अयोध्येत श्रीराम मंदिरासह शरयू घाटाचा अहिल्यादेवींकडून जीर्णोद्धार

    06-Jan-2024
Total Views |
Ahilyadevi Holkar and Shri ram mandir Sharayu Ghat

अयोध्या आणि मथुरा यांना भारताची सांस्कृतिक राजधानी म्हटले जाते. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे अयोध्या हे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू राम यांचे जन्मस्थान आणि मथुरा हे योगेश्वर कृष्णाचे जन्मस्थान. ही दोन्ही ठिकाणे नंतर मुस्लीम आक्रमकांचे लक्ष्य बनली.

अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवन्तिकापुरी, द्वारवती ज्ञेया: सप्तैता मोक्ष दायिका॥
अर्थात, हिंदू धर्मात मोक्षप्राप्तीला खूप महत्त्व असून हिंदू पुराणानुसार, सप्तपुरीतून मानवाला मोक्ष प्राप्त होतो. मोक्ष म्हणजे मुक्ती. जी मनुष्याला जीवन आणि मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्त करते. धार्मिक दृष्टीने मोक्षप्राप्तीसाठी लोक तीर्थयात्रा करतात. त्यामध्ये बारा ज्योतिर्लिंग, चार धाम आणि सप्तपुरीचा समावेश आहे. ही सप्तपुरी म्हणजेच अयोध्या, मथुरा, माया (हरिद्वार), काशी, (वाराणसी)कांची,(कांचीपुरम, तामिळनाडू)अवंतिका (उज्जैन)आणि द्वारका (गुजरात).

अयोध्या हे संयुक्त प्रांतामध्ये सप्तपुरीपैकी एक महत्त्वाचे स्थळ मानले जाते. या अयोध्येत भगवान श्रीरामाचा जन्म झालेला असून, हिंदू धर्मियांसाठी अयोध्या आणि तेथील राम मंदिर जन्मभूमी अतिशय पवित्र आहे. वेगवेगळ्या राजवटीत अनेक शासकांनी अयोध्येत दानधर्म करून मंदिरे निर्माण केली, याप्रमाणे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांनी भगवान श्रीरामाचे मंदिर निर्माण करून तेथे त्रेताराम मंदिर, श्री भैरव मंदिर, श्री नागेश्वर मंदिर, श्री शरयू घाट धर्मशाळा, अन्नछत्र तसेच होळकर वाडा निर्माण केला. अयोध्या येथील अन्नछत्रासाठी दोन हजार रुपयांची तरतूद करण्यात आली होती, अशा नोंदी होळकरशाहीच्या इतिहासात सापडतात.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी देशभरातील देवस्थानांचा जीर्णोद्धार करून, तेथे नियमितपणे पूजा-अर्चा व्हावी, उत्सवांचे आयोजन व्हावे, तसेच तीर्थयात्रा करणारे यात्रेकरू, पर्यटक, व्यापारी, ब्राह्मण पूजारी, गुरव, सेवेकरी, कायस्थ यांचे कायम वास्तव्य ठीकठिकाणी करण्यासाठी तेथील शासकांना पत्र पाठवली होती. अहिल्यादेवींच्या या धोरणामुळे बारा ज्योतिर्लिंग, चार धाम, सप्तपुरीसह ठीकठिकाणच्या देवीदेवतांच्या मंदिराचे जीर्णोद्धार तसेच नवीन बांधकाम मोठ्या जोमाने सुरू झाले. हिंदू धर्माची क्षतिग्रस्त झालेले, आस्थेचे केंद्र कित्येक वर्षापासून पडीक पडले होते. परकीय आक्रमणकार्‍यांकडून ते बाटवले गेल्याने, तेथील पूजा-अर्चा बंद झाल्या होत्या.पूजारी, गुरव, संन्यासी, साधू अस्वस्थ होते.

ठीकठिकाणी शास्त्रानुसार हिंदू धर्मियांचे मठ-मंदिरे मुक्त करण्यासाठी जोर धरीत असताना थोरले पेशवे बाजीराव, थोरले सुभेदार मल्हारराव होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महाराजा यशवंतराव होळकर, महाराजा हरिराव होळकर यांनी आपल्या शासन काळात महत्त्वाच्या भूमिका घेऊन मठ-मंदिरांची परकीयांकडून मुक्ती आणि जीर्णोद्धार कार्याला सुरुवात केली. अहिल्यादेवींनी काशीचा विश्वनाथ मुक्त करून, तेथे विधिवत काशीविश्वनाथाची स्थापना केली. अयोध्येत देखील त्यांनी अवशेष पावलेला, शरयू घाट नव्याने बांधला. भगवान श्रीराम मंदिर निर्माण केले. अयोध्येतील निर्माण कार्य अनेक वर्षे सुरू होते, तेथे येणार्‍या जाणार्‍या लोकांसाठी होळकरवाडा निर्माण केला, अन्नछत्र सुरू केले. अन्नछत्रात शेकडो लोकांना जेवण मिळू लागले.

अयोध्येतील काम पाहण्यासाठी होळकरांचे वकील सिद्धेश्वर दादाजी परचुरे अयोध्येत गेले असता, त्यांनी तेथून अहिल्यादेवींना एक पत्र पाठवले होते. पत्रात म्हणतात की, “(श्री ता. ९ जुलाई, इसवी सन १७९४) सिद्धेश्वर दादाजी परचुरे यांजकडून मातोश्री अहिल्याबाईंस पत्र. विशेष. आषाढ शुद्ध द्वादशी शके १७१६ मुक्काम अयोध्या येथें सुरक्षित असो विनंती कीं येथे श्री अयोध्येस आपली मूर्त श्री रामचंद्र चरणीं आहे, ती पाहून बहुत समाधान झाले. म्हणोन.”

सुभेदार मल्हारराव होळकर यांनी होळकरांकडून वेगवेगळ्या दरबारात आपले वकील नियुक्त केले. अयोध्या येथे नवाबाच्या दरबारात होळकरांकडून राजश्री खंडू जगदेवराव हे वकील होते. तेथील दरबारातील महत्त्वाची माहिती होळकरांना वकील पाठवत असत. अवधचा नवाब आसिफौदोला यांस पत्र पाठवून, अहिल्यादेवींनी अयोध्येत श्रीराम जन्मभूमीवर पुन्हा नव्याने मंदिर निर्माण करून रामललाची पूजा-अर्चा सुरू केली. यामागे थोरले सुभेदार यांच्या पराक्रमाचा प्रभाव तसेच अहिल्यादेवींनी भारतीय संस्कृतीच्या प्रतीकांची नव्याने उभारणी करण्याची मोहीम जोखमेची होती. परिस्थिती अनुकूल करून हाती घेतलल्या मोहिमेवर खासगी कोषातून खर्च करण्याची व्यवस्था केली होती. महादेवाला अर्पण केलेल्या राज्यात रामराज्याचे स्वप्न अहिल्यादेवींनी बघितले होते, ते प्रत्यक्षात साकार करण्यासाठी त्यांनी देवावर विश्वास ठेवून, लोककल्याणासाठी पुढाकार घेतला होता. त्यांच्या या अलौकिक कार्याची इतिहासाने सुवर्ण अक्षरात नोंद केलेली दिसून येते.

अहिल्यादेवींनी निर्माण केलेल्या धर्मशाळांचे मुख्य प्रवेशद्वार बर्‍यापैकी उंच असून, तेथे चोख व्यवस्था करण्यात आली आहे. आजूबाजूच्या भिंतींची उंची बरीच ठेवली आहे. अंगण अगदी मोकळे आहे आणि मध्यभागी तुळशीचा पलंग ठेवण्यात आला आहे. आजूबाजूला खोल्या आहेत आणि खोल्यांच्या समोर व्हरांडे बांधलेले आहेत. जवळपास सर्व धर्मशाळा भाजलेल्या विटांनी बनवलेल्या आहेत. साधारणपणे प्रत्येक धर्मशाळेत शिवलिंगाची स्थापना होते. बहुतेक धर्मशाळांमध्ये अन्नसत्र आणि शाश्वत उपवास स्थापित केले गेले. इमारतीच्या देखभाल व कर्मचार्‍यांच्या खर्चाची कायमस्वरुपी व्यवस्था करण्यात आली. पाणी सहज उपलब्ध व्हावे, म्हणून साधारणपणे नद्या आणि विहिरींच्या काठावर धर्मशाळा बांधल्या जातात. महेश्वरच्या धर्मशाळा सजावट आणि अलंकाराच्या दृष्टिकोनातून अधिक उल्लेखनीय आहेत. या धर्मशाळांच्या खांबांवर स्त्री-पुरुषांच्या नृत्य, वाद्ये व ढोल वाजवणार्‍या आणि सार्वजनिक जीवनाशी संबंधित प्रतिमा कोरलेल्या आहेत.

अहिल्यादेवी होळकर यांनी चित्रकुट येथे सोन्याची रामपंचायतन स्थापन केलेली असून, पंढरपूर येथील होळकर वाड्यात राममंदिर निर्माण केलेले आहे, तर पंढरपूर जवळच्या बोहाळी गावातदेखील रामपंचायतन स्थापन केलेले आढळून येते. महेश्वर, इंदौर, चित्रकुट, पंढरपूर, नासिक, टोंक, भानपुरा, संगमनेर, कायगाव टोक आदी ठिकाणी राममंदिर निर्माण केलेले आहेत. अहिल्यादेवींच्या संग्रहात श्री वाल्मिकी रामायण सप्तकांड होते. त्यांनी रामायणाचे पारायण महेश्वर येथे आयोजित करून, होळकरांच्या देवघरात सुवर्णाची प्रभू श्रीराम पंचायतन पाळण्यासह स्थापित केले होते.

होळकरशाहीचे संस्थापक थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांची जन्मतिथी म्हणजेच रामनवमी असून, होळकर घराण्यात श्रीराम यांना कुळस्वामी समवेत स्थापन केलेले आहे.श्रीमंत मल्हारराव होळकर यांचे मामा तळोदा जहागीरदार श्रीमंत भोजराज बारगळ यांनी तळोदा येथे श्रीराम मंदिर निर्माण केले होते. अयोध्येतील खंडित श्रीराम मंदिर नव्याने निर्माण करणे महत्त्वाचे असल्याने, अहिल्यादेवींनी मंदिर निर्माण बुद्धिचातुर्याने केलेले दिसून येते. आजही अयोध्येत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर निर्मित होळकरवाडा, भैरव मंदिर, शरयू घाट पाहायला मिळतो. अहिल्यादेवींच्या लोककल्याणकारी कामामुळे त्यांना लोक ‘गंगाजळ निर्मळ पवित्र प्रातःस्मरणीय पूज्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ अशा आदरयुक्त बिरुदावलीने पूजतात.

दि. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न होत असून, भगवान श्रीराम यांचे मंदिर दर्शनासाठी खुले होत आहे, याचा आनंद वाटतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील वाद कायदेशीर मिटवून, श्रीराम जन्मभूमीत पुनश्च श्रीरामाची स्थापना केली आहे. साधू-संत-महंत तसेच श्रीराम जन्मभूमी मुक्तीसाठी लढणार्‍या सर्वांचा विजय सफल झाला. तंत्रज्ञान तसेच लढाईच्या आयुधांनी कितीही शक्तिशाली झालो, तरीही भक्तीची आस्था केंद्रे भारतीय संस्कृतीच्या वारसदारांनी कधीही मागे ठेवली नाहीत.

रामभाऊ लांडे
(लेखक होळकर राजघराण्याचे अभ्यासक आहेत.)
९४२१३४९५८६
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.