मुंबई : शरद पवारांकडे चांगली गुणवत्ता असलेले कार्यकर्ते असते तर त्यांना लोकांची घर फोडण्याची वेळ आली नसती, असा हल्लाबोल भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंनी सुप्रिया सुळेंवर केला आहे. सुप्रिया सुळेंनी भाजपवर केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले.
केशव उपाध्ये म्हणाले की, "सुप्रियाताईंसाठी त्यांच्या वडिलांनी एका राजकीय पक्षाची विरासत तयार केली आहे. ती कशी लोकाभिमूख करता येईल याचा विचार आणि काम करायच्या ऐवजी भाजपमधील गुणवत्तेवर का बोलतात? आता सुप्रियाताई एक काम करा आपल्याच वडिलांच्या राजकीय कारकिर्दीचा अभ्यास करा. त्यातून तुम्हाला समजेल की, आपल्या वडिलांना काँग्रेस पक्ष असो की, आताचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो चांगली गुणवत्ता असलेले कार्यकर्ते कधी मिळाले का?" असा सवाल त्यांनी केला.
हे वाचलंत का? - केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला विजयाचा कानमंत्र!
ते पुढे म्हणाले की, "जर त्यांच्याकडे चांगली गुणवत्ता असलेले कार्यकर्ते असते तर त्यांना लोकांची घर फोडण्याची वेळ आली नसती. ज्यांची राजकीय कारकिर्दच तोडा फोडा सत्ता मिळवा या ब्रिटीश धोरणावर उभी राहिली आहे, त्यांच्या लाडक्या लेकीने तरी इतर पक्षातील गुणवत्तेची काळजी करू नये," असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.