"मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय", मुख्यमंत्र्यांसमोर प्रशांत दामले यांचे वक्तव्य

07 Jan 2024 15:21:32
100th Akhil Bharatiya marathi Natya Sammelan

पुणे :
१०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा पुणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी, "मला अचानक मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटते", असे वक्तव्य केले. या कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे तहहयात विश्वस्त शरद पवार, उद्योग मंत्री उदय सामंत आणि मान्यवर उपस्थित होते.

प्रशांत दामले म्हणाले,"नाट्यसंमेलन ही कलाकारांसाठी दिवाळी आहे. प्रत्येक कलाकार हा मनोरंजनसृष्टीतील विविध माध्यमावर काम करत असतो पण नाट्यसंमेलनानिमित्ताने विचारांचे आदान-प्रदान होते. आम्ही कलाकार मंडळी तीन तास अभिनय करतो. पण राजकीय मंडळी ३६५ दिवस आणि २४ तास अभिनय करत असतात. मात्र मला या नाट्य संमेलनाचे पहिल्यांदाच अध्यक्षपद मिळाल्याने मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटत आहे".

प्रशांत दामले पुढे म्हणाले की,"शासनाने दिलेला निधी योग्यरीत्या आपण वापरायला हवा. शासनाने आम्हाला योग्य त्या उपाययोजना पुरवाव्यात. - रसिक प्रेक्षकांनी पुढच्या पिढीत नाटकाचा गोडवा निर्माण करावा. मुख्यमंत्री साहेब नाट्यगृह बांधणे आणि ती सांभाळणे फार अवघड आहे. अलीकडेच सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की,"आम्ही सत्तर नाट्यगृह बांधणार आहोत", हे ऐकून कलाकार मंडळी आनंदी झालो आहोत. पण आहेत ती नाट्यगृहे योग्यरीत्या सुस्थितीत ठेवणे देखील गरजेचे आहे. नाट्यगृहाचे दर, लाईट बिल, सुविधांची वानवा आहे. त्यात सरकारने लक्ष घालावे.

१०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची विशेष बाब म्हणजे पाच महिने हे संमेलन सुरू राहणार असून महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये अनेक कार्यक्रम, स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या संमेलनाची सांगता मे महिन्यात रत्नागिरी येथे होणार आहे.
Powered By Sangraha 9.0