भारतीय भांडवली बाजाराचा ‘बुल’ सध्या उधळलेला असून, महिन्यातील काही दिवस सोडले, तर बर्याच अंशी बाजार वधारलेल्या स्थितीतच बघायला मिळतो. रालोआ सरकारच्या गेल्या दोन कालखंडात भांडवली बाजाराने गुंतवणूकदारांना बक्कळ नफा मिळवून दिला आहे. आता तिसर्या कार्यकाळात देखील बाजाराने त्याची विक्रमी घोडदौड कायम राखली आहे. कोणत्याही जागतिक घडामोडीचा फारसा दीर्घकालीन विपरित परिणाम भारतीय भांडवली बाजारावर होत नाही. त्यामुळेच परदेशी गुंतवणूकदारांना भारताचा भांडवली बाजार सातत्याने खुणावत असतो. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात देखील असेच चित्र बाजारात बघायला मिळाले. अमेरिकेच्या ‘फेडरल रिझर्व्ह’ने घेतलेला दर कपातीचा निर्णय आणि भारतीय बाजाराला देशांर्गत गुंतवणुकीमुळे आलेले तेजीचे दिवस यामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय भांडवली बाजारात विक्रमी गुंतवणूक केली. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी केलेली गुंतवणूक ही अंदाजे २३ हजार, ६५९ कोटी रुपयांची होती, तर फक्त सप्टेंबर महिन्यामध्ये झालेली परदेशी गुंतवणूक ही ५७ हजार, ३५९ कोटींची होती. भांडवली बाजार हे अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा निर्देशक. अर्थव्यवस्थेचे घटक असणार्या अनेक उद्योगधंद्यांच्या प्रगतीचे थेट प्रतिबिंब आपल्याला बाजारात बघायला मिळते. जेव्हा जागतिक अर्थव्यवस्था हलाखीच्या अवस्थेत असताना, परदेशी गुंतवणूकदार भारतीय भांडवली बाजाराला गुंतवणुकीसाठी पसंती दर्शवतात, याचाच अर्थ भारताची अर्थव्यवस्था सशक्त असून, त्यातून दीर्घकालीन नफा मिळण्याची शाश्वती परदेशी गुंतवणूकदारांना वाटत असते. मोदी सरकारने अर्थव्यवस्थेच्या सुस्थितीसाठी उचलेली पाऊले, केलेल्या उपाययोजना, या सगळ्यांवर दाखवलेला तो विश्वास असतो. भांडवली बाजाराच्या पारदर्शकता आणि प्रामाणिकपणाचे ते द्योतकही असते. मात्र, दुर्दैवाने आजमितीला जेव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेवर परदेशी गुंतवणूकदार विश्वास ठेवत आहेच, त्याचवेळी नवनवीन आरोप करत, देशातील विरोधीपक्ष भांडवली बाजार कोसळावा यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, त्यांनी कितीही प्रयत्न केले, तरी बाजार उसळी घेतच आहे, कारण बाजारातील सर्वात जास्त गुंतवणूकदार हा भारतीयच आहे आणि त्याचा त्याने निवडलेल्या सरकारवर विश्वास आहे.
स्वप्न
देशाचा भांडवली बाजार दररोज निरनिराळे विक्रम स्थापित करत असताना, देशातील सामान्य जनता देखील भांडवली बाजाराकडे गुंतवणुकीचा एक सक्षम पर्याय म्हणून पाहताना दिसते. राष्ट्रीय शेअर बाजाराने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि पश्चिम बंगालसारखी राज्ये मोठ्या प्रमाणात भांडवली बाजारामध्ये सक्रियपणे व्यवहार करत आहेत. भांडवली बाजारामध्ये पूर्वीपासूनच महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यातील गुंतवणूकदारांची संख्या अधिक होती. मात्र, या स्पर्धांमध्ये आता मोठ्याप्रमाणात देशातील उत्तर प्रदेश, राजस्थान आणि पश्चिम बंगाल या राज्यातील जनता देखील गुंतवणूक करत आहे. हे चित्र नक्कीच आनंददायी असेच आहे. आज देशात सर्वाधिक गुंतवणूकदार हे महाराष्ट्रात असून, त्यांची संख्या १.७ कोटी इतकी आहे. त्या खालोखाल उत्तर प्रदेश हे राज्य असून, उत्तर प्रदेशातील गुंतवणूकदारांची संख्या १.१ कोटींपर्यंत पोहोचली आहे. गुजरात ८८.५ लाख गुंतवणूकदारांसह तिसर्या स्थानावर असून, पश्चिम बंगालमधील गुंतवणूकदार ५९ लाख आणि राजस्थानमधील गुंतवणूकदारांची संख्या ५७.८ लाख एवढी झाली आहे. एकेकाळी ‘बिमारु’ राज्य म्हणून हिणवल्या जाणार्या उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात विकासकामे होताना दिसत आहेत. मोबाईलचा वापर, इंटरनेट कनेक्टिव्हीटी यांसह पायाभूत सोयीसुविधांचे जाळेही विणले गेले. परिणामी, रोजगारनिर्मितीला चालना मिळाली. तसेच, आज वापरकर्त्यांच्या दृष्टीने सुलभ असे अॅप्स आता बाजारात आले असून, त्यामुळे बाजारामध्ये गुंतवणूक करणे सहज शक्य झाले आहे. जोडीला सरकारी स्थिर धोरणांमुळे बाजारामधला सकारात्मक कल गुंतवणूकदारांना खुणावत आहेत. गरिबी ज्या राज्यातून जात नाही, अशा राज्यातील लोक आता भांडवली बाजारात गुंतवणूक करत असतील, तर याचा दुसरा अर्थ तिथे गुंतवणूक करण्याइतका पैसा त्यांच्याकडे उपलब्ध आहे. या भारतीय गुंतवणूकदारांमुळेच भारतीय भांडवली बाजारही आत्मनिर्भरतेकडे झुकलेला दिसून येतो. हे चित्र एकप्रकारे अर्थव्यवस्थेला आत्मनिर्भर करण्याच्या आपल्या स्वप्नपूर्तीचे द्योतक असल्याचेच म्हणता येईल.
कौस्तुभ वीरकर