रत्नागिरीत उद्यापासून सागरी जैवविविधतेची भरणार शाळा

09 Jan 2024 15:25:51



Sagar Mahotsav



मुंबई (विशेष प्रतिनिधी):
रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये उद्या गुरूवार दि. ११ जानेवारी पासून सागर महोत्सवाला सुरूवात होणार आहे. आसमंत बेनेवोलंस फाऊंडेशन या संस्थेने हा उपक्रम गेल्या वर्षीपासून सुरू केला असून त्याचे यंदा दुसरे वर्ष आहे. दि. ११ ते १४ जानेवारी या दरम्यान हा महोत्सव भरणार असून त्यामध्ये तज्ञांची मार्गदर्शक सत्रे, मुंबई तरुण भारत (महाएमटीबी) निर्मित शॉर्ट फिल्म्स दाखविण्यात येणार असून सागर प्रेमींसाठी ही पर्वणीच ठरणार आहे.

गुरूवार दि. ११ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता या महोत्सवाचे उद्घाटन होणार असून त्यानंतर भारतीय नौसेनेचे निवृत्त कमोडोर डॉ. श्रीरंग जोगळेकर, नॅश्नल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी संस्थेचे डॉ. सिंघ यांची मार्गदर्शनपर सत्रे होणार आहेत. त्यानंतर श्रीनिवास पेंडसे यांचे महासागराचे अध्यात्मिक दर्शन या विषयावर प्रवचन आयोजित केले असून डॉ. श्रीकांत कार्लेकर, कमांडर व्ही.एम. आपटे आणि धनुषा कावलकर यांचीही सत्रे या दिवशी होणार आहेत. महाएमटीबी आणि द हॅबिटॅट्स ट्रस्ट यांच्या समन्वयातुन निर्माण केलेल्या स्पिशीज अँड हॅबिटॅट्स प्रोग्रॅम अंतर्गत 'दाभोळ खाडी' या नव्या चित्रफितीचे विशेष प्रक्षेपण केले जाणार आहे.

शुक्रवार दि. १२ जानेवारी रोजी मांडवी आणि भाट्ये किनाऱ्यावर प्रजीप पाताडे आणि डॉ. अमृता भावे या तज्ञांसमवेत अभ्यास फेरी करता येणार आहे. समुद्र किनाऱ्यावर असलेली जैवविविधता आणि इतर गोष्टींचा अनुभव उपस्थितांना घेता येणार आहे. याबरोबरच, डॉ. विजय मुळ्ये, डॉ. अनंत पांडे, डॉ. प्रशांत अंडगे आणि सायली नेरुरकर यांची सत्रे आणि चित्रफिती दाखविण्यात येणार आहेत. तिसऱ्या दिवशी म्हणजेच, शनिवार दि. १३ जानेवारी रोजी डॉ. समीर डामरे, डॉ, नाणजकर, डॉ. विनोद धारगळकर यांच्या अभ्यासपुर्ण सत्रांबरोबरच या दिवशी सी बोट मधून ५० मीटर खोल समुद्रात असणारी दृष्य लाईव्ह पाहता येणार आहेत. रविवार दि. १४ जानेवारी रोजी उपस्थितांना बोटीतुन कांदळवन सफर करता येणार असून याबरोबरच या सागर महोत्सवाचा समारोप होईल.

"आसमंत आयोजित यंदाच्या द्वीतीय सागर महोत्सवाला राज्यभरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अनेक महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांसाठी या कार्यक्रमाची उपस्थिती सक्तीची केली असून त्यामध्ये पुण्या-मुंबईच्या महाविद्यालयांचा ही समावेश आहे. या उत्तम प्रतिसादामुळे समुद्राशी निगडीत वर्षभर विविध उपक्रम करण्याचंच प्रोत्साहन मिळालं आहे."

- नितीन कर्मारकर
संचालक, आसमंत बेनेवोलंस फाऊंडेशन




Powered By Sangraha 9.0