बेरूत: दक्षिण लेबनॉन मध्ये इस्रायली सैन्याने प्रवेश केला असून, हिजबुल्लाहला लक्ष्य करण्यासाठी नवीन आघाडी उघडली आहे. बेरूत या लेबनॉनच्या राजधनी मध्ये हवाई हल्ले केल्यानंतर, आता गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांना लक्ष्य करण्याचा निर्णय घेतला आहे.
सीमेलगतच्या गावांमध्ये यातील काही दहशतवादी लपलेले असून, उत्तरेकडील इस्रायली लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. यासाठी ही कारवाई करणे अत्यंत आवश्यक आहे अशी माहिती इस्रायलच्या सुरक्षा दलाने दिली. दक्षिण लेबनॉनचे रुपांतर आता युद्धभूमी मध्ये झाले असून, लेबनीज मधील नागरिकांनी तेथील लिटणी नदी ओलांडू नये अशी सूचना सुद्घा देण्याता आली आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलेंट यांनी म्हटले इस्रायली सैन्य ग्राउंड ऑपरेशन साठी सज्ज आहे. हिजबुल्लाला लक्ष्य करण्यासाठी वायु, जल, जमीन या तिन्ही ठिकाणी आम्ही तयार आहोत. हिजबुल्लाहच्या रॉकेटहल्ल्याने सुरु झालेल्या युद्धामुळे सीमेपल्याड असलेले अनेक नागरिक हालाखीचे जीवन जगत आहेत.त्या सगळ्यांना त्यांच्या घरी सुखरुप पोहोचवण्यासाठी इस्रायली सरकार कटिबद्ध आहे असे सरकारने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
हिजबुल्लाहची पीछेहाट
हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसराल्लाह याचा शुक्रवार दिनांक २८ सप्टेंबर रोजी इस्रायलने खात्मा केला. इस्रायलच्या सर्वनाशाची योजना आखणाऱ्या नसराल्लाहाच्या मृत्यू मुळे हिजबुल्लाची चांगलीच पीछेहाट झाल्याची माहिती मिळत आहे. नसराल्लाहच्या पाठोपाठ संघटनेचा वरिष्ठ कमांडर नाबिल कौक याचा सुद्धा शनिवारी इस्रायल कडून खात्मा करण्यात आला. दहशतवाद संपवण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी हा हल्ला गरजेचा होता असे मत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी व्यक्त केले.