सुदर्शन कॅन्सर हॉस्पिटलची वाटचाल

09 Jan 2024 21:44:46
Sudarshan Cancer Hospital

कर्करोग हा तसा धडकी भरविणारा आणि जीवघेणा आजार. या आजाराच्या भीतीनेच भल्याभल्यांची गाळण होते काही जण तर या आजारावर असलेल्या उपचार पद्धतीची धास्ती घेऊन तो आजार सांभाळतात, समाजात या आजाराबाबत असलेली ही भीती आणि त्या रूग्णांना योग्य मार्गदर्शनासह उपचार देण्याचे पवित्र कार्य करणारी पुण्यातील संस्था म्हणजे सुदर्शन कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च फाउंडेशन.

'स्वमे स्वल्प समाजाय सर्वस्व’ हे ब्रीद अंगीकारून या संस्थेने हे ईश्वरी कार्य करताना अनेक संकल्पना आणि लोकहितास्तव उपायांची अंमलबजावणी करण्याचा निर्धार केला आहे. या संस्थेत प्रसिद्ध ओंकॉलॉजिस्ट डॉ. अनंतभूषण रानडे यांच्या सल्ल्यानुसार निष्ठेने आणि एका उदात्त सेवाभावाने हे कार्य केले जात आहे. यासाठी संचालक धनंजय जोशी, एस.आर.कुलकर्णी, अरूण कुलकर्णी, सुहास जोशी आणि योगेश देशपांडे हे सर्वजण पुढाकार घेऊन अनेकांच्या वेदनांना शमविण्याचे कार्य करीत आहेत आणि त्यांना आनंदी जीवन जगण्यास प्रेरणा देत आहेत. इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासारखे पुण्य नाही, यासाठी जी तळमळ आणि जाणीव असावी लागते ती या सर्वांमध्ये आहे म्हणूनच सत्कार्याचा डोलारा सांभाळताना समाधानाची शिदोरी जपत भविष्यात अनेक संकल्पनांची प्रेरणा घेऊन हे सर्व जण पुढे जात आहेत.
 
अर्थात हे सेवाकार्याचं बळ येण्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी कारणीभूत असून ‘व्यक्ती निर्माण आणि सेवा’ या तत्वाने या सर्वांनी या सेवाकार्याची प्रतिज्ञा घेतली आहे, विशेष म्हणजे त्यांच्या या प्रयत्नांना यश येत असून या वेदनादायी आजारातून बरा झालेल्या रुग्णांच्या चेहर्‍यावरील समाधान बघून त्यांना त्यांच्या या कार्याची खरी पावती मिळत आहे. याबाबत योगेश देशपांडे यांनी माहिती दिली. सेवाकार्यची सुरुवात काय करता येईल ही मनाची चुळबुळ स्वस्थ बसू देत नव्हती. संघ शाखेचे काम करताना अनेक गोष्टी लक्षात आल्यात, त्यामुळे वेगळे काहीतरी सेवा कार्य करायचे हे ठरविले. हे कार्य करताना वस्त्यांमधील घरातील लोक ज्या आजारांचा सामना करताहेत त्यात कर्करोगासारखा आजार या सर्वांसाठी अत्यंत वेदनादायी आणि उपचार मिळविण्याच्या दृष्टीनेदेखील त्रासदायक होता हे लक्षात आले. त्यामुळे कर्करोगाचा सामाना करणार्‍या लोकांसाठी कार्य करायचे हा निर्धार पक्का झाला आणि कार्याचा श्रीगणेशा झाला.


हे जे सेवा कार्य आहे ते तीन श्रेणींमध्ये करण्याचे निश्चित केले यात गरज आहे त्याला मदत, ज्याला मदत केली तो स्वावलंबी करणे आणि ज्याने सेवा घेतली त्यानेदेखील सेवा द्यावी ही अपेक्षा आणि उद्देश ठेवून कार्याला सुरुवात केल्याची माहिती योगेश देशपांडे यांनी दिली. रा. स्व. संघाचे पाचवे सरसंघचालक कृपाहल्ली सीतारामय्या सुदर्शन यांच्या नावावरून ‘सुदर्शन’ हे नाव संस्थेला देऊन आपण संघ विचारांतून प्रेरित होऊन “सुदर्शन कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च फाऊंडेशन’ सुरू करण्याच्या ईश्वरीकार्यास सुरुवात केल्याचे स्पष्ट केले.


-अतुल तांदळीकर



Powered By Sangraha 9.0