नवी दिल्ली : भारतीय नौदलासाठी खरेदी करावयाच्या ‘राफेल’ लढाऊ विमानांचा सौदा निर्णायक टप्प्यात आला आहे. फ्रान्सच्या दसॉल्ट एव्हिएशनने भारतास अनुकूल किमतीचा प्रस्ताव दिल्याचे समजते.
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल फ्रान्स दौर्यासाठी रवाना झाले आहेत. त्यांचा दौरा दिनांक
३० सप्टेंबर ते दिनांक १ ऑक्टोबर असा आहे. या दौर्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलासाठीच्या ‘राफेल’ लढाऊ विमानांचा सौदा निर्णायक टप्प्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
एनएसए डोवाल यांच्यातर्फे आपल्या दौर्यात भारत-फ्रान्स धोरणात्मक संवादादरम्यान या करारावर चर्चा केली जाणार आहे. त्यापूर्वीच फ्रान्सतर्फे या प्रकल्पासाठी सर्वोत्तम आणि अंतिम किंमत भारतीय अधिकार्यांना देण्यात आली आहे. वाटाघाटीनंतर या प्रस्तावित करारातील किमतीही लक्षणीयरित्या कमी करण्यात आल्या आहेत. या करारासाठी भारतीय वायुसेनेसाठीच्या ३६ ‘राफेल’ लढाऊ विमानांचा करार आधार म्हणून वापरला जाणार आहे. भारत आणि फ्रान्स २६ ‘राफेल’ सागरी जेट खरेदी करण्यासाठी वाटाघाटी करत आहेत. दोन्ही बाजूंनी गेल्या आठवड्यात चर्चाही झाली होती. ही ‘राफेल’ लढाऊ विमाने ‘आयएनएस विक्रांत’ विमानवाहू युद्धनौका आणि नौदलाच्या विविध तळांवर तैनात केले जाणार आहे.