पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताच्या सर्वांगीण आर्थिक प्रगतीचे आणि सुधारलेल्या आंतरराष्ट्रीय संबंधांचे चीनच्या ‘ग्लोबल टाइम्स’ या वृत्तपत्रातील एका लेखात नुकतेच कौतुक करण्यात आले. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र मानल्या जाणार्या, ‘ग्लोबल टाइम्स’कडून एरवी भारताच्या नीती-धोरणांना लक्ष्य केले जाते. परंतु, यंदा ‘ग्लोबल टाइम्स’ने भारताचे कौतुक केल्याने त्यामागचा अन्वयार्थ समजून घ्यायला हवा.
चीनमधील बीजिंगस्थित ‘ग्लोबल टाइम्स’ या वृत्तपत्रात नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका लेखामध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची झालेली आर्थिक प्रगती, प्रशासकीय सुधारणा आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचे कौतुक करण्यात आले आहे. चीनमधील प्रमुख प्रसारमाध्यम असलेल्या या वृत्तपत्रात अशी प्रशंसा प्रसिद्ध होणे, हेच मुळी दुर्मीळ! त्यामुळे ‘ग्लोबल टाइम्स’च्या लेखात अशी भारत समर्थनार्थ भूमिका का मांडली गेली असेल, असा प्रश्न उपस्थित होणे साहजिकच. तत्पूर्वी या लेखात नेमके काय म्हटले आहे, ते समजून घ्यायला हवे.
शांघाय येथील फुदान विद्यापीठातील दक्षिण आशियाई अभ्यास केंद्राचे संचालक झांग जियाडोंग यांचा ‘ग्लोबल टाइम्स’ या वृत्तपत्रात ’थहरीं ख षशशश्र रर्लेीीं ींहश मइहरीरीं परीीरींर्ळींशफ ळप खपवळर’ या शीर्षकाचा लेख नुकताच प्रसिद्ध झाला आहे. या लेखामध्ये विशेषत्वाने गेल्या चार वर्षांतील भारताच्या उल्लेखनीय कामगिरीवर लेखकाने प्रकाश टाकलेला दिसतो. भारताचा बळकट आर्थिक विकास, प्रशासकीय सुधारणा यांवर या लेखात सकारात्मक भाष्य करण्यात आले आहे. त्याचबरोबर भारताच्या चीनसोबतच्या, तसेच आंतरराष्ट्रीय संबंधांबद्दलच्या दृष्टिकोन बदलाचेही या लेखात कौतुक करण्यात आले आहे. “हे करताना चीन आणि भारत यांच्यातील व्यापार असंतुलनावरील चर्चेत, भारतीय प्रतिनिधी पूर्वी प्रामुख्याने व्यापार असमतोल कमी करण्यासाठी चीनच्या उपाययोजनांवर लक्ष केंद्रित करायचे. पण, आता ते भारताच्या निर्यात क्षमतेवर अधिक भर देत आहेत,” असेदेखील लेखकाने अधोरेखित केले आहे.
‘ग्लोबल टाइम्स’च्या या लेखात विशेषतः भारताच्या धोरणात्मक आत्मविश्वासावर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, ’भारत नॅरेटिव्ह’ला प्रोत्साहन देणार्या, भारतनीतीची विशेष प्रशंसा करण्यात आली आहे. लेखक म्हणतो की, “भारत देश वेगवान आर्थिक आणि सामाजिक विकासामुळे ‘भारत नॅरेटिव्ह’ची निर्मिती करण्यात धोरणात्मकदृष्ट्या सक्षम आणि अधिक सक्रिय झाला आहे. राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात भारताने पाश्चिमात्य देशांतील लोकशाहीच्या संकल्पनेचे अंधानुकरण करण्याऐवजी, लोकशाहीवादी राजकारणाशी जोडलेली ’भारतीय वैशिष्ट्य’ अधोरेखित करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.” त्यामुळेच सद्यःस्थितीत भारतातून उगम पावलेल्या, लोकशाहीवादी राजकारणावरच अधिक भर दिला जात असल्याचेही लेखक जियाडोंग नमूद करतात.
“भारताचे हे सर्वांगीण परिवर्तन ऐतिहासिक वसाहतवादी छायेतून बाहेर पडण्याची तसेच राजकीय आणि सांस्कृतिकदृष्ट्या जागतिक प्रभावशाली राष्ट्र म्हणून स्वतःचे स्थान निर्माण करण्याची भारताची महत्त्वाकांक्षा प्रतिबिंबित करते,” असेही मत लेखकाने या लेखात मांडले आहे. याशिवाय या लेखात रशिया-युक्रेन संघर्षाच्या अनुषंगाने भारताचा बहु-साहाय्य दृष्टिकोन तसेच अमेरिका, जपान आणि रशियासारख्या प्रमुख जागतिक शक्तींशी संबंध बळकट करण्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या रणनीतीची देखील लेखकाने स्तुती केलेली दिसते.
भारताच्या परराष्ट्र धोरणात आमूलाग्र बदल झाल्याचे या लेखात आवर्जून नमूद करत, जियाडोंग आपल्या लेखात म्हणतात की, ”पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून त्यांनी अमेरिका, जपान, रशिया, अन्य देश आणि प्रादेशिक संघटनांशी भारताचे संबंध बळकट करुन बहु-साहाय्य धोरणाचा पुरस्कार केला आहे.” एवढ्यावरच न थांबता, भारताने नेहमीच स्वतःला जागतिक शक्ती मानले आहे, असेदेखील या लेखात नमूद करण्यात आले आहे. तसेच “भारताच्या बहु-संतुलनातून बहु-साहाय्यतेच्या प्रवासाला केवळ दहा वर्षे झाली आहेत, तरीही भारत बहुध्रुवीय जगात एक अग्रणी भूमिका निभावत आहे. एक बदललेला, बलशाली आणि अधिक आत्मविश्वासपूर्ण भारत हा एक नवीन भू-राजकीय घटक बनला आहे, ज्याचा अनेक देशांना आता विचार करणे क्रमप्राप्त आहे,” असे सांगत लेखकाने भारताच्या वाढत्या वैश्विक प्रभावाची सकृतदर्शनी दखल घेतली आहे.
विशेष म्हणजे, लेखक आणि दक्षिण आशियाई अभ्यास केंद्राचे संचालक झांग जियाडोंग यांनी या लेखातील तपशील कोणत्याही ऐकीव किंवा इंटरनेटवरील माहितीच्या आधारे लिहिलेला वरकरणी वाटत नाही. उलट जियाडोंग यांनी या लेखात नमूद केल्यानुसार, अलीकडच्या काळात त्यांनी दोनदा भारताला भेट दिली आहे. तसेच भारतात केवळ पर्यटक म्हणून फेरफटका न मारता, जियाडोंग यांनी विविध स्तरावरील तज्ज्ञांशीही भारताच्या विकासाविषयी, प्रगतिकारक वाटचालीविषयी चर्चा केल्याचे त्यांचा लेख वाचताना प्रकर्षाने जाणवते. एवढेच नाही तर “चीनमधील तज्ज्ञ, अभ्यासकांप्रति भारतातील तज्ज्ञ मंडळींचा सूर हा दुराग्रही नसून तो सौम्य आणि संतुलित होता,” असेही एक निरीक्षण जियाडोंग आपल्या लेखात नोंदवतात. एकूणच हा लेख काळजीपूर्वक वाचताना, जियाडोंग यांनी नोंदवलेल्या बारीकसारीक निरीक्षणांवरून त्यांच्यातील अभ्यासूवृत्तीची कल्पना यावी.
जियाडोंग लेखाच्या प्रारंभीच म्हणतात की, “नवी दिल्ली शहराच्या एकूणच प्रशासकीय कारभारात सकारात्मक बदल झालेला दिसतो. दिल्लीतील धुक्याची (वायू प्रदूषणाची) परिस्थिती अजूनही गंभीर असली तरी, विमानातून उतरल्यानंतर जो एक विशिष्ट प्रकारचा गंध चार वर्षांपूर्वी मला प्रकर्षाने जाणवला होता, तो आता येत नाही. यावरून नवी दिल्लीतील सार्वजनिक वातावरण थोडे फार का होईना, आपल्याला बदललेले दिसते.”
आपल्या लेखात जियाडोंग केवळ भारताची नेत्रदीपक आर्थिक प्रगती आणि भारताने जगात स्वत:चे निर्माण केलेले स्थान, याची प्रशंसा करुन थांबत नाहीत, तर भारत सरकारच्या ‘भारत नॅरेटिव्ह’अंतर्गत आयोजित इतर उपक्रमांचाही ते आवर्जून उल्लेख करतात. यामध्ये २०२३ साली ‘भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदे’ने (आयसीसीआर) आयोजित केलेल्या "Knowledge India Visitors Programme’ चाही जियाडोंग अगदी प्रकर्षाने उल्लेख करतात. या कार्यक्रमासाठी जगभरातून ३५ पेक्षा अधिक देशांमधून ७७ पेक्षा अधिक तज्ज्ञ सहभागी झाले होते.
जियाडोंग या लेखात केवळ भारताच्या परराष्ट्र धोरणाचे, ‘विश्वमित्र’ म्हणून भारताच्या बदलत्या भूमिकेवरच कौतुकवर्षाव करीत नाही, तर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यावरही त्यांनी स्तुतिसुमने उधळली आहेत. जयशंकर यांची भाषणं, त्यांनी वेळोवेळी भारताला केंद्रस्थानी ठेवून मांडलेली भूमिका, ही केवळ भारतीय माध्यमांमध्येच नव्हे, तर चीनसह जागतिक माध्यमांमध्येही चर्चेचा विषय ठरते, हे यावरून पुनश्च सिद्ध व्हावे.
जियाडोंग लेखात म्हणतात की, “भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ‘भारत नॅरेटिव्ह’ पूर्ण ताकदीने उभा करण्यावर भर दिला आणि ‘भारत नॅरेटिव्ह’ ही संकल्पना त्यांनी अर्थशास्त्र, विकास, राजकारण, संस्कृती अशा विविध आयामांतून स्पष्ट केली. त्यामुळे साहजिकच, भारत आता सांस्कृतिक परंपरेला केवळ स्वहित साधण्यासाठी किंवा परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्याचे माध्यम म्हणून पाहत नाही, तर एक महान शक्ती होण्यासाठीचा मजबूत पाया म्हणून तो सांस्कृतिक परंपरेकडे पाहतो.” यावरून ‘भारत नॅरेटिव्ह’च्या नीतीची चीनसारख्या देशाने घेतलेली दखलही (की धास्ती?) तितकीच महत्त्वपूर्ण ठरावी. याचाच अर्थ, मोदींच्या कालखंडात भारत आपले ’सॉफ्ट पॉवर’चे नाणे खणखणीत वाजवण्यात यशस्वी झाला असल्याची ही एकप्रकारे पोचपावती आहे, असे म्हटले तरी वावगे ठरू नये.
‘ग्लोबल टाइम्स’च्या लेखात लेखकाने मांडलेली मते भारताची प्रशंसा करणारी असली म्हणून लगेचच ती चीन सरकारची अधिकृत भूमिका आहे, असे मानावे का? तर याचे उत्तर ‘नाही’ असेच द्यावे लागेल. ‘ग्लोबल टाइम्स’चा वापर हा चिनी प्रपोगंडाच्या प्रचारप्रसारासाठी प्रामुख्याने केला जातो. शी जिनपिंग, कम्युनिस्ट पक्ष आणि तेथील सरकारला सोयीस्कर अशाच बातम्या, लेखही या ‘ग्लोबल टाइम्स’मध्ये मुद्दाम पेरले जातात. त्यामुळे ‘ग्लोबल टाइम्स’च्या या लेखात भारतविषयक सकारात्मक मांडणी लेखकाने जरी केली असली, तरी त्यामुळे मोदी सरकार किंवा भारतीयांनी हुरळून जाण्याचे काही एक कारण नाही.
कारण, चीनची नीती ही प्रारंभीपासूनच तोंडावर गोड बोलून मागून गळा कापण्याची राहिली असून, त्याला इतिहास साक्ष आहे. ‘हिंदी चिनी भाई भाई’च्या घोषणांनंतर १९६२ साली चीनने भारताविरोधात छेडलेले युद्ध असो वा लडाख सीमेवरील सैन्यसंघर्ष, यावरून चीन हा विश्वासार्ह देश नाही, या गृहितकावर अनेकदा शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे सध्याचे मोदी सरकार चीनवर डोळे झाकून विश्वास ठेवण्याचा किंवा चीनच्या शाब्दिक जाळ्यांत अडकण्याचा मुळी प्रश्नच नाही.
चीनसोबतच्या भारताच्या संबंधांवरुन नुकतीच जयशंकर यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया म्हणूनच अत्यंत नेमकी आणि बोलकी ठरावी. जयशंकर म्हणतात की,“नरेंद्र मोदी सरकार वास्तव डोळ्यासमोर ठेवून काम करते. माओ झेडोंगच्या चीनशी कसे संबंध निर्माण करायचे, यावर पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यात मतभेद होते. पण, मोदी सरकारचा चीनला सामोरे जाताना पंडित नेहरूंच्या आदर्शवादावर नव्हे, तर सरदार पटेल यांच्या वास्तववादी विचारपद्धतीवर विश्वास आहे.”