"रोहित पवार अजून लहान आहेत, पहिलीच टर्म आहे!", आव्हाडांनी पुन्हा फटकारलं!

04 Jan 2024 17:30:56

 Jitendra Awhad & Rohit Pawar


मुंबई :
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी जितेंद्र आव्हाडांना घरचा अहेर दिल्यानंतर आता जितेंद्र आव्हाडांनी यावर प्रत्युत्तर दिले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी प्रभु श्रीरामांबद्दल एक वादग्रस्त विधान केले. यावरून रोहित पवार यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत जितेंद्र आव्हाडांचे कान टोचले होते.
 
"रोहित पवार काय बोलतात याकडे मी फार लक्ष देत नाही. मला काही त्यांच्याविषयी बोलायचं नाही. ते अजून लहान आहेत. त्यांची पहिली टर्म आहे," असे म्हणत जितेंद्र आव्हाडांनी रोहित पवारांना फटकारलं आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाडांना पाठिंबा देण्यासाठी मविआतील एकही नेते पुढे येताना दिसत नाही.
 
रोहित पवारांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, "आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता, शेतमालाला भाव नसणं, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं, जाती-जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज आहे."
 
ते पुढे म्हणाले की, "देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असून याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्याने कुणीही याचं राजकारण करू नये. पण देव धर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखलाभ. अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे देव या विषयावर अनावश्यक बोलून विरोधकांच्या सापळ्यात न अडकण्याचं भान सर्वांनीच ठेवलं पाहिजे, अशी एक नागरिक म्हणून माझी भावना आहे," असेही ते म्हणाले. यावर जितेंद्र आव्हाडांनी त्यांना फटकारलं आहे.



Powered By Sangraha 9.0