मथुरा श्रीकृष्णजन्मभूमीच्या पक्षकाराला शिरच्छेद करण्याची धमकी
08 Jan 2024 17:06:55
नवी दिल्ली : मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमीच्या पक्षकारांपैकी एक असलेले आशुतोष पांडे यांना पाकीस्तानातून शिरच्छेद करण्याची धमकी देण्यात आली आहे. आशुतोष पांडे यांनी असा आरोप केला आहे की, त्यांचा फेसबुक आयडी हॅक करण्यात आला आहे व त्यांना पाकीस्तानकडून धमक्याही देण्यात येत आहेत.
आशुतोष पांडे यांनी भारतात बंदी असलेल्या पीएफआय या दहशतवादी संघटनेकडून आपल्याला अनेकदा खुनाच्या धमक्या मिळाल्याच सांगितले आहे. आणि आता मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीची बाजू घेण्यावरुनही त्यांना पाकीस्तानातील अनेक तरुणांकडून धमकी देण्यात येत आहे. याप्रकरणी त्यांनी मथुरा पोलिसात तक्रारही दाखल केली आहे.
आशुतोष पांडे यांच्या आधी सत्यम पंडित नावाच्या एका व्यक्तीने असाच दावा केला होता. सत्यमने सांगितले होते की, श्रीकृष्णजन्मभूमीवर आपला हक्क मिळवण्यासाठी तो लढा देत आहे, त्यामुळे त्याला ‘शिरच्छेद’ करण्याची धमकी देण्यात आली आहे. सत्यम पंडित यांनी पत्र दाखवून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) कडून आपल्याला धमकी दिल्याचा दावा केला होता.