मुंबई : विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ घेतल्यानंतर अमित गोरखे यांनी २५ हून अधिक जिल्हे आणि १५० हून अधिक तालुक्यांतील नागरिकांशी 'बहुजन संवाद यात्रे'द्वारे संपर्क साधला असून, ठिकठिकाणी या यात्रेला भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
रविवार दिनांक ३० सप्टेंबर रोजी खान्देशातील जामनेर मतदारसंघांत गोरखे यांची सभा झाली. त्या सभेला मातंग समाजासह इतर समाजातील बांधवांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, लहुजी शक्ती सेनेचे विष्णू कसबे यांच्यासह इतर पदाधिकारी या सभेला उपस्थित होते. याप्रसंगी गिरीश महाजन म्हणाले, अनुसूचित जाती जमातीतील जनतेला महायुती सरकारने आजपर्यंत सर्वतोपरी मदत केली. यापुढेही हा ओघ कायम राहील. त्याचबरोबर जामनेरमध्ये लवकरच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणाही त्यांनी केली.
आमदार अमित गोरखे यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणुकीत पाडण्याचे काम काँग्रेसने केले होते. राहुल गांधी, महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष आणि पदाधिकारी हे आरक्षणविरोधी वारंवार बोलत आहेत. त्यांना जनता योग्य धडा शिकवेल, असेही ते म्हणाले. महायुती सरकारच्या काळात अनुसूचित जाती जमातीसाठी जाहीर झालेल्या महत्त्वाकांक्षी योजना आणि त्यांची माहिती त्यांनी याप्रसंगी त्यांनी दिली.