"आव्हाडाचं वक्तव्य पवारांच्या मंचावर, म्हणजे ती पवारांचीच भूमिका!"

04 Jan 2024 18:58:00

Jitendra Awhad & Sharad PAwar


मुंबई :
शरद पवारांच्या व्यासपीठावर त्यांच्या समोर जेव्हा जितेंद्र आव्हाड बोलतात याचा अर्थ ती शरद पवारांची भुमिका आहे, असे म्हणत शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी जितेंद्र आव्हाडांचे कान पिळले आहेत. जितेंद्र आव्हाडांनी प्रभू श्रीरामाविषयी केलेल्या वक्तव्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
 
संजय शिरसाट म्हणाले की, "जितेंद्र आव्हाडांनी रामाबद्दल जे वक्तव्य केले ते सरळ अर्थाने घेऊ नये. शरद पवारांच्या व्यासपीठावर त्यांच्यासमोर जेव्हा जितेंद्र आव्हाड बोलतात याचा अर्थ ती शरद पवारांची भुमिका आहे. ते आव्हाडांच्या तोंडून वधवून घेत आहेत. कारण जितेंद्र आव्हाडांचे वक्तव्य चुकीचे आहे असे शरद पवार म्हणाले नाहीत."
 
"दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपल्यातलेच लोक आपल्या देवतांबद्दल असे वक्तव्य करतात. परंतू, दुसऱ्या एखाद्या समुदायाबद्दल जर जितेंद्र आव्हाड बोलले असते तर लोकांनी त्यांचे कपडे फाडले असते. स्वतःच्या राजकारणासाठी इतरांची मतं आपल्याला कशी मिळतील यापुरते मर्यादित राहून ते असे वक्तव्य करतात. राम मंदिराचे उद्धाटन होत असून देशात जल्लोषाचे वातावरण आहे. अशावेळी असे वक्तव्य करुन त्यांनी हिंदू धर्मीयांच्या भावनांवर मीठ चोळण्याचे काम केले आहे," असेही ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, “दुर्दैव असे आहे की, जे स्वतःला हिंदुत्वाचे राजे महाराजे म्हणतात. आमच्याकडे हिंदुत्वाचा वारसा आला आहे, असे म्हणतात ते यावर शब्दही बोलत नाहीत. त्यांनी आतापर्यंत यावर एकदाही निषेध केला नाही. मतांसाठी लाचारी करणाऱ्या या मंडळींना येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेत जनता निश्चितच धडा शिकवेल. एक लक्षात घ्या, हिंदूच्या भावना भडकविण्याचा किंवा देवदेवतांचा अपमान करण्याचा प्रयत्न कराल, तर त्याचे परिणाम भोगावे लागतील,” असेही ते म्हणाले आहेत.



Powered By Sangraha 9.0