अमेरिकेच्या संरक्षण खात्याने पामर लकीच्या ‘अँडुरिल’ कंपनीकडून काही रोडरनर ड्रोन्स खरेदी केली आहेत. अर्थात, अमेरिकेतली एक स्टार्टअप म्हणजे नवखी कंपनी जे करू शकते, ते अमेरिकन सेनादलाचे मुरब्बी वैज्ञानिक करू शकत नाहीत, असं थोडंच आहे? पण, नवीन पोरं काय करतायत बघूया तरी, म्हणून ‘पेंटेगॉन’ने ही रोडरनर घेतली आहेत.
१९०३ साली ऑर्व्हिल आणि विल्बरफोर्स या राईट बंधूंनी आधुनिक जगातलं पहिलं यशस्वी विमान उड्डाण केलं. १९०९ साली या दोघांनीच खास अमेरिकन लष्करासाठी एक विमान बनवून दिलं. परंतु, विमानातून शत्रूच्या सैन्यावर बॉम्बफेक करण्याची पहिली घटना मात्र आफ्रिकेत घडली. इटली आणि तुर्कस्तान यांच्या युद्धात इटालियन लष्कराने लीबियामध्ये तुर्की लष्करावर छोट्या सिंगल मशीनवाल्या विमानांमधून बॉम्बफेक केली. ही घटना १९११ सालची.
१९१४ साली पहिलं महायुद्ध सुरू झालं. जर्मनी आणि अँग्लो-फे्रंच या दोन्ही पक्षांकडे विमानं होती. पण, त्यांच्याद्वारे शत्रूवर बॉम्ब फेकावेत, हे दोन्हीकडच्या सेनापतींच्या लक्षातच आलं नाही. दोन्हीकडचे लोक एकमेकांच्या प्रदेशांची, सैनिकी हालचालींची टेहळणी करायला आणि छायाचित्रं काढायला विमानं वापरायचे. मग शत्रू पक्षाला अशी टेहळणी करायला देता कामा नये, म्हणून दोन्हीकडचे वैमानिक बरोबर एक रायफल बाळगू लागले नि प्रतिस्पर्धी विमानावर गोळ्या झाडू लागले. एप्रिल १९१५ मध्ये एक फ्रेंच वैमानिक रोलाँ गारो याने सर्वप्रथम आपल्या विमानाच्या प्रॉपेलरमध्येच मशीनगन बसवली. यानंतर मात्र विमान युद्धतंत्र झपाट्याने विकसित होत गेलं.
पुढे पहिल्या महायुद्धाच्या उर्वरित काळात आणि नंतर दुसर्या महायुद्धात सर्वच देशांच्या विमान दलांनी विध्वंसाचा कहर करून सोडला. नंतरच्या शीतयुद्ध काळात सर्वच पुढारलेले देश सतत नवनवीन प्रकारची संहारक आणि अतिवेगवान विमानं विकसित करीत राहिले. ही अत्याधुनिक विमानं अर्थातच अत्यंत खर्चिक होती. एक विमान नष्ट होणं म्हणजे कोट्यवधी डॉलर्स/पौंड/रुपये पाण्यात जाणं. यंत्रापेक्षाही त्याच्यासह नष्ट होणारे वैमानिक, सहवैमानिक आणि अन्य कर्मचारी गमावणं हे जास्तच महाग होतं. कारण, अत्याधुनिक विमान हाताळण्यासाठी हे कर्मचारीदेखील प्रशिक्षित-अतिप्रशिक्षित असावे लागायचे. असे भरपूर खर्च करून सुसज्ज केलेले कर्मचारी नष्ट होणं, हे फारच महाग पडत होतं.
यातूनच ‘अन्मॅन्ड एरियल व्हेईकल’ किंवा ‘युएव्ही’ किंवा साध्या भाषेत ‘ड्रोन’ या नव्या स्वस्त विमान प्रणालीला पुढाकार मिळाला. वैमानिक विरहित विमान ही तशी अगदीच नवी संकल्पना नव्हती. सुप्रसिद्ध अमेरिकन संशोधक निकोलाय टेस्ला याने १९१५ सालीच अशा वैमानिक विरहित विमानांच्या पथकाची कल्पना मांडली होती. १९४१ साली दुसरं महायुद्ध चालू असतानाच, ब्रिटिश विमानदलाने अशी काही विमानं बनवलीदेखील होती. पण, त्यांचा वापर टेहळणी पुरताच झाला.
साधारण १९७५-८० पासून रिमोट कंट्रोल पद्धतीने एखादं वैमानिक विरहित विमान बनवणं आणि संचालित करणं याचं तंत्र अधिकाधिक विकसित होत गेलं. नंतर लगेचच जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत संगणक आणि संगणकीय तंत्रज्ञान झपाटेबंद क्रांती करू लागलं. लक्षावधी-कोट्यवधी संख्यांची आकडेमोड अल्पावधित करणं, हे जे संगणक या यंत्राचं मूळ कार्य, त्यासह तो सगळीच कामं अत्यंत वेगाने करू लागला. यामुळे अतिवेगवान, अतिसंहारक, भरपूर शस्त्रसामग्री वाहून नेऊ शकणार्या विमानांपेक्षा वैमानिक विरहित विमान-ड्रोनच्या संशोधनावर देशोदेशींच्या विमानतज्ज्ञांनी आपलं लक्ष केंद्रित केलं.
सध्या अमेरिकेचं ‘कोयोट’, इस्रायलचं ‘हारोप’, पोलंडचं ‘वॉर्बलफ्लाय’, इराणचं ‘शाहिद’ इत्यादी ड्रोन्स जगभर चर्चेत आहेत. आता या ड्रोन्सची वैशिष्ट्ये काय, तर ती तळहाताएवढ्या आकारापासून मोठ्या विमानाच्या आकारापर्यंत कोणत्याही आकाराची बनवली जाऊ शकतात. एका ड्रोनची किंमत सुमारे एक लाख ते पाच लाख डॉलर्स एवढी असते. ड्रोन शत्रूच्या किंवा आपल्यादेखील प्रदेशाची पाहणी, हवाई छायाचित्रण या कामांसाठी वापरता येतं. तसंच ड्रोनच्या नाकाच्या टोकावर स्फोटक अस्त्रे बसवली, तर ते क्षेपणास्त्र म्हणूनही वापरलं जाऊ शकतं. ड्रोनचं संचालन करणारा वैमानिक प्रत्यक्ष युद्ध आघाडीच्या कित्येक किमीमागे सुरक्षित बसलेला असतो. ड्रोनमधले कॅमेरे आणि अन्य संगणकीय नकाशे यांच्या साहाय्याने तो शत्रूची ठिकाणं अचूक शोधून, नेमक्या लक्ष्यावर बॉम्बफेक करू शकतो. समजा, हे काम करताना शत्रूच्या क्षेपणास्त्राने त्याचं ड्रोन उडवलं, तरी फक्त ड्रोन जातं, वैमानिक सुरक्षित असतो.
अशा प्रकारे ड्रोन हे हलकं,स्वस्त, अधिक अचूक मारा करणारं, संगणकाद्वारे संचालित केलं जाणारं, परिणामकारक असं नवंच शस्त्र उपलब्ध झाल्यामुळे, जगभरची सगळीच सैनिकी दलं त्याचा अधिकाधिक वापर करण्याच्या नवनवीन युक्त्या शोधून काढीत आहेत.
आता ड्रोनचा वापर वाढत चालला म्हटल्यावर, ड्रोनचा प्रतिरोध करणारी नवी शस्त्रं, नवी तंत्रं लोक शोधणारच. समजा, एखाद्या ठिकाणावर ड्रोन हल्ला होण्याची शक्यता आहे किंवा झाला आहे, तर त्या ठिकाणचे लोक काय करतील? ते आपलं ड्रोन सोडून प्रतिहल्ला करतील आणि आक्रमण करून येणार्या ड्रोनला हवेतच नष्ट करतील किंवा विशेष बंदुकीतून लेझर किरणांचा मारा करून, ड्रोनला दिशाहीन बनवतील. लक्षात घ्या, ड्रोनमध्ये वैमानिक नाही. तो वैमानिक दुसरीकडे कुठेतरी सुरक्षित बसलाय. तिथून तो संगणकाद्वारे ड्रोन संचालित करतो आहे. त्याच्याकडून येणार्या संदेश लहरी ड्रोनवरचे संवेदक टिपत आहेत नि त्याप्रमाणे ड्रोन वागतं आहे. त्या विशेष बंदुकीतले लेझर किरण ड्रोनच्या संवेदकांना बधीर करतील किंवा इलेक्ट्रॉनिक संदेश लहरींना अडथळा आणतील. यामुळे ड्रोन दिशाहीन होऊन कुठेतरी भरकटेल.
मी या ठिकाणी कोणताच निष्कर्ष काढत नाहीये. फक्त तुम्हाला आठवण करून देतोय. दि. ७ जानेवारी २०२२ या दिवशीची घटना लक्षात आहे का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोटारींचा ताफा पंजाबात फिरोजपूर जवळ एका फ्लायओव्हर पुलावर वाहतूककोंडीत अडकला होता. चक्क २० मिनिटं अडकून पडला होता. त्यावेळी पंतप्रधानांचे विशेष सुरक्षा कमांडो हातात एक वेगळ्याच प्रकाची बंदूक घेऊन सर्वत्र वावरत होते.
असो. तर ड्रोन हे तळहाताएवढ्या आकारापासून मोठ्या विमानाएवढं असू शकतं, तरी सध्याची ड्रोन्स ही सामान्यतः गिधाडांच्या आकाराची भासतात. तुम्ही पामर लकी या इसमाचं नाव ऐकलंय का? फक्त ३१ वर्षांचा हा अमेरिकन तरूण आज अब्जाधीश आहे. इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी क्षेत्रातल्या व्हर्च्युअल रिअॅलिटीमध्ये त्याने प्रचंड कर्तबगारी केली असली, तरी व्यवहारात त्याला इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगची पदवी मिळवता आलेली नाही. तो चक्क ‘ड्रॉप आऊट’ विद्यार्थी आहे. परंतु, त्याने सुरू केलेली ‘ओकुलस’ ही व्हर्च्युअल रिअॅलिटी स्टार्टअप कंपनी फेसबुकने २० कोटी डॉलर्स मोजून विकत घेतली, तेव्हा अवघं जग आश्चर्याने थक्क झालं. ही २०१४ सालची गोष्ट आहे. म्हणजे त्यावेळी तो फक्त २२ वर्षांचा होता. २०१७ साली त्याने ‘अँडुरिल’ ही नवी कंपनी काढली. आता २०२३ सालच्या डिसेंबर महिन्यात त्याने ‘रोडरनर-एम’ नावाचं ड्रोन बाजारात उतरवलं आहे. आता इस्रायली किंवा अमेरिकन सैनिकी दलांनी विकसित केलेल्या ड्रोन प्रणाली आणि पामर लकीच्या या ड्रोन प्रणालीत काय फरक आहे? पहिली गोष्ट म्हणजे ‘रोडरनर-एम’चा पल्ला (रेंज) खूप जास्त आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, समजा दहा रोडरनर एका लक्ष्याच्या दिशेने सुटली, तर ती एकमेकांशी संपर्क ठेवतील, बोलतील आणि त्यांपैकी एकाने लक्ष्य अचूक टिपल्यावर, उरलेली नऊ ड्रोन्स आपल्या नाकावर बसवलेली स्फोटकं उगीच वाया न घालवता, सुरक्षितपणे आपल्या तळावर परततील.
अमेरिकेच्या संरक्षण खात्याने पामर लकीच्या ’अँडुरिल’ कंपनीकडून काही रोडरनर ड्रोन्स खरेदी केली आहेत. अर्थात, अमेरिकेतली एक स्टार्टअप म्हणजे नवखी कंपनी जे करू शकते, ते अमेरिकन सेनादलाचे मुरब्बी वैज्ञानिक करू शकत नाहीत, असं थोडंच आहे? पण, नवीन पोरं काय करतायत बघूया तरी, म्हणून ‘पेंटेगॉन’ने ही रोडरनर घेतली आहेत.
धंद्याची खरी मेख इथेच आहे. अमेरिकन सेनादलं किंवा अन्य पुढारलेले देश रोडरनर घेणार नाहीत; पण दक्षिण अमेरिकन देश? आफ्रिकन देश? अरब राष्ट्रं? ही सगळी संभाव्य गिर्हाईकं असू शकतात. किंवा फेसबुकने जशी व्हर्च्युअल रिअॅलिटीची अख्खी कंपनीच विकत घेऊन टाकली, तशी दुसर्या कुणी ’अँडुरिल’ कंपनीच घेतली तर? बस्! पामर लकीला तेच हवंय.
असो. तर वेगवेगळे देश, वेगवेगळे संशोधक अशी नवनवीन ड्रोन्स, अँटिड्रोन्स बाजारात आणतच राहणार. वैमानिक संचालित विमानापेक्षा हे वैमानिक विरहित विमान केव्हाही उत्तमच. आज ती गिधाडांच्या आकारांची आहेत. उद्या ती कदाचित आणखी लहान पण अधिक घातक बनतील. यावरून आठवण होते-देवाच्या भुंग्यांची.
छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर लगेचच म्हणजे १६८१ साली औरंगजेब जातीने महाराष्ट्रात उतरला. मराठ्यांचं राज्य जिंकून घेण्यासाठी मुघली फौजा चौफेर सुटल्या. आता मुघली फौजा जिथून जाणार, तिथून त्या गावांना आगी लावत, कत्तली करत, उभी पिकं लुटत, देवळरावळं उद्ध्वस्त करतच, पुढे सरकणार, हे नक्कीच असायचं. तशीच एक मुघली टोळी जेजुरी गडावरचं खंडोबा देवस्थान उद्ध्वस्त करण्यासाठी निघाली. पण, ती गडावर पोहोेचूच शकली नाही. एका विशिष्ट ठिकाणच्या कपारीतून लक्षावधी भुंगे बाहेर पडले. भुंग्यांचा थवा एखाद्या पावसाळी ढगासारखा अक्राळविक्राळ झाला आणि त्याने मुघली सैन्यावर हल्ला करून त्यांना पार पिटाळून लावलं.
औरंगजेबाला ही बातमी समजल्यावर, तो भयंकर संतापला आणि त्याने पथकांमागून पथकं पाठवली. पण, सगळ्यांची तीच स्थिती झाली. एका विशिष्ट टप्प्यापलीकडे एकही मुघली सैनिक पाय घालू शकत नव्हता. शेवटी कंटाळून औरंगजेब पुढे निघून गेला. जाण्यापूर्वी त्याने आपल्या माणसांकरवी खंडोबाला एक अतिशय मौल्यवान पाचू अर्पण केला. हा पाचूचा खडा भुंग्यासारखा घडवलेला होता.
पुढे मराठी राज्य गेलं आणि इंग्रजी राज्य सुरू झालं. त्या काळी जेजुरी परिसरात एक दरोडेखोर प्रबळ झाला. तो खंडोबाचा भक्त होता. बराच काळ त्याने इंग्रजांना झुंजवत ठेवलं. पण, पुढे त्याची नियत फिरली. त्याने आपला उपास्य देव खंडोबा त्याच्यावरच धाड घालून, त्याचे सगळे दागिने लुटले. आणखी काही वर्षांनी इंग्रजांनी अखेर त्याला पकडलं. त्याच्याकडचे बरेच दागिनेही परत मिळाले. त्यापैकी खंडोबा देवस्थानचे दागिनेही बरेचसे परत मिळाले. पण... तो पाचूचा भुंगा मात्र उडाला, तो उडालाच! तो खडा त्या दरोडेखोराने कुणाला विकला की, इंग्रज अधिकार्यांनी तो खिशात टाकला, काहीच माहीत नाही. कारण, इंग्रजांची जडजवाहीराची आसक्ती प्रसिद्धच आहे.
आता प्रश्न असा पडतो की, ज्या देवाने भुंगे सोडून, पंचहत्यारी मुघल सैन्याचा पराभव केला, त्याने स्वतःच्या खजिन्याची लूट का होऊ दिली? असो. हा प्रश्न मनात ठेवून, आपण आता भुंग्याच्या आकाराच्या गुणगुण करणार्या ड्रोनची वाट बघूया.