारी आर्यभट्ट शाळेत शिक्षक म्हणून काम करुन, आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावत होते. 1979 साली कायद्याची सनद घेतल्यानंतर, प्रकाश यांनी 1980 साली फौजदारी कोर्टापासून वकिली सुरु केली. तीन वर्ष वरिष्ठांच्या हाताखाली काम केल्यानंतर, 1983 साली लब्धे यांनी स्वतंत्ररित्या वकिलीचा व्यवसाय सुरु केला. जवळपास 40 वर्षांपेक्षा अधिक काळ ते या व्यवसायात कार्यरत आहेत.

प्रकाश लब्धे यांना पाच भावंड होती, आणि घरात केवळ वडीलच कमावते होते. आठ जणांचे कुटुंब चालवणार्‍या लब्धे यांचे वडील 800 रुपये महिना पगारावर,सेंट्रल रेल्वेत कारकून म्हणून काम करत होते. कालांतराने वडीलांना अर्धांगवायूचा झटका आला, आणि दुर्दैवाने त्यातच त्यांचे निधन झाले. घरातील कर्ता पुरुष कालवश झाल्यामुळे खचून न जाता लब्धे यांच्या आईने, त्यांच्या प्रत्येक मुलाला उच्चशिक्षण दिले. आजच्या घडीला लब्धे यांची पाचही भावंडे उच्चशिक्षित आहेत. आणि ज्या कठीण काळात आईने या मुलांना वाढवले त्या आईचा श्रावणबाळ असणार्‍या लब्धे यांनी, त्यांची शिकवण लक्षात ठेवत, आपला जीवन प्रवास सुरु ठेवला आहे.
 
शाळेपासूनच प्रकाश लब्धे यांना नानाविध छंद होते. त्यापैकी एक अत्यंत महत्वाचा छंद प्रकाश यांना होता, तो म्हणजे स्टॅम्प गोळा करण्याचा. लहानपणात परदेशातील स्टॅम्प इतक्यात तरी गोळा करु शकत नसल्याचे लक्षात आल्यानंतर, लब्धे यांनी आपल्याच देशातील जुने स्टॅम्प जमा करण्यास सुरुवात केली. अगदी भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून, म्हणजेच 1947 सालाचे त्यांच्याकडे ‘फर्स्ट डे कव्हर विथ कॅन्सल’चे स्टॅम्पही त्यांनी गोळा केले आहेत. म्हणजे काय? तर, ज्यादिवशी एखादा स्टॅम्प निघाला असेल त्यादिवशी त्या स्टॅम्पचे कव्हर वेगळे असते आणि कॅन्सलेशनचा शिक्का वेगळा असतो. जो नंतर कधीच मिळत नाही. तर असे अनेक जुने आणि दुर्मिळ स्टॅम्प लब्धे यांनी जपून ठेवले आहेत. याव्यतिरिक्त जुनी विविध नाणी देखील त्यांनी गोळा करुन, ती जतन केली आहेत. कारण, भारतीय जुन्या नाण्यांवर ज्ञानेश्वर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अशी वेगवेगळी चित्र होती, आणि आज ती फारशी दिसून येत नाहीत.
 
पण, नव्या पिढीला जुन्या भारताकडे किती अनमोल गोष्टी होत्या, हा दाखवण्याच्या अट्टाहासामुळे त्यांनी हा छंद जपून ठेवत, दुर्मिळ 98 नाणी गोळा केली आहेत. यासोबतच, भारत सरकारने फार पूर्वी म्हणजे 1965 साली, अ‍ॅल्युमिनियमची नाणी व्यापारात आणली होती. त्यापैकी 1, 2, 5 रुपयांची नाणी देखील त्यांनी गोळा केली आहेत. मागे म्हटल्याप्रमाणे, बालपणी परदेशातील नाणी किंवा इतर बाबी गोळा करणे शक्य नसल्याने, स्वत:च्या देशापासून लब्धे यांनी प्रवास सुरु करून, तो हट्टाने त्यांनी परदेशापर्यंत नेला. प्रकाश यांनी युरोपमधील 23 देशांची सफर केली आहे. आणि त्यांच्या चलनातील नोटा, नाणी यादेखील त्यांनी जपून ठेवल्या आहेत.
 
प्रकाश जरी पेशाने वकील असले, तरी त्यांना अनेक छंद आहेत. त्यापैकी नाणी, स्टॅम्प गोळा करण्याबद्दलची माहिती आपण जाणून घेतलीच. पण, त्यांना आणखी एक छंद आहे तो म्हणजे चित्रपट पाहण्याचा. रुपारेल महाविद्यालयात शिक्षण घेत असताना, सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे लब्धे देखील मित्रांसमवेत चित्रपट पाहायला जात असत. पण, केवळ चित्रपट पाहण्यापुरता त्यांचा छंद सीमित नव्हता. त्यावेळी काऊंटर फाईल न फाडलेली तिकीटे देखील त्यांनी, आजवर जमा करुन ठेवली आहेत. 1973 सालापासून ब्रॉडवे, हिंदमाता, चित्रा अशी 50 ते 60 चित्रपटांची काऊंटर फाईल्स तिकिटे लब्धे यांच्याकडे आहेत. लब्धे यांच्या वकिली व्यवसायाबद्दल सांगायचे झाल्यास, त्यांनी गौरीशंकर, तोडी मिल्स अशा अनेक कंपन्यांसाठी ‘लिगल एडव्हायजर’ म्हणून काम पाहिले आहे.
 
लब्धे यांच्या वडिलांच्या आकस्मिक मृत्यूनंतर, घराची जबाबदारी लिलया सांभाळणार्‍या आईचे कष्ट अमापच होते. अशा खडतर प्रवासातून आज वकिली पेशा जपत, आपला छंद जोपासणार्‍या अ‍ॅड प्रकाश लब्धे यांच्या पुढच्या प्रवासासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!

 
Powered By Sangraha 9.0