इस्रायलने बदला घेतला; ‘हमास’नंतर ‘हिजबुल्ला’

01 Oct 2024 21:47:17
Iran is preparing to launch a ballistic missile attack at Israel


आंतरराष्ट्रीय माध्यमे आणि तज्ज्ञांनी भीती व्यक्त केली होती की, इस्रायल आणि ‘हिजबुल्ला’मधील युद्ध अनेक महिने चालेल आणि इस्रायलला त्याची जबरदस्त किंमत चुकवावी लागेल. पण, इस्रायलने आपल्या वेगवान कारवायांनी ‘हिजबुल्ला’चे कंबरडे मोडून ठेवले आहे. ‘हिजबुल्ला’चा संपूर्ण पराभव करणे शक्य नसले, तरी लष्करीदृष्ट्या त्याला दहा वर्ष पाठी नेण्यात इस्रायलला यश आले आहे.
 
‘हमास’ने इस्रायलवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यांना या आठवड्याभरात एक वर्ष पूर्ण होत असताना इस्रायल आपल्या लक्ष्यपूर्तीच्या कधी नव्हे इतका जवळ आला आहे. पश्चिम आशियामध्ये जे काम अमेरिकेच्या नेतृत्त्वाखाली व्हायला हवे होते, ते काम इस्रायलने जवळपास एकहाती पूर्णत्वास आणले आहे. दि. ३१ जुलै २०२४ रोजी इराणची राजधानी तेहरान येथे ‘हमास’चा राजकीय प्रमुख इस्माईल हानियाची हत्या झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांमध्ये इस्रायलने लेबेनॉनची राजधानी बैरुतमध्ये ‘हिजबुल्ला’चा महासचिव शेख सैयद हसन नसराल्लाची हत्या केली आहे. बैरुतच्या दाहिया भागात असलेल्या ‘हिजबुल्ला’च्या नियंत्रण कक्षाच्या तळघरामध्ये नसराल्ला असल्याची माहिती मिळाल्यावर इस्रायलने अमेरिकेकडून मिळालेल्या बंकर बस्टर बॉम्बचा वापर करत तो संपूर्ण भाग उद्ध्वस्त झाला. या हल्ल्यामध्ये अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या. नसराल्ला गेली ३२ वर्ष ‘हिजबुल्ला’चे नेतृत्त्व करत होता. ‘हिजबुल्ला’ने केवळ इस्रायलच नव्हे, तर अमेरिका आणि फ्रान्सविरुद्धही मोठे दहशतवादी हल्ले केले असल्यामुळे जगातील २२ देशांनी ‘हिजबुल्ला’ला दहशतवादी संघटना घोषित केले होते. नसराल्लाला मारुन न थांबता इस्रायलचे सैन्य लेबेनॉनमध्ये शिरले आहे.

इस्रायलच्या उत्तरेला असलेल्या लेबेनॉन देशाच्या निर्मितीचा इतिहास रंजक आहे. पहिल्या महायुद्धानंतर ऑटोमन साम्राज्याच्या ताब्यात असलेल्या सीरियाचा ताबा फ्रान्सला मिळाला. दुसर्‍या महायुद्धानंतर फ्रान्सने या भागातून माघार घेण्यापूर्वी म्हणजे १९४३ साली या भागातील ख्रिस्ती लोकांसाठी लेबेनॉनची निर्मिती केली. लेबनॉनमधील ख्रिस्ती लोकांमध्ये मरोनाइट कॅथोलिक, ग्रीक ऑर्थोडॉक्स, ग्रीक कॅथोलिक, अर्मेनियन अपोस्टोलिक आणि इतर अनेक पंथ आहेत. आज सुमारे ७० लाख लोकसंख्या असलेल्या लेबेनॉनमध्ये एकेकाळी अल्पसंख्यांक असलेल्या मुस्लीम धर्मियांची आजची संख्या सुमारे ६५ टक्के आहे. ख्रिस्ती लोकांची संख्या ३० टक्के तर, ड्रुझ लोकांची संख्या सुमारे पाच टक्के आहे. लेबेनॉनमध्ये सत्तेतील महत्त्वाच्या पदांचे वाटप सुन्नी मुस्लीम, ख्रिस्ती आणि ड्रुझ यांच्यामध्ये करण्यात आले आहे. दक्षिण लेबेनॉन आणि बेका खोर्‍यामध्ये शिया लोकांची संख्या लक्षणीय असली, तरी त्यांना सत्तेमध्ये वाटा मिळाला नव्हता. इस्रायलच्या स्वातंत्र्ययुद्धाच्या वेळेस अनेक पॅलेस्टिनी अरब लोकांनी दक्षिण लेबेनॉनमध्ये शरणार्थी म्हणून आसरा घेतला होता. कालांतराने याच भागात यासर अराफतनी वास्तव्य करुन आपल्या ‘पॅलेस्टिनी मुक्ती संघटने’च्या माध्यमातून इस्रायलविरुद्ध दहशतवादी हल्ले करण्यास सुरुवात केली. १९७५ ते १९९० या काळात लेबेनॉन यादवी युद्धामध्ये होरपळले. पॅलेस्टिनी दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी इस्रायलने १९८२ साली दक्षिण लेबेनॉनमध्ये सैन्य घुसवले. १९७९ साली शियाबहुल इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली. अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांनी ही क्रांती जगभर, खासकरुन शिया पंथियांची लोकसंख्या लक्षणीय असलेल्या देशांमध्ये पसरवण्याचा निर्धार केला.

१९८२ साली इस्रायलविरुद्ध लढणे आणि शिया समुदायाला न्याय मिळवून देण्यासाठी ‘हिजबुल्ला’ची स्थापना करण्यात आली. ‘हिजबुल्ला’ या शब्दाचा अर्थ ‘देवाचा पक्ष’ असा होतो. आत्मघाती हल्ले हे ‘हिजबुल्ला’चे वैशिष्ट्य ठरले. पुढील काही वर्षांमध्ये ‘हिजबुल्ला’ने बैरुतमधील अमेरिकन दूतावास, फ्रेंच आणि अमेरिकन सैन्यतळ आणि अर्जेंटिनामधील इस्रायली दूतावासासह अनेक मोठे हल्ले घडवून आणले. १९९२ सालापासून ‘हिजबुल्ला’ लेबेनॉनच्या सरकारमध्ये सहभागी झाला. एकेकाळी अल्पसंख्याक असलेल्या शियांनी आज लोकसंख्येच्या बाबतीत सुन्नी आणि ख्रिस्ती लोकांना मागे टाकले आहे. ‘हिजबुल्ला’च्या आत्मघाती हल्यांना कंटाळून इस्रायलने २००० साली लेबेनॉनमधून माघार घेतली. त्यावेळीच संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत ‘हिजबुल्ला’च्या निशस्त्रीकरणाचा ठराव संमत करण्यात आला. पण, ‘हिजबुल्ला’ने स्वतःच्या लष्करी सामर्थ्यात सातत्याने वाढ केली.

‘हिजबुल्ला’ने २००६ साली इस्रायलची सीमा ओलांडून त्यांच्या दोन सैनिकांना ताब्यात घेतले. तसेच, इस्रायलविरुद्ध रॉकेट हल्ले सुरु केले. त्यामुळे दुसर्‍या इस्रायल लेबेनॉन युद्धाला तोंड फुटले. ३४ दिवस चाललेल्या या युद्धात इस्रायलने दक्षिण लेबेनॉन उद्ध्वस्त केला असला, तरी ‘हिजबुल्ला’चे रॉकेट हल्ले थांबवण्यात त्याला अपयश आले. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने घडवून आणलेल्या शस्त्रसंधीमध्ये पुन्हा ‘हिजबुल्ला’च्या निशस्त्रीकरणावर भर दिला असला, तरी प्रत्यक्षामध्ये त्याच्या विपरित घडले. २००६ साली ‘हिजबुल्ला’कडे सुमारे दहा हजार रॉकेट आणि क्षेपणास्त्रे होती. आज त्यांच्या संख्या सुमारे दीड लाख असून ती इस्रायलच्या कोणत्याही भागावर हल्ला करु शकतात. २००६ सालापासून २०२३ पर्यंत ‘हिजबुल्ला’ने इस्रायलविरुद्ध मोठा हल्ला केला नसला, तरी वेळोवेळी इराणच्या सांगण्यावरुन इराक आणि सीरियामध्ये आपले सैन्य पाठवले. सीरियामध्ये बशर अल असदची राजवट टिकवण्यात ‘हिजबुल्ला’चा मोलाचा वाटा आहे. गाझा पट्टीतील ‘हमास’ तसेच, येमेनमधील हुती बंडखोरांच्या प्रशिक्षणातही ‘हिजबुल्ला’ने महत्त्वाची भूमिका बजावली. गेल्या ४० वर्षांमध्ये ‘हिजबुल्ला’चा दक्षिण लेबेनॉनमधील ‘सशस्त्र संघटना’ ते एक ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना’ हा प्रवास थक्क करणारा आहे. त्यासोबतच ‘हिजबुल्ला’ने रुग्णालये, शाळा, महाविद्यालये आणि अन्य सामाजिक संस्थांच्या माध्यमातून लेबेनॉनच्या समाजात स्वतःचे स्थान निर्माण केले. गेल्या दहा वर्षांमध्ये सिरिया आणि अन्य देशांमधील कारवायांमुळे लेबनीज जनतेमध्ये हिजबुल्लाविरुद्ध नाराजी वाढू लागली असली, तरी त्यांची दहशत एवढी मोठी आहे की, लेबनॉनमधील सरकार हिजबुल्लाच्या हातातील कठपुतळी असल्यासारखे आहे.

हसन नसरल्ला गेली ३२ वर्ष ‘हिजबुल्ला’चे नेतृत्त्व करत होता. आजवर इस्रायलची पाळत असूनही भूमिगत राहून काम करण्यात तो यशस्वी झाला. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी ‘हमास’ने इस्रायलविरुद्ध केलेल्या दहशतवादी हल्यानंतर इस्रायलने ‘हमास’ला संपवण्याचा निर्धार केला आहे. ‘हमास’ नामशेष होऊ नये, यासाठी ‘हिजबुल्ला’ने लेबेनॉनमधून दुसरी आघाडी उघडावी यासाठी इराण सातत्याने प्रयत्न करत होता. असे केल्यास ‘हिजबुल्ला’लाही संपवण्याची धमकी इस्रायलने दिली होती. ‘हिजबुल्ला’ इस्रायलच्या सीमा भागात सातत्याने छोटे आणि मध्यम हल्ले करत असल्यामुळे एक लाखांहून अधिक इस्रायली लोकांना गेले वर्षभर आपल्याच देशात शरण छावण्यांमध्ये राहावे लागत होते. असे असले तरी, ‘हिजबुल्ला’ने पूर्ण ताकदीने या युद्धामध्ये उतरणे टाळले होते. पण, इराणची राजधानी तेहरानमध्ये ‘हमास’चा राजकीय प्रमुख इस्माईल हानियाची हत्या झाल्यानंतर आणि इराणने इस्रायलविरुद्ध शेकडो रॉकेट, क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या साहाय्याने केलेला हल्ला इस्रायल, अमेरिका आणि आखाती अरब राष्ट्रांनी निष्फळ ठरवल्यानंतर ‘हिजबुल्ला’ला आपल्या हल्ल्यांची तीव्रता वाढवण्याशिवाय गत्यंतर उरले नाही. दि. २७ जुलै रोजी ‘हिजबुल्ला’ने गोलान टेकड्यांवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात इस्रायलमधील ड्रुझ समाजातील १२ मुले मारली गेली. ३० जुलै रोजी इस्रायलने ‘हिजबुल्ला’च्या फुआद शुकरची हत्या केली.
 
अमेरिका १९८२ सालापासून त्याचा शोध घेत होती. त्याच्याबद्दल माहिती देणार्‍याला ५० लाख डॉलर्सचे इनाम ठेवण्यात आले होते. दोन आठवड्यांपूर्वी ‘हिजबुल्ला’ने आपल्या महत्त्वाच्या अधिकार्‍यांना दिलेल्या पेजर आणि वॉकीटॉकीमध्ये अचानक स्फोट झाले. त्यात ४२ लोक मारले गेले आणि तीन हजारांहून अधिक जखमी झाले. हेरगिरीमध्ये इस्रायल इतरांपेक्षा चार पावले पुढे असल्यामुळे त्यांच्याकडून आपल्या मोबाईलद्वारे आपल्यावर पाळत ठेवली जात आहे, असे जेव्हा ‘हिजबुल्ला’च्या लक्षात आले तेव्हा, त्यांनी आपल्या लोकांना मोबाईलचा वापर बंद करायला भाग पाडले. कधी, कुठे आणि कसा हल्ला करायचा याचे नियोजन करण्यासाठी त्यांना तैवानच्या एका कंपनीकडून पेजर मागवण्यात आले. हंगेरीमधून त्यांची आयात करण्यात आली. या प्रक्रियेदरम्यान त्या पेजरमध्ये अल्प प्रमाणात स्फोटके दडवण्यात आली. एकाच वेळेस त्यांचा स्फोट करण्यात आल्याने ‘हिजबुल्ला’च्या मनात प्रचंड दहशत निर्माण झाली. आता इस्रायलने दक्षिण लेबेनॉनमध्ये सैन्य घुसवले असून, तेथील ‘हिजबुल्ला’चे तळ उद्ध्वस्त करणे हे त्यांचे लक्ष्य आहे. हे एक मर्यादित युद्ध असल्याचे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूंनी घोषित केले आहे.

आंतरराष्ट्रीय माध्यमे आणि तज्ज्ञांनी भीती व्यक्त केली होती की, इस्रायल आणि ‘हिजबुल्ला’मधील युद्ध अनेक महिने चालेल आणि इस्रायलला त्याची जबरदस्त किंमत चुकवावी लागेल. पण, इस्रायलने आपल्या वेगवान कारवायांनी ‘हिजबुल्ला’चे कंबरडे मोडून ठेवले आहे. ‘हिजबुल्ला’चा संपूर्ण पराभव करणे शक्य नसले, तरी लष्करीदृष्ट्या त्याला दहा वर्ष पाठी नेण्यात इस्रायलला यश आले आहे. आता ‘हिजबुल्ला’चा पालनकर्ता इराण या युद्धात स्वतःला झोकून देतो का, सन्मानजनक माघार घेण्याचा प्रयत्न करतो, त्यावर पश्चिम आशियातील युद्ध आणि स्थैर्याचे भवितव्य अवलंबून आहे.



Powered By Sangraha 9.0