'सशक्त, सुदृढ आणि आत्मनिर्भर' हेच भारतीय हवाईदलाचे ध्येय – एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग

01 Oct 2024 16:44:30

marshal
 
 
नवी दिल्ली : एअर चीफ मार्शल ए.पी. सिंग यांनी मंगळवारी नवीन भारतीय हवाई दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे आपल्या आईचे आशीर्वाद घेतले. ‘सशक्त, सुदृढ आणि आत्मनिर्भर’ याच ध्येयावर हवाईदल वाटचाल करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

स्वदेशी ‘तेजस’ लढाऊ विमानांच्या विकासावर अधिक लक्ष केंद्रीत जाणार असल्याचे एअर चीफ मार्शल सिंग यांनी सांगितले. ते म्हणाले, भारतीय हवाईदलाने २०० हून अधिक विमानांची मागणी नोंदवली आहे. आपण तेजस लढाऊ विमानांच्या विकास कार्यक्रमाशी प्रारंभापासून जोडले गेल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे तेजस मार्क २ आणि प्रगत मध्यम लढाई विमानाच्या विकासावर अधिक लक्ष दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारताकडे लढाऊ विमाने विकसित करण्याची क्षमता आणि तंत्रज्ञान आहे, त्यामुळे या क्षेत्रात यशस्वी होण्याची भारताकडे क्षमता असल्याचेही हवाईदल प्रमुखांनी सांगितले आहे.

२७ ऑक्टोबर १९६४ रोजी जन्मलेल्या सिंग यांना डिसेंबर १९८४ मध्ये भारतीय हवाई दलाच्या फायटर पायलट स्ट्रीममध्ये नियुक्त करण्यात आले. त्यांच्या सुमारे ४० वर्षांच्या प्रदीर्घ आणि प्रतिष्ठित सेवेत त्यांनी विविध कमांड, स्टाफ, निर्देशात्मक आणि परदेशी नियुक्त्यांमध्ये काम केले आहे. नॅशनल डिफेन्स अकादमी, डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज आणि नॅशनल डिफेन्स कॉलेजचे ते माजी विद्यार्थी आहेत. ते फ्लाइंग इंस्ट्रक्टर आणि एक प्रायोगिक चाचणी पायलटदेखील आहेत. त्यांना विविध स्थिर आणि रोटरी विंग विमानांवर ५००० तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव आहे.



 
Powered By Sangraha 9.0